Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

ठाणे पालिकेची नोकरभरती वादाच्या भोवऱ्यात
संजय बापट

मनाला वाटेल तेव्हा नोकरभरती करणे, त्यासाठी मनमानी अटी, शर्ती टाकणे आणि प्रकरण अंगाशी येताच संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करून पुन्हा नव्या भरतीचा श्रीगणेशा करण्याची नवी पद्धत ठाणे महापालिकेत सुरू झाली आहे, त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो बेरोजगारांची घोर फसवणूक होत असल्याने पालिकेची नोकरभरती मोहीम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

भिवंडीच्या विकासासाठी पालिका प्रशासन कटिबद्ध - बोरसे
भिवंडी/वार्ताहर

आगामी काळात महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच केंद्र व राज्य शासन यांच्याकडून अधिकाधिक योजना मिळविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त प्रकाश बोरसे यांनी दिली. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासंदर्भातील उपाययोजनांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, शहरातील पाणपट्टी व घरपट्टीची थकबाकी राहू नये याकरिता कर्मचाऱ्यांना प्रश्नेत्साहित करून वसुलीची विशेष मोहीम राबविण्यात आली. यातून मार्चअखेरीस २५.३४ कोटीची वसुली करण्यात आली.

२०० शिवसैनिक नेत्रदानासाठी झाले तयार !
ठाणे/प्रतिनिधी: देशात २० लाख अंधांना आणि महाराष्ट्रात दोन लाख अंध व्यक्तींना नेत्रांची आवश्यकता आहे. मुंबईत जे. जे. रुग्णालयात ८०० अंध नेत्रबुब्बुळाच्या प्रतीक्षेत आहेत. नेत्रदानाची चळवळ आता घराघरात पोहोचायला हवी. नेत्रदान वाढले तरच अंधांना नवीन दृष्टी मिळू शकेल. देशात एकही नेत्रहीन राहू शकणार नाही, नेत्रदान सर्वांनी करावे, असे आवाहन प्रख्यात नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.

याद ना जाए..
गडकरीत उद्या रंगणार ‘फिर रफी’
ठाणे/प्रतिनिधी
जुलै महिना उजाडला की संगीतप्रेमींना गझलसम्राट मदन मोहन यांच्या समवेत याद येते ती मो. रफी यांची! सुबह न आई, याद ना जाए, कभी खुद पे, रंग और नूर की, आज पुरानी राहोंसे, ये दुनिया ये महफिलपासून ते चाहे कोई मुझे.. पर्यंत असंख्य सदाबहार गाणी देणाऱ्या रफीसाहेबांची ३१ जुलै रोजी पुण्यतिथी असून, या दिवशी ठाण्यातील ‘विराट’ या संस्थेतर्फे ‘फिर रफी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम अखेर जमीनदोस्त
वृत्तान्त इफेक्ट
ठाणे/प्रतिनिधी

पालिका मुख्यालयात विरोधी पक्षनेत्यांच्या प्रशस्त कार्यालयासाठी करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम अखेर जमीनदोस्त करण्यात आले.महापालिकेत महापौरांच्या दालनाला लागूनच विरोधी पक्षनेत्याचे कार्यालय आहे. महापौरांप्रमाणेच आपलेही कार्यालय प्रशस्त असावे, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केल्यानंतर पालिकेत अनधिकृत बांधकाम सुरू होते. त्या संदर्भात ‘अनधिकृत कार्यालयातून चालणार विरोधी पक्षनेत्यांचा कारभार’ असे सचित्र वृत्त ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध होताच पालिकेत खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही याची गंभीर दखल घेत अनधिकृत बांधकामाच्या कार्यालयात विरोधी पक्षनेता बसणार नाही, असे जाहीर केले होते.अखेर हे वाढीव बांधकामच तोडून टाकण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर काल सर्व वाढीव बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

डावखरेही आता भ्रष्टाचारविरोधी लढय़ात
ठाणे / प्रतिनिधी
ठाणे महापालिकेत सुरू असलेला ४१ टक्क्यांचा भ्रष्टाचार आनंद दिघे यांनी उघड केला. तरीही ठाण्यातील भ्रष्टाचार कमी झालेला नाही. या भ्रष्टाचाराविरुद्ध आता आपणच आवाज उठवणार असून लवकरच ठाणे पालिकेतील भ्रष्टाचार उघड केला जाईल, अशी गर्जना विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी केली. ठाणे पूर्व येथील धोबीघाट परिसरात झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुल योजनेचे भूमिपूजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. ठाण्यातील विकास प्रकल्प राबवण्यात प्रशासन अपयशी ठरले असून पालिका केवळ टक्केवारीत गुंतली आहे. भ्रष्टाचाराच्या एका मोठय़ा प्रकरणाचा पर्दाफाश आपण लवकरच करणार असून त्याच्या मागे सध्या लागलो असल्याचे सूतोवाच डावखरे यांनी केले. निवडणूक आणि नंतरचे अधिवेशन यामुळे आपणास ठाण्याकडे विशेष लक्ष देता आले नाही, मात्र आता पालिकेतील टक्केवारी आणि भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यानी सांगितले. यावेळी कल्याण लोकसभा क्षेत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचा डावखरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेनेचा ठाण्याचा गड पडला असला तरी, कल्याणचा गड राखण्यात सेनेला यश आले. त्याची बक्षिसी लांडगे यांना मिळाली, त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत असल्याचे डावखरे यांनी सांगितले.

सिद्धकलाचे संगीतकार अनिल मोहिले पुरस्कार जाहीर
ठाणे प्रतिनिधी: येथील सिद्धकला संगीत अकादमीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संगीतकार अनिल मोहिले पुरस्कार जाहीर झाले असून रविवार, ९ ऑगस्ट रोजी सहयोग मंदिर सभागृह, दुसरा मजला, घंटाळी, नौपाडा येथे आयोजित एका सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यंदा गायक अनिल हजारे, गायिका नीलाक्षी पेंढारकर, संगीत संशोधक डॉ. विद्याधर ओक आणि तालवादक ज्ञानेश्वर ढोरे यांना संगीतकार अनिल मोहिले पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. सुप्रसिद्ध गायक वसंत आजगांवकर प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात डॉ. विद्याधर ओक त्यांनी संशोधित केलेल्या २२ श्रुतींच्या हार्मोनियमवर अकॉर्डियन इंस्ट्रमेंटचे स्वर वाजवून दाखविणार आहेत, तसेच हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे डॉ. किशोर भिसे यांनी केले आहे.

दीड लाख फोटो ओळखपत्रांचे वाटप
ठाणे/प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदारांना छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र देण्याचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू असून, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील तीन लाख १४ हजार १६१ पैकी आतापर्यंत सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक मतदारांची ओळखपत्रे तयार झाल्याची माहिती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व अप्पर तहसीलदार आर.के. सायगावकर यांनी दिली.केंद्रीय निवडणूक आयोगाने फोटो असलेली ओळखपत्रे मतदारांना देण्याचे काम १९९४ साली सुरू केले, परंतु मध्यंतरीच्या काळात या कामाला म्हणावी तेवढी गती आली नाही. आता तब्बल १५ वर्षांनंतर या कामाला निवडणूक आयोगाने प्रश्नधान्य दिले असून, त्याची जास्तीत जास्त अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात केला जात असल्याचे सायगावकर म्हणाले. छायाचित्र असलेले ओळखपत्र तयार करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्जवाटप केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचे मुख्य केंद्र वागळे इस्टेटमधील आयटीआय येथे सुरू करण्यात आले आहे. जी ओळखपत्रे तयार झाली आहेत, त्यापैकी काहींचे वाटप नुकतेच सायगावकर आणि नायब तहसीलदार राजेंद्र सपकाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उर्वरित ओळखपत्रांचे वितरणही लवकरच केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगररचना विभागातील सात कोटींची हेराफिरी
प्रस्ताव ३० जुलैच्या महासभेत मंजुरीला

कल्याण/प्रतिनिधी - नवीन बांधकाम परवानगी देताना अधिमूल्य वसूल करताना ज्या विकासकांनी योग्य अधिमूल्य भरणा केले नाही, ते त्यांच्याकडून वसूल करावे अन्यथा नगररचना विभागातील ज्या अधिकाऱ्यांनी ठरावाचा विपर्यस्त अर्थ लावून पालिकेचे साडेसहा कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले आहे, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून ते त्यांच्याकडून वसूल करावे, असा ठराव स्थायी समितीने केला असून, यासंदर्भातला प्रस्ताव ३० जुलैच्या महासभेत मंजुरीला आला आहे. सर्व पक्षीय नगरसेवक हा विषय बिल्डरांच्या आमिषाला बळी पडून दाबून टाकतात की, आर्थिक कोंडीत सापडलेल्या पालिकेला वाचविण्यासाठी कंबर कसतात, याकडे १२ लाख जनतेच्या नजरा लागल्या आहेत. सर्व पक्षीय नगरसेवक नेहमीच पालिकेच्या आर्थिक हिताचा विचार करून महासभेत पोटतिडकीने बोलत असतात, त्यामुळे नगररचना विभागाने पालिकेचे सात कोटीचे नुकसान केले असताना, हे सर्व पक्षीय नगरसेवक ३० जुलैच्या महासभेत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

चित्रकला स्पर्धेस उत्तम प्रतिसाद
डोंबिवली/ प्रतिनिधी

येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या हीरक महोत्सवी उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. रविवारी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली. शहरातील विविध शाळांमधील एक हजार ५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. त्यात प्रश्नमुख्याने सिस्टर निवेदिता, चंद्रकांत पाटकर, मॉडेल इंग्लिश आदी शाळांचा सहभाग होता. या स्पर्धेतील पारितोषिकप्रश्नप्त चित्रे ३० ऑगस्ट रोजी सुयोग मंगल कार्यालयात प्रदर्शनरूपात मांडण्यात येणार आहेत. पारितोषिक वितरण समारंभ शनिवार २ सप्टेंबर रोजी सुयोग मंगल कार्यालयात रात्री नऊ वाजता होईल. श्रीराम करंदीकर परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. पारितोषिके रोटरी क्लब ऑफ डोंबिवली (सिटी) या संस्थेने पुरस्कृत केली आहेत.

‘शिवाई’ मिनी मॅरेथॉनमध्ये सोनाली कदम प्रथम
डोंबिवली/प्रतिनिधी - शिवाई बालक मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धेत पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. चंद्रकांत पाटकर शाळेच्या सोनाली कदम हिने या स्पर्धेतील आपल्या हॅट्ट्रिकचा उच्चांक मोडून चौथ्यांदा या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. एमआयडीसीत आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा एकूण दहा गटात घेण्यात आली. या स्पर्धेत डोंबिवली परिसरातील ७५ शाळा सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाला मॅरेथॉनपटू सुरेश ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन जुईकर, उद्योजक दिनेश भामरे, वरिष्ठ निरीक्षक सुभाष दिवेकर, अ‍ॅड. शशिकांत ठोसर उपस्थित होते. दहा किलोमीटरच्या स्पर्धेत ओमप्रकाश चौधरी (अभिनव विद्यालय), सिध्दार्थ कदम(अभिनव), जगदीश गावडे यांनी यश मिळवले. आठ किलोमीटर स्पर्धेत सोनाली कदम (पाटकर) हिने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील इतर विजेते - श्वेता बाविकर, नम्रता चकोर, वैभवी विसपुते, रिध्दी रामजाकवा, साधना बोराडे, क्षितिजा उतेकर, कृष्णा भावा, रामशंकर शिंदे, बंटी कांबटे, प्रथमेश पाटील, गोविंद गुप्ता, गीता शेलवले, राहुल नागरे, तनिष्का नायर, कृष्णा थापा, सिध्दार्थ कदम, सिकंदर गुप्ता, प्रणाली घरत, किरण गरूड, अपेक्षा पाटील, गौरव तळपाडे, शरयू पोळ, राम शिंदे, पूजा मानकर, मयूर बोराडे, विजय पवार, आरती भोईर, बंटी कांबळे यांनी यश मिळवले आहे.

कार्यशाळेत साकारल्या २१ इको फ्रेंडली गणेशमूर्ती
बदलापूर/वार्ताहर : बदलापूर रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल एरिया (वुमेन्स) आणि पर्यावरण दक्षता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत दिवसभरात सहभागी झालेल्यांनी २१ गणेशमूर्ती बनवण्यात आल्या.क्लबच्या वतीने डॉ. सुषमा समेळ, अपर्णा मैंद, स्वाती खिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पर्यावरण दक्षता मंचतर्फे गणेश अडवळ, आदित्य इंदळेकर, आदित्य पवार यांनी गणेशमूर्त्यां कशा बनवायच्या, त्यासाठी लागणारा कागदी लगदा आणि शाडूच्या मातीचे मिश्रण याची माहिती दिली आणि नंतर घाटकोपर, गिरगावपासून सहभागी झालेले आबालवृद्ध तहानभूक विसरून गणेशमूर्ती करण्यात तल्लीन झाले होते.संजीवनी मंगल कार्यालयात रविवारी बनवण्यात आलेल्या मूर्तींना ऑगस्टमध्ये आकर्षक रंगाने रंगवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. डॉ. समेळ, अपर्णा मैंद, स्वाती खिरे आदीनींही गणेशमूर्ती बनविल्या.पर्यावरणाचे दिवसेंदिवस होणारे नुकसान टळावे यासाठी क्लबतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. इको फ्रेंडली गणेशमूर्त्यां बनवणे, तसेच गणपती दिवसात जमा होणाऱ्या निर्माल्यामधून खत निर्मिती करण्यासाठी जनजागृती करण्याचा मनोदय डॉ. सुषमा समेळ तसेच अपर्णा मैंद यांनी बोलून दाखवला.

नानासाहेब धर्माधिकारी स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण
वाडा/वार्ताहर

महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोऱ्हे येथे श्रीसमर्थ श्री बैठक गोऱ्हे यांच्या सौजन्याने मोठय़ा स्वरूपात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गोऱ्हे ग्रामपंचायतीच्या सरपंच अंकिता टोपले तसेच गोऱ्हे परिसरातील श्री समर्थदास व दासींच्या हस्ते येथील माध्यमिक विद्यालय, प्रश्नथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
मोफत वह्यांचे वाटप
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील शिवसेना शहर शाखेच्या विद्यमाने जिल्हा परिषदेच्या सोनारपाडा, मोंढय़ाचा पाडा या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक संदीप पवार, वाडा शहर अध्यक्ष नीलेश गंधे, तुषार यादव आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.