Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पुष्परचनांसाठी उधळपट्टी!
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सारकोझी आणि त्यांची ‘मॉडेल’ पत्नी कार्ला ब्रूनी-सारकोझी ही जोडगोळी अधूनमधून चर्चेत असतेच. त्या दोघांबाबतच्या बातम्या वृत्तपत्रांमधून झळकत असतात. अगदी अलीकडे ‘जॉगिंग’ करताना सारकोझी यांना मूर्छा आली आणि त्याची बातमी सर्वत्र

 

झळकली. असो, तर निकोलस सारकोझी आणि कार्ला यांच्या बातम्या पाश्चात्त्य वृत्तपत्रांमधून ठळकपणे प्रसिद्ध होत असतात. मॉडेल राहिलेल्या कार्ला ब्रूनी यांना फुलांचे अत्यंत आकर्षण. पॅरिसमधील इलीसी राजप्रासादात आकर्षक पुष्परचना करून त्यांची राजप्रासादात सुबक मांडणी करण्याची कार्ला ब्रूनी यांना आवड. फुलांची रचना, मांडणी करतानाची त्यांची अनेक छायाचित्रे वृत्तपत्रांमधून याआधी झळकलीही आहेत; पण कार्ला ब्रूनी यांच्या या फुलांच्या आवडीला फ्रेंच सरकारच्या ऑडिटर मंडळींनी मात्र एकदम हरकत घेतली आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून राजप्रासादात पुष्परचना केल्या जात असून, ही उधळपट्टी थांबवावी, असे ऑडिटरनी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीना अप्रत्यक्षरीत्या बजावले आहे. राजप्रासादामधील पुष्परचनांवर दररोजचा खर्च साधारण ६०० पौण्ड इतका होतो! जनतेचा असा पैसा उधळण्याचा राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला काय अधिकार! सरकारी लेखापरीक्षक फिलीप मिग्विन यांनी, पैशाची ही उधळपट्टी थांबवावी, असे सुचविले आहे. कार्ला ब्रूनी यांच्याच काळात ही उधळपट्टी सुरू झाली असे नाही. माजी राष्ट्राध्यक्ष शिराक यांच्या पत्नी बर्नाडेट यांच्याकडूनही पुष्परचनांवर प्रचंड खर्च होत होता. बर्नाडेट यांचे केवळ गुलाबांच्या रचनांवर जादा प्रेम होते; पण ऑडिटर मंडळींनी घेतलेल्या आक्षेपानंतर बर्नाडेट यांनी तो खर्च कमी केला आणि प्रासाद परिसरातच गुलाब लावून आपली हौस भागविण्याचा प्रयत्न केला. आता कार्ला ब्रूनी यांचे पुष्परचना प्रेम चर्चेत आहे. या निमित्ताने राजप्रासादातही कशा प्रकारचा कारभार चालतो याची काही माहिती पुढे आली आहे. दरवर्षी १४ जुलैला राजप्रासादात आलिशान पार्टीचे आयोजन केले जाते. या समारंभाचे कंत्राट ज्याला मिळते त्याला त्यातून ‘लाभ’ होत असतो. हे सांगायलाच नको. १९९५ पासून २००८ पर्यंत या पार्टीच्या आयोजनाची जबाबदारी एकाच फर्मकडे सोपविण्यात आली. २००८ साली या पार्टीसाठी साधारण दोन लाख ५० हजार पौण्ड खर्च झाला. या समारंभाचे आयोजन एक लाख ६० हजार पौण्डात करू, असा प्रस्ताव दुसऱ्या एका कंपनीने मांडला होता. पण कंत्राट नेहमीच्याच फर्मला देण्यात आले! पाणी कसे मुरते, याची यावरून कल्पना यावी! फ्रान्सच्या थेट राजप्रासादापासून कसा गैरकारभार चालू आहे, हे अशा उदाहरणांवरून लक्षात येते. विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी जुन्या काळातील फ्रेंच राजेरजवाडय़ांसारखे राहात असल्याची टीकाही त्यांच्यावर होत आहे. एका नियतकालिकाने तर कार्ला ब्रूनी यांचा उल्लेख ‘मादाम डी पॉम्पॅडॉर’ असा केला! पंधराव्या लुईचे अंगवस्त्र असलेल्या ‘मादाम डी पॉम्पॅडॉर’ची उपमा कार्ला ब्रूनी यांना देण्यात आली! कार्ला ब्रूनी यांच्या संदर्भात अशी चर्चा अधूनमधून सुरू असतेच. सारकोझी राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात गायचे नाही, असा निर्धार कार्ला यांनी केला होता. पण न्यूयॉर्कमध्ये नेल्सन मंडेला यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्ला यांनी दोन गाणी म्हटली! फ्रान्समधील जनतेला तेही रुचले नाही! फ्रान्सचे ‘हायपर प्रेसिडेंट’ सारकोझी आणि त्यांची ‘मॉडेल’ पत्नी कार्ला ब्रूनी हे दोघे या ना त्या निमित्ताने चर्चेत आहेत, ते असे!