Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘दंशाचा’ प्रत्यय
‘थांबताच येत नाही’ हा हेमंत दिवटेंचा कवितासंग्रह मराठीच्या अत्याधुनिक कवितेला काही नवी ऊर्जा पुरविणारा कवितासंग्रह होय. दिवटेंची मूळ प्रकृती ही कुणी पाडून ठेवलेल्या जुन्या वाटा चोखाळणारी नाही, हे या कवीचे व्यवच्छेदक लक्षण तर आहेच; शिवाय दिवटेंच्या कवितेचे करू म्हटले तरी अनुकरणसुद्धा कुणाला करता यावयाचे नाही. ही लोकविलक्षण अशी ख्याती या कवीची आहे. ‘थांबताच येत नाही’ या अर्थाने या दशकालाच नवे काही देण्याची पूर्ण क्षमता दिवटेंच्या या

 

संग्रहात सामावलेली आहे. कुठली नवी ऊर्जा या संग्रहात आढळते?
‘थांबताच येत नाही’ कवितेने भाषेचा साचा होऊ दिलेला नाही. मराठी कवितेलाच नवा शब्दसंच, नवी वर्तमानमान्य घट्ट बधिरता दिवटेंच्या या कवितेने मराठीतच प्रथमत: आणली आहे. बेडर वृत्तीचा जनसमाचार ही कविता अवघी ताकद लावून घेते. त्यामुळे वाचताना ही कविता ‘दंशाचा’ प्रत्यय देते आणि म्हणूनच दिवटेंच्या या कवितेने तिच्या आपल्या भाळावर अमरत्वाचा तिलक लावलेला आहे. तात्पर्य, ‘बहुभाषासंयोग’ हा काळाचाच ध्वनी ओळखणारा कवी म्हणून दिवटेंचा उल्लेख अगदी ठळक रूपात करणे अगत्याचे ठरते.
श्लील-अश्लील असे आडवे-उभे वाद आपण मराठीत उत्पन्न करून कलाकृतींमधील आशयांचे खून पाडतो, हे आपल्या लक्षातच येत नाही. वि. का. राजवाडय़ांनी सांगून ठेवल्याप्रमाणे : जसे संस्कृती तसे हत्यार : हे जर का खरे असेल; तर अखेर सत्य स्वीकारताना आपणास लज्जा का वाटते? पर्यावरणच नागडं झालेलं असेल; काळाचीच ही चड्डी काढून घेतलेली असेल; तर अश्लीलतेला आपण दाबणार कुठंवर? यासंबंधीचे प्रज्ञावान उत्तर समस्त या माणसांना दिवटेंची कविता देते. त्यामुळेच दिवटेंच्या कवितेच्या शब्दांत येणारी अश्लीलता सभ्य वाटते. ती असभ्य नाही. कारण इथे राजाच नागडा आहे! शिवाय, वाममार्ग, वामवृत्ती ही जीवनशैली, संवेदनस्वभावच होऊन बसलेली आहे. फरफट हाच स्थायीभाव आहे.
‘आधुनिक’ एवढाच एक शब्द या कवितेच्या देहावर चिकटवून या कवितेचे सामथ्र्य दडपता येण्यासारखे नाही. नवी भाषा घेऊन ही कविता युगाचे संवेदनशून्यत्व नमूद करते, असे म्हणूनही या कवितेचे बहुआयामीत्व चुरगळून टाकता येत नाही.
जशी, सगळी मुंबई ही एकाच कुठल्या लोकलमध्ये बसल्याचे सांगता येत नाही; तसेच काहीसे या दिवटेंकृत कवितांचे आहे!
दिवटेंच्या संग्रहातल्या इतर पुष्कळ कविता एका भव्य अशा सैरभैर संवेदनेला पकडून ठेवतात. अनुभवांचे चौकोनच उसवून टाकणारी, सराईत भाषा फेकून देणारी, सच्च्या जगण्याला कवटाळणारी, अवघ्या व्यवस्थेचंच ‘नापासलेपण’ पकडून ठेवणारी ही कविता आहे. दिवटेंनी यासाठी मोठी ताकद खर्ची घातलेली आहे. देहभर छळणारे आणि विवेकशक्तीत स्फोट घडविण्याचे बळ या कवितेच्या ठायी आहे.
येत्या एक ऑगस्ट रोजी या संग्रहाला पुरस्काराने गौरव होतो आहे, हे समयोचित!
डॉ. केशव सखाराम देशमुख