Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

बुक कॉर्नर - पंचतारांकित
त्यांनी माझ्याशी फार लहानपणापासून जोडलेल्या या मैत्रीचा तर मला घडवण्यात फारच मोठा वाटा आहे. ‘मी बाबा म्हणून फारसा बरा नसेन. पण मित्र म्हणून मी वाईट नाही’, असं ते मला नेहमी सांगत. पत्रातून लिहीत. हा एवढा मोठा लेखक मला बाबा म्हणून मिळालाच. पण सर्वात जवळचा मित्र म्हणून मिळाला याचं श्रेय त्यांनाच आहे. मी त्यांच्याशी कुठल्याही विषयावर कधीही आणि काहीही बोलू शकते आणि त्याचं ‘बाबापण’ बाजूला ठेवून ते माझ्याशी मित्रासारखे बोलतात हे ते कसं करतात ते तेच जाणोत. कारण माझ्यासारख्या लेकीचे बाबा असणं हे किती कठीण काम आहे हे नुसत्या कल्पनेने मला कळू शकतं आणि प्रत्यक्षात ते काही काळ तरी बाजूला ठेवून मला एक मैत्रीण म्हणून समजून घेणं हे तर निश्चितच महाकठीण असणार. ही सर्कस ते कसे साधतात त्यांनाच ठाऊक.
कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा असा एक स्वतंत्र दृष्टिकोन आहे. तो मला द्यायचा त्यांनी कधीही जाणून बुजून प्रयत्न

 

केलेला नाही. पण तो माझ्यात बाणवायचा माझा प्रयत्न सतत राहिला आहे. त्यांना हे फारसं आवडत नाही. ते मला सतत सांगतात, ’फार अवलंबून राहू नकोस. स्वत:ची स्वत: उभी राहा. स्वत:चे निर्णय स्वत:चा सारासार विचार करून घे. तू चुकणार नाहीस आणि चुकलीस तर हरकत नाही. सगळ्या चुकांना आयुष्याचे दरवाजे बंद केलेस तर सत्यालाही तू दरवाजाबाहेर ठेवशील. आपण आपल्याशी सत्य असावं. मग जगाची पर्वा करू नये, अगदी आईबाबांचीसुद्धा.’ सत्याला ते आयुष्यात फार महत्त्व देतात. आपल्या प्रत्येक कृतीला आपल्या सत्याचा पाया हवा, असा त्यांचा आग्रह असतो. पण तो स्वत:च्या बाबतीत. इतरांवर काहीही लादायचा ते चुकूनही प्रयत्न करीत नाहीत. कधीही नाही. सल्ला देतात. पण निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा. मी यामुळे त्यांच्यावर अनेकदा चिडते. ‘माझा निर्णय मीच घेतला म्हणजे त्याच्या परिणामाला मीच जबाबदार’ असा माझा दावा असतो. पण ते म्हणतात, ही जबाबदारी तू पेलली पाहिजेस, प्रत्येकाने पेलली पाहिजे आणि तुला तर मी आहेच. तुझ्या निर्णयाचे परिणाम मीही भोगेन. त्यातून मलाही पळवाट नाही आणि ते भोगतात. माझ्याबरोबर किंबहुना माझ्याहून अधिक भोगतात. तक्रार न करता भोगतात. पण त्यांचा आग्रह कायम असतो. ‘माझ्या कुबडय़ा घेऊन चालू नकोस. मी तुला कायमचा पुरणार नाही. कुणीच कुणाला कायम पुरत नाही. तुझी तू समर्थ, ताकदवान हो. मला विसरून हो आणि तेच नेमकं मला अजून जमत नाही. कुठल्याही प्रकारे माझ्या व्यक्तिमत्त्वावर त्यांनी दबाव न आणताही मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावलेली आहे. माणूस म्हणून आणि कलावंत म्हणून त्यांनी गाठलेली उंची मला फार प्रभावीत करते. माझ्या खुजेपणाची जाणीव करून देते आणि हे मी त्यांना सांगू शकत नाही. कारण याचा त्यांना त्रास होतो. पण ते त्यांनाही माहीत आहे. मला असं वाटतं की, इतक्या उंच माणसाच्या सहवासात राहणाऱ्यांचं थोडं फार असंच होत असणार. माझ्यासारख्या लहान माणसांना त्यांच्या सहवासाच्या मोबदल्यात आपल्या लहानपणाचाही अभिमान वाटतो. पण अशी किती उंच माणसं असतील, ज्यांना आपल्या उंचपणामुळे आपल्या जवळच्या माणसांना वाटणाऱ्या लहानपणाचा त्रास होतो. जसा बाबांना होतो?
त्यांनी दिलेल्या या प्रोत्साहनाने लिहिणं ही माझी एक सवय होऊन बसली आहे. त्याला छंदसुद्धा म्हणणं चूक आहे. ती माझी एक सवय आहे, गरज आहे. आपल्या किशोर वयात शाळा सोडून दिल्यावर कुणी दोस्त नाही. आई-वडिलांशी मन मोकळं करण्याइतकी जवळीक नाही. करायला काम नाही, अशा अवस्थेत केवळ लिखाणाच्या सवयीनं आपण तगलो, असं ते म्हणतात ते मला आता पूर्ण पटतं. माझी तशी परिस्थिती कधीच झाली नाही. पण मन शांत करायला लिखाणाइतका दुसरा उपाय माझ्यापाशी नाही. ते लिखाण मग काय लायकीचं निघेल, ते छापायचं किंवा नाही हा सगळा दुय्यम भाग!
मध्यंतरीच्या काळात काहीही क्रिएटिव्ह न करता मी नुसतीच पैशाच्या मागे लागले होते, तेव्हाही त्यांनीच मला भानावर आणलं. ‘तू जे काही क्रिएटिव्ह करतेस त्याचा मी फॅन आहे. फार उत्सुकतेनं मी तुझ्या लेखनाकडे, चित्रकलेकडे पाहत असतो. पैसाबियसा हे सगळं बिनमहत्त्वाचं आहे. तो यायचा तेव्हाच येतो. त्यामागे हात धुवून लागलीस तर दुप्पट वेगाने तुझ्यापुढे तो पळत राहील. आयुष्यात खरा महत्त्वाचा आनंद निर्मितीत असतो, त्यामुळे पैसा, मानमरातब किती मिळतो हे अजिबात महत्त्वाचं नाही. ’ त्यांनी त्यांच्या आयुष्यात हे सारं कटाक्षाने पाळलं. पण मला ते मान्य करताना त्रास होतो. माझ्या दृष्टीने एक विशिष्ट महत्त्व पैशाला आहे. या बाबतीत आमचे वाद होतात. ते त्यांचा हट्ट सोडत नाहीत आणि मी माझाही सोडत नाही. पण याही बाबतीत त्यांनी कधी सक्ती केल्याचं आठवत नाही.
पण किशोरवयात असल्यापासून माझ्यापुढे प्रश्न होता की, माझ्या अनुभवविश्वाचं काय? एक तर मी स्त्री, त्यामुळे त्यांना जितके अनुभव मिळवता आले तेवढे मला उभ्या आयुष्यात मिळणं कठीण! त्यातून मला पोटाची चिंता नाही. थँक्स टू हिम! मग माझं अनुभवविश्व ते काय असणार? एक मध्यमवर्गीय, सुरक्षित, चारचौघींसारखं आयुष्य जगलेली मुलगी लिहून लिहून कुठल्या विषयावर लिहिणार? आणि त्यात सच्चेपणा तो काय असणार? त्या वयात कशावर लिहायचं हा माझा एक छोटा प्रश्न होऊ लागला होता. विषय घेऊन त्यावर कल्पनेतून लिहिण्याशिवाय दुसरं गत्यंतरच नव्हतं. परिकथांतून बाहेर आले होते आणि नुसत्याच प्रेमकथा नाही तर हळव्या निसर्गकविता पाडत होते. या वेळी माझ्या आयुष्यात जे घडत गेलं त्यालाही त्यांनी साथ दिली. किंबहुना ते बदल न कळत त्यांच्यामुळेच घडत गेले. लिखाणासाठी अनुभवविश्व वाढावं म्हणून मुद्दामहून त्यांनी किंवा मीही हे बदल घडवून आणले नाहीत. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे भारावून गेलेल्या त्यांच्या मुलीला त्यांच्यासारखं लवकर स्वत:च्या पायावर उभं राहावं असं वाटू लागलं. तशी गरज मुळीच नसल्यामुळे इतर वडिलांसारखे ते हे बदल थांबवू शकत होते. बाबा म्हणून त्यांना तसा हक्कही होता. पण त्यांनी तसं चुकूनही केलं नाही.
कॉलेज सोडावंसं वाटतं तर सोडून दे. हॉटेलमध्ये, एअरलाइन्समध्ये नोकरी करायची आहे, ठीक आहे, कर. मॉडेलिंग, नाटक सिनेमातून कामं, अगदी काहीही करायची मोकळीक त्यांनी मला दिली. केवळ त्यांनी केलं होतं म्हणून मी थोडे दिवस एका प्रेसमध्ये खिळे जुळवायचं, प्रूफं तपासायचं, पुस्तकांची समीक्षणं लिहायचं कामही केलं. आर्थिक गरज नव्हती. त्यामुळे एक सोडून दुसरी नोकरी धरायचं स्वातंत्र्यही माझ्यापाशी होतं. आर्थिक गरज फार निकडीची असतानाही त्यांनी अनेक नोकऱ्या सोडल्या. तत्त्वावर सोडल्या. मतभेद झाले म्हणून सोडल्या. एकदा तर त्यांना चक्क कामावरून काढूनही टाकलं होतं. मला जेव्हा त्यांच्याच एका नाटकातून महिनाभर तालीम केल्यावर माझा अभिनय भूमिकेला साजेसा नाही म्हणून एका दिग्दर्शकाने काढून टाकलं, तेव्हा नोकरीवरून कमी केल्यावर त्यांना काय वाटलं असेल याची पुसटशी कल्पना मला आली.
माझ्या आयुष्यातल्या या साऱ्या कसरती बाप म्हणून त्यांना किती त्रासदायक झाल्या असतील याची नुसती कल्पनाच मी करू शकते. पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही. उलट प्रोत्साहन दिलं. माझ्या प्रत्येक नव्या उपक्रमात अत्यंत मनापासून रस घेतला. आमच्यातला मैत्रीचा दुवा सतत बळकट ठेवला. कायम पाठीमागे उभे राहिले. इतरांच्या दृष्टीने त्या काळात मी फुकट जात होते. पण त्यांच्या दृष्टीने माझं उत्तम चाललं होतं. ‘तू जिथे जातेस तिथे जो ह्य़ूमन कॉन्टॅक्ट साधतेस, तो मला फार महत्त्वाचा वाटतो.’ त्यांनी मला एकदा पत्रातून लिहिलं होतं, ‘पूर्वीच्या काळी राजे-महाराजे त्यांच्या राजपुत्रांना एका विशिष्ट वयात जंगलात एकटे सोडत असत. उद्याचा राजा म्हणून त्या राजपुत्रांचा तो ‘ट्रेनिंग पीरिअड’ असे. त्या काळात तो त्याच्या लढाया एकटा लढत असे. त्या ‘ट्रेनिंग पीरिअड’मधून यशस्वी पार पडला की तो राजा व्हायला तयार झाला अशी त्यांची समजूत असे. मी राजा नाही. माझं विशिष्ट साम्राज्य नाही. तेव्हा हे सगळं जगच माझं साम्राज्य आहे आणि तू माझा राजपुत्र आहेस. हा तुझा ‘ट्रेिनग पीरिअड’ समज. यातून तू सहीसलामत बाहेर आलीस की तुला जगात कुठेही, कुणाचीही भीती नाही. तुझ्या लढाया तुला एकटीलाच लढायच्या आहेत. पडली झडलीस तर मी आहेच. पण घाबरू नकोस, हारू नकोस, लढत राहा.’
त्यांनी वारंवार दिलेल्या या स्वातंत्र्यामुळे, प्रोत्साहनामुळे माझं अनुभवविश्व अधिकाधिक समृद्ध होत गेलं. माणूस म्हणून मी समृद्ध होत गेले आणि माझ्या नकळत माझ्यातल्या लेखकाला विषयही सापडत गेले. त्यात एक खरेपणा येत गेला. आता लेखन कौशल्य, शैली, साहित्यकृतीचा फॉर्म, सगळं मला किती आत्मसात करता येईल. लेखक म्हणून मी किती यशस्वी किंवा अयशस्वी होईन हे सगळं माझ्या हातात आणि नशिबात आहे. पण लेखक होण्यासाठी जे काही पोषक वातावरण, शिक्षण आवश्यक आहे ते सारं त्यांनी मला भरपूर दिलं आहे.
पंचतारांकित, प्रिया तेंडुलकर
राजहंस प्रकाशन, पृष्ठे- १३४, मूल्य- ८० रुपये