Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

व्यक्तिवेध

कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी घेतलेली छायाचित्रे पाहून हृषिकेश मुखर्जीनी ‘अनुराधा’ या आपल्या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेसाठी लीला नायडू या तरुणीशी करार केला आणि चित्रपटरसिकांमध्ये कुतूहलाची एक लहर उमटत गेली. तत्पूर्वी लीला नायडूने ‘मिस इंडिया’चा मुकुट मिळविला होता आणि ‘व्होग’ नियतकालिकाने त्या वेळच्या जगातल्या दहा सुंदर स्त्रियांची जी सूची प्रसिद्ध केली होती तिच्यात तिचा समावेश होता. तिच्याबरोबर या सूचीत आणखी एक भारतीय नाव होते, ते म्हणजे जयपूर महाराणी गायत्री देवी यांचे. लीला नायडू प्रसिद्ध न्यूक्लिअर शास्त्रज्ञ रामैया नायडू यांची कन्या. तिची आई फ्रेंच-आयरिश होती. ‘अनुराधा’ची नायिकादेखील उच्चभ्रू आधुनिक पित्याची एकुलती कन्या होती. सतारवादन आणि गायनात निपुण आणि त्या क्षेत्रात करिअर करू पाहणारी. पण ती एका मध्यमवर्गीय ध्येयवादी डॉक्टरच्या प्रेमात पडते आणि लग्न करते. डॉक्टर (बलराज साहनी)

 

ग्रामीण गरीब जनतेच्या सेवेचे व्रत घेऊन खेडय़ात जातो आणि हळूहळू खेडय़ाच्या परिसरात अनुराधाला आपले जीवन व्यर्थ चालल्याची खंत कुरतडू लागते.. पतीच्या ध्येयवादाचे मोल तिला आणि तिच्या त्यागाचे महत्त्व त्यालाही यथावकाश कळते. लीला नायडू निर्विवाद देखणी तर होतीच. तिचा अंतर्मुख भासणारा चेहरा आणि व्यक्तिमत्त्वातली सहज गर्भश्रीमंती (जी अभिनिविशेयुक्त नवश्रीमंतीत कधी दिसत नाही!) ‘अनुराधा’च्या व्यक्तिरेखेत चपखल बसली होती. साच्याबाहेरचे कथानक असलेला ‘अनुराधा’ बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही; पण त्यातले पं. रविशंकर यांचे संगीत गाजले, गाजत राहिले आणि चित्रपटाला ६० सालचा सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपती सुवर्णपदक मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट, त्याचे संगीत आणि त्यातली नवी देखणी नायिका लीला नायडू सर्वच चर्चेत राहिले. त्यानंतर १९६३ मध्ये इस्माइल र्मचट यांच्या आयव्हरी- र्मचट्स प्रॉडक्शनच्या द ‘हाऊसहोल्डर’ (इंग्रजी आणि हिंदी) मध्ये शशी कपूरच्या नवपरिणीत पत्नीची भूमिका तिने केली. हा चित्रपट आणि त्यातली तिची भूमिकादेखील पठडीबाहेरचीच होती. तसेच लीला नायडूचा उल्लेख येताच आठवणारा आणखी एक चित्रपट म्हणजे आर. के. नय्यर दिग्दर्शित ‘ये रास्ते हैं प्यार के’. त्या वेळी गाजलेल्या नानावटी खटल्यावर आधारित ‘ये रास्ते हैं प्यार के’ मधली पतीची प्रतारणा करणाऱ्या नायिकेची अपारंपरिक अशी भूमिका त्या वेळच्या अनेक अभिनेत्रींनी नाकारली आणि लीला नायडूने ती आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या सहजतेने साकारली. इमेजची काळजी करण्याची तिला कधी गरज वाटली नाही. नृत्यकुशलतेच्या अभावी ‘गाइड’मधली रोझीची भूमिका तिच्या हातून निसटली. पुढे ‘द गुरू’मध्ये पाहुणी कलाकार म्हणून ती दिसली. लीला नायडू चित्रपटसृष्टीत आली, पण इथल्या चाकोरीत फिरत राहिली नाही. पहिल्या दोन-तीन चित्रपटांनंतर ओबेरॉय हॉटेल समूहाच्या तिलकराज ओबेरॉय यांच्याशी विवाह करून तिने चित्रपटसृष्टी सोडली. पुढे घटस्फोट झाला आणि पत्रकार डॉम मोराएस यांच्याशी तिने विवाह केला. दहा वर्षे ती हाँगकाँगमध्ये राहिली. तिथे तिने काही रेडिओ प्रोग्रॅम केले. तिथल्या चित्रपटांसाठी डबिंगही ती करीत असे. बऱ्याच काळानंतर श्याम बेनेगल यांच्या ‘त्रिकाल’मध्ये गोव्यातल्या कॅथलिक ख्रिश्चन कुटुंबातल्या वर्चस्व गाजविणाऱ्या कर्त्यां प्रौढ स्त्रीची मध्यवर्ती भूमिका तिने केली. १९९२ सालचा प्रदीप किशन दिग्दर्शित ‘इलेक्ट्रिक मून’ हा इंग्रजी चित्रपट तिचा शेवटचा चित्रपट. ती भारतीय चित्रपटसृष्टीत होती आणि नव्हतीही.. उत्तरार्धात जे. कृष्णमूर्तीचं अनुयायित्व तिनं मनोमन स्वीकारलं. तिचं सौंदर्य, तिचे मोजके चित्रपट, साच्याबाहेरच्या भूमिका आणि अंतर्मुख स्वभावशैली यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाभोवती नेहमीच गूढाचं एक वलय फिरत राहिलं ते अखेपर्यंत. मंगळवारी मुंबईत शांतपणे तिचं निधन झालं, लीला नायडू पंचत्वात विलीन झाली तीही ते गूढ वलय घेऊनच.