Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

राज्य

द्वितीय नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन
नाशिक, २९ जुलै / प्रतिनिधी

चित्रपट महर्षि दादासाहेब फाळके स्मरणार्थ येथे गुरूवारी आयोजित व्दितीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी पाच वाजता कालिदास कलामंदिरात होणाऱ्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खा. समीर भुजबळ, आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, महापौर विनायक पांडे, आ. बबन घोलप, अभिनेते सचिन खेडेकर, मकरंद अनासपुरे, छायाचित्रकार देबू देवधर, माहिती उपसंचालक शिवाजी मानकर, आयोजक मुकेश कणेरी उपस्थित राहणार आहेत.

‘सिमी’च्या बैठकप्रकरणी पोलीस अडचणीत
अकोला, २९ जुलै / प्रतिनिधी

‘सिमी’ संघटनेच्या माना येथील बैठकीत सहभागी झालेल्या आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यापैकी चार जणांविरुद्ध पुरावे न सापडल्यामुळे पोलीस अडचणीत आले आहेत.
‘सिमी’ संघटनेच्या माना येथे पार पडलेल्या बैठकीत ३० ते ३५ कार्यकर्ते सहभागी झाले होते. यातील आठ कार्यकर्त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु, यापैकी चौघा जणांविरुद्ध पुरावे न सापडल्यामुळे पोलीस अडचणीत आले आहेत.

राज्य शासनाकडून महिला आयोगाची उपेक्षा
नागपूर, २९ जुलै / प्रतिनिधी

महिलांना राजकारणात ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचे विधेयक अद्याप संसदेत संमत होऊ शकले नसल्यामुळे महिलांचे महत्त्व मान्य करण्याबाबत राजकीय नेते कितपत गंभीर आहेत हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. राज्य महिला आयोगाची किती उपेक्षा होत आहे, हे पाहिले तर महिलांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचाच मुद्दा अधोरेखित होतो. आयोगाने अनुदानाची रक्कम वाढवून मागितली असली तरी सरकारने ती अद्याप मंजूर केलेली नाही.

कोकणात जलविद्युत प्रकल्पांसाठी ४० प्रस्ताव
सावंतवाडी, २९ जुलै/ वार्ताहर

कोकणात पाण्यावर वीज निर्माण करण्यासाठी बीओटी तत्त्वावर ४० प्रस्ताव आले आहेत. त्यातील १३ प्रस्तावांना मान्यता दिली असून, सर्व प्रस्ताव मंजूर झाल्यास ६० मेगाव्ॉट वीज तयार होईल, अशी माहिती कोकण प्रदेश पाटबंधारे मुख्य अभिंयता बी.बी. पाटील यांनी दिली. कोनाळ व देवगड येथे १४ मेगाव्ॉट वीज प्रत्यक्षात तयार होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोनाळ धरणात १२ मेगाव्ॉट व देवगड धरणात दोन मेगाव्ॉट वीज निर्माण केली जात आहे.

महाडमध्ये पाण्यासाठी महिलांचा पालिकेसमोर हल्लाबोल
महाड, २९ जुलै/ वार्ताहर

महाड शहरांतील कोट आळी परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अखेरीस त्या भागांतील महिलांनी प्रशासनाचा जाहिर निषेष केला. पालिकेने त्वरित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अन्यथा पाणीपट्टी भरली जाणार नाही, असा निर्णय सर्व महिलांनी घेतला असल्याचे कोट आळी मधील सामाजिक कार्यकर्त्यां मयुरा मांगडे यांनी सांगितले. शहरांच्या दक्षिण भागामध्ये सुमारे दीड हजार लोकवस्ती असलेला कोट आळी परिसर आहे.

सुवर्णकार युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र जाधव
नाशिक, २९ जुलै / प्रतिनिधी

भारतीय सुवर्णकार समाज युवक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी येथील रवींद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने राज्यातील युवकांचे मजबूत संघटन उभे करण्याचा मनोदय जाधव यांनी व्यक्त केला. सुवर्णकार युवक हा बेरोजगारीने त्रस्त असून त्याला रोजगार प्राप्त करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. सामाजिक, शैक्षणिक व राजकीयदृष्टय़ा सुवर्णकार समाज हा उपेक्षित राहिला आहे. या क्षेत्रात समाजाचे अस्तित्व अधोरेखीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जाधव यांनी म्हटले आहे. नियुक्तीप्रसंगी नामदेव देवरे, एम. के. रजपूत, रामचंद्र येरपुडे, अनिल वाघाडकर, रवींद्र मैंद, रामदास जाधव, पद्माकर दुसाने, शाम आडगावकर आदी उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल प्रसाद आडगावकर, दत्ता कपिले, प्रकाश सोनार, चंद्रकांत विसपुते आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

पोलीस उपनिरीक्षक व हवालदारास लाच घेताना अटक
नाशिक, २९ जुलै / प्रतिनिधी

मित्रावर होणारी प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडून सहा हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या येथील अंबड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक माधव देशमुख व हवालदार यशवंत शिंदे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदाराच्या मित्रावर अंबड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.