Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पवारांचा फॉम्र्युला आपसूकच लागू
विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत सोलापूर जिल्हय़ातील दोन मतदारसंघ लुप्त झाले असून, त्याचा फटका राष्ट्रवादी आणि शिवसेनेला बसला आहे. तर आणखी राष्ट्रवादीचे दोन मतदारसंघ राखीव झाल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ६०:४० हा फॉम्र्युला येथे आपोआपच लागू झाल्याचे दिसून येते. त्यातच उरलेल्या मतदारसंघांतील प्रस्थापितांना पवार आता दूर ठेवणार का, हा

 

प्रश्न आहे.
२००४ मध्ये झालेल्या जुन्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ५, शिवसेनेने ४, काँग्रेस, भाजप, माकप, शेकाप या पक्षांनी प्रत्येकी १ जागा मिळविल्या होत्या. आता शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी ६० टक्के नवीन चेहऱ्यांना देण्याचे घोषित करून मंत्री, त्यांचा मुलगा असो किंवा पुतण्या आमदार किंवा खासदार एका घरात राहणार नाहीत, असे जाहीर केले. सोलापूर जिल्हय़ात राष्ट्रवादीच्या पाच मतदारसंघांपैकी मंगळवेढा मतदारसंघ पंढरपूर मतदारसंघाला जोडला गेला आहे. तर माळशिरस व मोहोळ हे दोन मतदारसंघ राखीव झाले आहेत. त्यामुळे आपोआपच पाच पैकी राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांसाठी माढा आणि पंढरपूर हे दोनच मतदारसंघ शिल्लक राहिले आहेत.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून १९८५ पासून सलग पाच वेळा सुधाकर परिचारक हे निवडून आले. तर माढय़ातून आमदार बबनराव शिंदे हे १९९५ पासून सलग तीन वेळा विजयी झाले. त्यामुळे परिचारक आणि शिंदे हे पवार यांच्या ६० टक्क्यांच्या गणितात बसणार का, याशिवाय ग्रामविकासमंत्री विजयसिह मोहिते-पाटील यांचा माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यामुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन कोठे करण्यात येणार, याबद्दलही उत्सुकता आहे. मोहिते-पाटील हे माळशिरसमधून १९८० पासून सलग सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले. ते स्वत: माढा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. तर काँग्रेसवाल्यांनी मोहिते-पाटील यांच्यासाठी सोलापूर दक्षिण हा मतदारसंघ सोडू. त्या बदल्यात माढा आणि पंढरपूर या दोन मतदारसंघांची मागणी केली आहे. असे झाल्यास जिल्हय़ातील राष्ट्रवादीचे वर्चस्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर मतदारसंघातून निवडून आणण्यात राष्ट्रवादीच्या पंढरपूर आणि मोहोळ या दोन मतदारसंघांतील आमदारांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे हे दोन मतदारसंघ तडजोडीत काँग्रेसच्या वाटय़ाला जाणार नाहीत. मात्र पंढरपूर मतदारसंघात आता राष्ट्रवादीतर्फे भारत भालके आणि प्रशांत परिचारक हे इच्छुक आहेत. माढय़ात स्वत: आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे बंधू संजय शिंदे यांची नावे अग्रभागी आहेत. बार्शी मतदारसंघावर २००४ मध्ये शिवसेनेचे राजेंद्र राऊत यांनी कब्जा मिळविला. या मतदारसंघात १९८५ पासून १९९९ पर्यंत सलग चार वेळा दिलीप सोपल हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष असे निवडून आले. त्यांनी पुन्हा या मतदारसंघावर दावा केला आहे. सांगोला मतदारसंघ शेकापच्या ताब्यात असला तरी तेथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी मिळविण्यात जोरदार चुरस आहे. राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे-पाटील आणि काँग्रेसचे माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि सीताराम वाघमोडे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. करमाळा मतदारसंघात सध्या शिवसेनेत आमदार असलेल्या जयवंत जगताप, राष्ट्रवादीच्या रश्मी बागल आणि मोहिते-पाटील गटाचे समसमान वर्चस्व आहे. तेथे रश्मी बागल यांची उमेदवारी अग्रभागी राहील, असे दिसून येते.
एकंदरीत पवार यांच्या ६० टक्के गणिताचा विचार करता मोहिते-पाटील, परिचारक, शिंदे या प्रस्थापितांना कितपत धक्का बसतो, याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे. पवार यांनी ६० टक्क्यांचा फॉम्र्युला जाहीर केला आणि घराणेशाहीबद्दल सूतोवाच केले असले तरी खुद्द त्यांच्या घरापासूनच सत्तेची बीजे रोवली गेली आहेत. त्याबाबत दबक्या आवाजात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतच चर्चा चालू आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी भरल्यापासूनच शरद पवार यांच्याकडे सोलापूर जिल्हय़ातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाची सूत्रे आपसूकच गेली. तसे पाहिले तर पवार यांच्या राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्हय़ातून सुरू झाली. पवार हे अनेक वर्षे सोलापूर जिल्हय़ाचे संपर्कमंत्री होते. ‘पवार बोले, सोलापूर जिल्हा हाले’ अशी परिस्थिती होती. जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्ता आणि त्याची क्षमता याची चांगली जाण या नेत्याला आहे. आता प्रस्थापितांना हलवून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत सोलापूर जिल्हय़ासाठी त्यांना वेगळा विचार करावा लागेल. कारण मोहिते-पाटील हे उत्कृष्ट संघटक आणि संयमी नेते म्हणून सुपरिचित आहेत. त्यांना डावलून जिल्हय़ाचे राजकारण करता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. अलीकडेच जलसंपदामंत्री अजित पवार आणि मोहिते-पाटील यांच्यात दिलजमाई झाल्याचे दिसून आले. स्वत: पवार हे अकलूज येथील कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनीच आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना राज्यसभेवर संधी मिळेल, असे सूचक उद्गार काढले होते. त्यानुसार प्रत्यक्षातही अगदी तसेच घडले.
दुसरीकडे माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे हे पवारनिष्ठ आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांनाही तेथून हलविणे अवघड आहे. राहता राहिले सुधाकर परिचारक. परिचारकांचे पुतणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक हे आता राजकारणात सक्रिय झाल्यामुळे त्यांच्याही नावाचा विचार पंढरपुरात होऊ शकतो. तेथे त्यांना भारत भालके यांचा निश्चित अडथळा होऊ शकेल. परंतु पवारांच्या मनात काय आहे हे थोडय़ाच दिवसांत दिसून येईल. बार्शीत सोपल यांचे चांगले वर्चस्व आहे. तेच राष्ट्रवादीच्या वतीने विरोधकांशी चांगला लढा देऊ शकतील याचीही जाण नेतृत्वाला आहे. त्या दृष्टीने सोपल यांनी यापूर्वीपासूनच विधानसभेची चांगली तयारी केली आहे. त्यामुळे पवारांचा ६०:४० हा फॉम्र्युला सोलापूर जिल्हय़ात मतदारसंघाचे आरक्षण आणि मतदारसंघ लुप्त झाल्यामुळे आपोआपच अमलात येईल, असे दिसून येते.
जयप्रकाश अभंगे