Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

घरोघरी - मैत्री
सिध : बरखा रानी जरा जमके बरसो,
मेरा दिलबर जा ना पाये, झूमकर बरसो..
श्वाश्वती : behave yourself...
सिध : ये behave yourself... क्या चीज होती है भला, जरा समझाओ न रानी.
शाश्वती : ओ, मार खायचाय का ?
सिध : अग अग, शाश्वती, मी आहे. सिध.
शाश्वती : सिध, तू ? इथे ? ओळखलच नाही मी तुला.. किती वेगळा दिसतो आहेस ?

 

सिध : तू मला ओळखलं नाहीस, हे तर उघड दिसतं आहेस. म्हणूनच पटकन ओळख दिली. नाही तर आज चप्पलच खाल्ली असती.. पण तू मात्र आहे तशीच आहेस हं. राणी लक्ष्मीबाई.
शाश्वती : काय करणार ? आजचं जगच तसं आहे. बाई पाहिली, तीही एकटी, त्यात असा जरा ओसाड रस्ता.. मग विचारायलाच नको. त्यात तिनं जरा गुळमुळीत धोरण स्वीकारलं की मग कोपरानं काय, करंगळीनंही खणायला तयार होतात. त्यामुळे आपलं डिफेन्स मेकॅनिझम तयार ठेवायला लागतं..
सिध : अगं, हो पण सगळेच काही तसे नसतात. फायदा घ्यायला टपलेले.
शाश्वती : मान्य आहे, पण सगळे तसेच आहेत असंच समजून वागलेलं बरं असतं माहित्येय. अरे, आजकाल कुणाची खात्री देता येत नाही. या बाबतीत ना मला वपुंचं एक वाक्य खूप पटतं. त्यांनी असं म्हटलंय, सीतेचं बरं होतं. तिला माहिती होतं की, या वनात एकच राक्षस आहे आणि तो म्हणजे रावण, पण आजच्या बाईभोवती रावणच रावण आहेत.
सिध : बाप रे, हेही अजून तसंच. सतत कुठल्या कुठल्या पुस्तकातले विचार सांगणं.
शाश्वती : मी तशीच आहे, पण सिध, तू मात्र खूप बदललास हं.. आणि अरे, तुला असं हे सूटेड, बूटेड, टाईड.. बघायची सवयच नाही. त्यात हा डोळ्यांवर गॉगल.. विरळ झालेले केस.. अजिबात ओळखलं नाही मी तुला. शिवाय, तू गेली कित्येक र्वष भारतातही नाहीयेस ना? त्यामुळे तू असशील असं कसं वाटणार? बाय द वे, तू इकडे कुठे आला होतास?
सिध : अगं, मी तिकडचं सगळं वाईंड अप करून आलोय. आता भारतातच राहणार आहे. त्यासाठी सध्या मीटिंग्ज वगैरे जोरात चालल्या आहेत. आताही एका क्लायंटलाच भेटायला आलो होतो. मीटिंग संपवून बाहेर पडलो, तर तू अचानक समोर दिसलीस.
शाश्वती : मला कसा दिसला नाहीस तू ?
सिध : कसा दिसणार ? रस्त्यानं चालताना आपण कायम आपल्याच तंद्रीत असता ना. तू माझ्यासमोरून गेलीस. तुला हाक मारणार तेवढय़ात ही पावसाची सर आली, म्हणून तू झाडांच्या आडोशाला आलीस. मग मीही तुझ्या पाठोपाठ आलो. इथे येऊन उभा राहिलो, तरी तुझा चेहरा कोरा. म्हटलं आता जरा मजा करावी.
शाश्वती : बरं तर बर,ं तुझं खरं स्वरूप लवकर स्पष्ट केलंस. नाही तर मारच खाल्ला असतास. बरं ते जाऊ दे. कसा आहेस ? किती दिवस झाले तुला इथे येऊन ? आणि सानिया कशी आहे ? बच्चे कंपनीला आवडतंय का इथं?
सिध : शाश्वती, इथं असं झाडाखाली उभं राहून बोलण्यापेक्षा चल ना कुठे तरी बसू या.
शाश्वती : इथे अगदी जवळपास काहीच नाहीये. पण चल, पाऊसही कमी झालाय. चालायला लागूयात. चालता चालता गप्पाही होतील आणि एखादी टपरी मिळाली तर बघूयात.
सिध : आपली पहिली भेट झाली तीही अशीच पावसात नाही का गं ?
शाश्वती : आठवतय तुला सगळं ?
सिध : अगं, त्या सगळ्या आठवणी खूप जपून ठेवल्या आहेत. त्या आठवणींवरच तर जगतोय.
शाश्वती : असं का म्हणतोस ?
सिध : मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय शाश्वती. माझ्या आयुष्यानं इतकी वळणं घेतली की, विचारूच नकोस.
शाश्वती : काय झालं सिध ? म्हणजे तुला सांगावंसं वाटलं तरच सांग हं.
सिध : सांगावंसं वाटलं तर ? अगं, या सात- आठ वर्षांच्या प्रवासात तुझी आठवण आली नाही असा एक क्षण गेला नाही. कित्येक वेळा वाटलं, तुझ्याकडे यावं आणि ही सगळी घुसमट तुला सांगावी.
शाश्वती : मग का नाही आलास ?
सिध : शाश्वती, आपली इतकी घट्ट मैत्री होती, त्यामुळे तू अगदी सहज माझ्याशी लग्न करायला तयार होशील अशी मला खात्रीच होती..
शाश्वती : सिध, प्लीज, भूतकाळ उगाळण्यापेक्षा आपण वर्तमानाबद्दल बोलूया?
सिध : एक मिनिट शाश्वती,मला माहिती आहे तुला या विषयावर बोलायला आवडत नाही. पण आता एकदाच आणि शेवटचं बोलतो. मग परत नाही हा विषय काढणार. प्रॉमिस. पण तुला समोर पाहिलं आणि मधल्या काळातली ती सगळी घुसमट एकदाच मला तुला सांगू दे. प्लीज.
शाश्वती : ..
सिध : शाश्वती, तू दिलेला नकार पचवणं मला खूपच अवघड गेलं होतं. खूप अपमानित झाल्यासारखं वाटत होतं.त्याच काळात सोनिया माझ्या आयुष्यात आली आणि केवळ तुझ्यावर सूड घेण्यासाठी मी तिला होकार देऊन बसलो. पण आम्ही कुठल्याच अर्थानं कंपॅटिबल नव्हतो गं. लग्नानंतर काही दिवसांतच आमच्या लक्षात आलं की, आम्ही ही वाटचाल नाही एकत्र चालू शकत. तेव्हा तुझी भूमिका मी समजू शकलो. तू जे मला म्हणाली होतीस की, तुला मी नाही म्हणतेय याचा अर्थ तुझ्यात काही कमी आहे असा होत नाही. पण प्रत्येक मैत्रीचा शेवट हा लग्नातच व्हावा असंही नाही. तू किती समजवायचा प्रयत्न केला होतास तेव्हा. पण मी तुझ्या नकाराने इतका डिस्टर्ब झालो होतो की काही समजून घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हतो. त्याच भरात आपली मैत्री कायम ठेवायची तुझी सूचनाही धुडकावून लावत सगळे संबंधच तोडून टाकले होते. पण तुला मी कधीच विसरू शकलो नाही. शाश्वती, आज मी परत तुझ्याकडे त्याच मैत्रीची भीक मागतोय.
शाश्वती : सिध, एकदा केलेली चूक पुन्हा करण्यात अर्थ नसतो..
सिध : प्लीज, नाही म्हणू नकोस. ती चूक पुन्हा होणार नाही, कारण आज पुन्हा मैत्रीचा हात पुढे करताना माझ्या मनात दुसऱ्या कुठल्याही अपेक्षा नाहीत. मी खूप बदललोय आता. मला कळतंय की ही योग्य जागा नाही हे विचारण्यासाठी. पण योग्य वेळ नक्की आहे. आपली पहिली भेट पावसातच झाली होती आणि आज पुन्हा मैत्रीचा हात पुढे करतोय तोही पावसाला साक्षी ठेवूनच. नाही म्हणू नकोस. मला माहिती आहे की, या अशा पद्धतीनं सांगितलेलं तुला आवडत नाही. तेही मी करेन नंतर. पण आता हो म्हण.
शाश्वती : अरे, हो हो, पण किती घायकुतीला येतो आहेस ? इतकी काही माझी मनधरणी करण्याची गरज नाही. तू कायमच माझा मित्र होतास आणि राहशील. पण माझ्याशी संबंध तोडायचा निर्णय तुझा होता. त्यामुळं मीही त्याला मान्यता दिली होती. फक्त एक खूप छान मित्र गमावल्याचं दु:ख मात्र निश्चित झालं होतं. तो मित्र आज परत मिळाला. पाऊस पडून गेल्यानंतर कसं सगळं स्वच्छ दिसायला लागतं ना, तसं वाटतंय मला.
सिध : चलो, इस बातपे एक चाय हो जाय.
shubhadey@gmail.com