Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

मिनीट्रकची जीपला धडक; ३ भाविक ठार, ८ जखमी
हिवरखेडजवळ भीषण अपघात
खामगाव, २९ जुलै / वार्ताहर
भरधाव मिनीट्रकने जीपला धडक दिली. यामध्ये जीपमधील दोन महिला व चालक जागीच ठार तर ११ महिला जखमी झाल्या आहेत. त्यापैकी ८ महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. हा भीषण अपघात खामगाव ते चिखली मार्गावरील हिवरखेड शिवारात मंगळवारी रात्री ९ वाजतादरम्यान घडला. साखरखेर्डा येथील १५ महिला मॅक्स जीपने (एमएच२८-३४९१) शेगावला जाण्यासाठी खामगावपर्यंत आल्या. खामगाव येथून महिला पहाटेच संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत शेगावला गेल्या.

‘विकास व पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक’


चंद्रपूर,२९ जुलै/ प्रतिनिधी

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळील प्रस्तावित अदानी समूहाच्या कोळसा खाणीच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन आता व्यापक होत चालले आहे. बंदच्या माध्यमातून जनतेने हा मुद्दा उचलून धरल्याने आंदोलकांना बळ मिळाले असले असून समाजमनात प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर काही मान्यवरांच्या या प्रतिक्रिया विकास आणि पर्यावरणावर सध्या गाजत असलेल्या मुद्यावर प्रकाश टाकणाऱ्या आहेत.

अमरावती विभागात पेरण्या आटोपल्या
कपाशी व तुरीच्या लागवड क्षेत्रात वाढ
अमरावती, २९ जुलै / प्रतिनिधी
अमरावती विभागातील पाच जिल्ह्य़ांमध्ये महिनाभर झालेल्या चांगल्या पावसामुळे ९८ टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या असून गेल्यावर्षीच्या तुलनेत कपाशी आणि तूर पिकांच्या क्षेत्रात झालेली वाढ हे यंदाच्या खरीप हंगामाचे वैशिष्टय़ ठरले आहे. विभागात खरिपातील लागवडीखालील क्षेत्र ३२ लाख हेक्टर असून २८ जुलैअखेर ३१ लाख २२ हजार ६०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. विभागात मान्सूनचे आगमन बरेच उशिरा झाले. पूर्ण जून महिना कोरडा गेला. पावसाला सुरुवात झाल्यापासून शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला सुरुवात केली. जुलै महिन्यात सर्वदूर पाऊस झाला.

तांत्रिक शिक्षण काळाची गरज -प्रफुल्ल पटेल
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय लोकार्पण सोहोळा
गोंदिया, २९ जुलै / वार्ताहर
शासकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण कमी वेळात होणारा खरा विक्रम आहे. जिल्ह्य़ात तंत्रशिक्षण घेणाऱ्या मुलांची उणीव भासत असता या तंत्रनिकेतन महाविद्यालयामुळे प्रत्येक वर्षी २४० विद्यार्थी तांत्रिक शिक्षण घेणार, त्यातील ६० टक्के जागा जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित राहील, यामुळे जिल्ह्य़ाचा विकास चौमुखी होऊ शकेल. कारण तांत्रिक शिक्षण हे आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी केले.

चौघांविरुद्ध पुरावे नाहीत; पोलीस अडचणीत
‘सिमी’ बैठक प्रकरण
अकोला, २९ जुलै / प्रतिनिधी
‘सिमी’ संघटनेच्या माना येथील बैठकीत सहभागी झालेल्या आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यापैकी चार जणांविरुद्ध पुरावे न सापडल्यामुळे पोलीस अडचणीत आले आहेत.
‘सिमी’ संघटनेच्या माना येथे पार पडलेल्या बैठकीत ३० ते ३५ कार्यकर्ते सहभागी झाले होते. यातील आठ कार्यकर्त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु, यापैकी चौघा जणांविरुद्ध पुरावे न सापडल्यामुळे पोलीस अडचणीत आले आहेत. पोलिसांच्या तपासातील ढिसाळपणाचा फायदा आरोपींना मिळाला आहे.

विकास न झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी गावाचे नाव बदलले
‘बिंबी’ झाले ‘चिखलगाव’
चंद्रपूर, २९ जुलै/प्रतिनिधी
आमदाराच्या गावात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य बघून संतापलेल्या गावकऱ्यांनी गावाचे नामकरण ‘चिखलगाव’ असे केल्याचा प्रकार राजुरा विधानसभा मतदारसंघात घडला.
आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, कोरपना पंचायत समितीचे सभापती साईनाथ कुळमेथे व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा दत्तक गाव म्हणून बिंबी या गावाची ओळख आहे. गावात एकही पक्का रस्ता, नसल्यामुळे पावसाळय़ात लोकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गावावर २५ वष्रे शेतकरी संघटनेची सत्ता होती.

पिंपळगावात प्रशासनाची प्रतिकात्मक तेरवी, सचिव निलंबित
यवतमाळ, २९ जुलै / वार्ताहर

शहराला लागून असलेल्या पिंपळगाव ग्रामपंचायतमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच, सचिव व दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी गजानन भडके यांच्या नेतृत्वाखाली १४ जणांनी मुंडण करून प्रशासनाची प्रतिकात्मक तेरवी केली. १३ दिवसांपासून आंदोलकांचे उपोषण सुरू होते. तेरवीनिमित्त चारशेवर गरिबांना जेवण देण्यात आले. गजानन भडके यांना कावीळची लागण झाली असून बुधवारी त्यांच्या मुलावर शस्त्रक्रिया असल्याने रुग्णालयात हजर राहता यावे म्हणून भडके यांनी उपोषण सोडले. दरम्यान, महिलांचे आंदोलन सुरूच असून ग्रामपंचायत सचिवाला निलंबित करण्यात आले आहे.

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
साकोली, २९ जुलै / वार्ताहर
लाखनी तालुक्यातील पोहरा येथील शेतशिवारात रेखा राजकुमार नेवारे या महिलेला सर्पदंश झाल्याने दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.रेखा नेवारे पोहरा शेतशिवारात रोवणीच्या कामाकरिता गेली असता अचानक सापाने चावा घेतल्याचे लक्षात येताच उपचारासाठी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मृत्यू झाला. मरण पावलेली महिला भूमिहीन शेतमजूर असल्याने शेतकरी अपघातात विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी लाखनी तालुका शिवसेना प्रमुख सुनील गिऱ्हेपुंजे यांनी केली.
रेखा नेवारेच्या पश्चात ९ वर्षाची मुलगी व ५ वर्षाचा मुलगा आहे. या गरीब महिलेच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

महागाई विरोधात भाकपचे उपविभागीय अधिकाऱ्याला निवेदन
गोंदिया, २९ जुलै / वार्ताहर
सर्वसामान्यांचे कंबरडे मोडून सोडलेल्या महागाईच्या विरोधात येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना मागण्यांचे निवेदन दिले. भाकपचे जिल्हा सचिव हौसलाल रहांगडाले, मिलिंद गणवीर, रामचंद्र पाटील, प्रल्हाद उके, करुणा गणवीर व जशोदा राऊत यांच्या नेतृत्वात आयोजित या धरणे आंदोलनात दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईवर आळा घालून जीवनावश्यक वस्तूंची स्वस्त धान्य दुकानातून वितरण करण्याची मागणी केली. साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य उत्तम प्रतीचे असावे व धान्यात होणारी भेसळ रोखण्याकरिता जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करावी आदी मागण्या उचलून धरल्या.

आमदार मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्त आज कार्यक्रम
चंद्रपूर, २९ जुलै/प्रतिनिधी

भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या ४८ व्या वाढदिवसानिमित्त ३० जुलैला विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.गेले तीन कार्यकाळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे मुनगंटीवार आता मतदारसंघ राखीव झाल्याने दुसऱ्या मतदारसंघात जाणार आहेत. त्यांच्या या कामगिरीचा गौरव करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गांधी व किशोर जोरगेवार यांनी दिली. या निमित्ताने शहरातील ४८ मंदिरात अभिषेक करण्यात येणार असून मशीद, चर्च व बौध्द विहारांमध्ये त्या त्या धर्माच्या परंपरेनुसार कार्यक्रम होतील. पडोली व गिरनार चौकात रक्तदान शिबीर, शासकीय रुग्णालयात फळवाटप, ऑटो संघटनेतर्फे गरिबांना भोजनदान, वृक्षारोपण व लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

अबॅकस स्पर्धेत तुमसरच्या विद्यार्थ्यांचे सुयश
तुमसर, २९ जुलै / वार्ताहर
राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस अंकगणित स्पर्धेत तुमसरच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. गामा अबॅकस अकादमी त्रिशुर केरला यांनी राष्ट्रीय स्तरावर अंकगणित बौद्धिक स्पर्धा इंडोअर स्टेडिअम, त्रिशुर येथे आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह एकूण सहा राज्यातील गामा अबॅकस अकादमीच्या ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी भाग घेतला स्पर्धेमध्ये १० मिनिटात १०० अंकगणित प्रश्न अचूक सोडाविण्याचे लक्ष्य दिलेले होते. प्रश्न कोणत्याही इलेक्ट्रॉनिक यंत्राचा वापर न करता सोडवायचे होते. स्पर्धेकरिता गामा अबॅकस अकादमी शाखा-तुमसरच्या १५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यात लेव्हल-एक गटात निशांत भगत याने प्रथम पारितोषिक प्रश्नप्त केले. त्याच गटात उत्कर्ष मंडपे याने तृतीय पारितोषिक प्रश्नप्त केले आहे. लेव्हल तीन या गटात हितेषा अग्रवाल हिने तृतीय पारितोषिक प्रश्नप्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय गामा अबॅकस अकादमी शाखा तुमसरचे प्रशिक्षक अजय गजाननराव निनावे व वीणा निनावे यांना दिलेले आहे.

खामगाव नगरपालिकेच्या जनता दरबारात २७ तक्रारींचा निपटारा
खामगाव, २९ जुलै / वार्ताहर
जनतेच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण होऊन त्यांची समस्या लवकरात लवकर दूर होण्याच्या दृष्टीने खामगाव नगरपालिकेच्यावतीने प्रत्येक सोमवारी जनता दरबाराचा उपक्रम राबवण्यात येत आहे.
खामगाव नगरपालिकेच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात नगराध्यक्ष अशोक सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जनता दरबार आयोजित करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष व नगरसेविका सरस्वती खासने, मुख्याधिकारी नीलेश देशमुख, उपमुख्याधिकारी कुशल छाजेड, नगरसेवक अन्सारखाँ उपस्थित होते.या जनता दराबारात शहरातील विविध प्रभागातील २० तक्रारी प्रश्नप्त झाल्या. मागील जनता दरबारात प्रश्नप्त झालेल्या तक्रारींपैकी २७ तक्रारींचे निराकरण करण्यात आले हे विशेष! तक्रारकर्त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात आल्यामुळे त्या तक्रारकर्त्यां नागरिकांनी समाधान व्यक्त केले. जनता दरबारात प्रश्नप्त झालेल्या तक्रारींचे एक आठवडय़ाच्या आत निरसन करण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्ष अशोक सानंदा यांनी तक्रारकर्त्यांना दिले.

राजेश मून यांची उपोषण मंडपास भेट
चंद्रपूर, २९ जुलै / प्रतिनिधी
लोहारा येथील प्रस्तावित अदानी ग्रुपच्या कोळसा खाणीमुळे संपूर्ण देशात आधीच प्रदूषणाच्या उच्चांकावर असलेल्या शहराच्या प्रदूषणात आणखी भर पडू नये तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षणाकरिता आरंभलेल्या आंदोलनास पाठिंबा देत भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मून यांनी नुकतीच जिल्हा परिषदेच्या समोर अन्नत्याग सत्याग्रहास बसलेले बंडू धोतरे यांच्या उपोषण मंडपास भेट दिली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राजेश मून यांनी पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून या बाबीवर गंभीर असण्याची गरज प्रतिपादित केली. ग्लोबल वार्मिगने संपूर्ण जग चिंतेत असताना लोहारालगतचे दुर्मिळ घनदाट जंगल व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला वाचवलेच पाहिजे. राजेश मून यांच्यासोबत यावेळेस आशीष घुमे, मुकेश भांडेकर, किशोर खंडाळकर, संदीप जीवने आदी होते.

समता परिषदेची निळू फुलेंना श्रद्धांजली
परतवाडा, २९ जुलै / वार्ताहर

ज्येष्ठ रंगकर्मी व चित्र अभिनेते निळू फुले यांना अचलपूर तालुका महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. परिषदेच्या कांडलीस्थित कार्यालयात शनिवारी झालेल्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निळू फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. या बैठकीला परिषदेचे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष सुशील गणोरकर, अचलपूर तालुका प्रभारी राजेश अडणीकर, अरुण गणोरकर, गणेश बेलसरे, राजेश लव्हाळे, राजेंद्र भागवत, मुकिंद किटुकले, श्रीहरी मेशकर, विनोद टेंभे, प्रश्न. सुधीरपंत सोनार, भास्कर वासनकर, महिला आघाडीच्या शारदा गणोरकर, जयश्री टेंभे, शीला चर्जन, विजय खोब्रागडे आदी पदाधिकारी हजर होते.

हिंगणघाटात कायदेविषयक शिबीर
हिंगणघाट, २९ जुलै / वार्ताहर

हिंगणघाट येथे महाराष्ट्र मंडळ, तालुका विधि सेवा समिती व अधिवक्ता संघाच्यावतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.स्थानिक रिठे सभागृहात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन अ‍ॅड. उमाकांत ढेकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. मुरलीमनोहर व्यास होते. प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश आर.डी. बोधाने, धनराज गोल्हर, अ‍ॅड. आर.पी. मद्दलवार, न्यायाधीश मिलिंद मोसले, न्यायाधीश एस.डी. पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. या शिबिरात अधिवक्तयांनी विविध कायदेविषयक बाबींवर प्रकाश टाकून उपस्थितांच्या शंकांचे निराकरण केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. व्यास यांनी सर्वसामान्य जनतेला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक असून याकरिता सातत्याने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.

आमदार माणिकराव ठाकरे यांचा सत्कार
खामगाव, २९ जुलै / वार्ताहर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे जनसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून खामगाव शहरात आले असता त्यांनी सानंदा निकेतन येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी आमदार दिलीप सानंदा यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यानंतर नगराध्यक्ष अशोक सानंदा यांनी काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी शंकरराव हिंगासपुरे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुधाकर गणगणे, अ‍ॅड. महादेवराव शेलार, प्रदेश सचिव अंजली टापरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, माजी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम उमाळकर, प्रदेश सरचिटणीस प्रश्न. उदय देशमुख उपस्थित होते.

देवरी वृक्षतोड प्रकरणी तीन कर्मचारी निलंबित
गोंदिया, २९ जुलै / वार्ताहर
गोंदिया वनपरिक्षेत्रात येणाऱ्या दासगाव देवरी येथील अवैध वृक्षतोड प्रकरणी उपवनसंरक्षक मुकेश गणात्रा यांनी वन विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यात दासगावचे क्षेत्र सहाय्यक ए.एन. रणदिवे, वनरक्षक जी.के. गोखले व वनमजूर बी.एफ. काळे यांचा समावेश आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीप्रमाणे दासगावमधील देवरी येथील पडीक जमिनीवर सामाजिक वनीकरण विभागाने १९९३ मध्ये वृक्षारोपण केले होते. त्यानंतर ही जागा ५ वर्षानंतर ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आली. ही जागा झुडपी जंगलाची असल्याने त्यावरील मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी वनविभागाची होती. रोपवनाच्या संरक्षणासाठी संयुक्त वन व्यवस्थापन अंतर्गत समितीही गठित करण्यात आली होती. मात्र, यावर्षी उन्हाळ्यात वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांनी ३ हजार ५०० झाडांची कत्तल केली व या प्रकरणाची सी.सी.एफ. यांनी चौकशी केली व त्यांच्या आदेशान्वये तीन कर्मचारी निलंबित करण्यात आले.

खतांचा काळाबाजार न थांबल्यास युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
भंडारा, २९ जुलै / वार्ताहर

भंडारा जिल्हा युवक काँग्रेस कृषीकेंद्रधारकांकडून खतांचा तुटवडा दाखवून, शेतकऱ्यांची होणारी लूट सहन करणार नाही, खतांच्या काळ्याबाजाराला जबाबदार कृषीकेंद्रधारक तसेच बेजबाबदार कृषी अधिकारी यांच्या विरोधात आंदोलन करणार, असा नुकत्याच झालेल्या भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या बैठकीत युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश रणदिवे यांनी इशारा दिला.या बैठकीला जिल्ह्य़ाचे युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, शहर व तालुका अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या जनसंपर्क अभियान पूर्व विदर्भ याबद्दल माहिती देण्यात आली. विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसलाच निवडून आणण्याची तयारी युवक काँग्रेसने करावी, असेही बोलताना भंडारा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश रणदिवे यांनी सुचविले ही बैठक पवनी येथे झाली. बैठकीला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अजय कोठेवार प्रश्नमुख्याने उपस्थित होते. सभेचे संचालन पवनी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव शिवरकर यांनी केले. आभार पंचायत समिती सदस्य लखन चौरे यांनी मानले.