Leading International Marathi News Daily
गुरुवार, ३० जुलै २००९
  त्यानं माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला
  तिच्याकडे बघून मला आयुष्याचा खरा अर्थ कळतो
  कट्टयाचं माझ्या आयुष्यातलं स्थान अबाधित आहे
  वास्तवात दूर असलो तरी मनाने मात्र जवळच
  खऱ्याखुऱ्या मैत्रीची साथ शोधा
  कहां गए वो दिन?
  बुक कॉर्नर - पंचतारांकित
  ओ डय़ूऽऽड!
भाग १
  क्रेझी कॉर्नर
‘काका’ होण्याच्या प्रसववेदना
  दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
  ग्रूमिंग कॉर्नर
उठा! उभे राहा! आणि लढाई सोडू नका!
  स्मार्ट बाय
  ये रिश्ता क्या कहलाता है..
  ओपन फोरम
  इव्हेंटस कॉर्नर
  फूड कॉर्नर

दवंडी
संस्कृतीची पुच्छप्रगती
माध्यम क्रांती अनेक संधी उपलब्ध करुन देते. निवडीला पर्याय देते. पण उडदामाजी काळे गोरे कसे निवडावे? काय घडतंय यापेक्षा काय काय घडणार आहे आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत. त्याचा फायदा आपण कसा करुन घेणार आहोत हे ठरवण्यासाठी ही दवंडी..
आपले राष्ट्रपती (माजी) अब्दुल कलाम गेल्या आठवडय़ात वेगळ्याच चुकीच्या कारणाने पुन्हा एकदा प्रसिद्धीला आले. विमानतळावर त्यांची सुरक्षा तपासणी केली म्हणून देशाचा अपमानच वगैरे झाला. त्यानंतर ज्यांना विमानतळावर सुरक्षा चाचणीतून सूट आहे त्याची जी एक यादी प्रसिद्ध झाली ती पाहून यातल्या अनेकांना सुरक्षा चाचणीतून सूट का द्यायची असा प्रश्न पडला. खासदार, मंत्री-संत्री यांची सुरक्षा चाचणी का नाही करायची? ते काय ‘अबव्ह सस्पिशन’ आहेत? अरे जिथे

 

शंकराचार्याना अटक होते, जिथे एका मंत्र्यांच्या विमानातून दाऊदसारख्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराने प्रवास केला असा आरोप केला जातो, त्या देशात मंत्र्यांची सुरक्षा तपासणी का नाही करायची? त्यांना देशाचे भले करण्याची घाई असल्यामुळे फार फार तरत्यांच्यासाठी वेगळी रांग करा. पण सुरक्षा म्हणजे सुरक्षा, असो.
अब्दुल कलामांची आठवण होण्याचं दुसरं कारण म्हणजे फार वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. ते एकदा इस्रायलच्या दौऱ्यावर गेले. जिथे रोजचा दिवस हा लढाईचा असू शकतो. ते ज्या दिवशी तिथे पोचले त्या दिवशी तिथे एक मोठा बॉम्बस्फोट झाला होता आणि काही माणसं मेली होती. पण दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये पहिल्या पानावर बातमी होती ती तिथल्या एका शेतकऱ्याने अत्यंत कमी पाण्यात दर एकरी विक्रमी उत्पन्न घेतल्याची. सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे दुसरं काय असतं? वर्तमानपत्रांनी लोकांच्या समोर आदर्श मांडायचे असतात ते असे. हे आठवण्याचं कारण म्हणजे आता चार-सहा दिवसांपूर्वी भारताने अण्वस्त्रधारी पाणबुडीचे यशस्वी निर्माण केले. जगात इतर फक्त सहा देश आहेत ज्यांना हे साध्य झाले. अभिमानाने ऊर भरून यावा अशी ही बातमी. पण त्यावेळी कसाबचा कबुलीजबाब पहिल्या
पानावर होता तर पाणबुडी आठव्या पानावर! टीव्हीवर सगळी उष्टी खरकटी काढून झाल्यावर नाइलाजाने पाणबुडीची बातमी? का? सच का सामना या कार्यक्रमावर पाच-सात मिनिटांचे फिचर दाखवायला वेळ आहे, पण या बातमीला नाही.
ज्या वेळी समलिंगी संबंधांबद्दल सुप्रीम कोर्टाने तो गुन्हा मानला जाऊ नये असं निकालपत्र दिलं तेव्हा आंग्ल वर्तमानपत्रांनी जो जल्लोष केला त्यावर तर मला त्यांचीच काळजी वाटू लागली आहे. काय त्या मुलाखती आणि काय तो भुभु:कार. ठीक आहे. हा गुन्हा मानला जाऊ नये. पण म्हणून त्याचा उत्सव करावा असंही नाही ना. रिअ‍ॅलिटी टीव्ही आपल्याकडे एक एक पाऊल पुढे टाकत आहे. खेळ, गुणवत्तेचा शोध किंवा पैसे मिळवून देणारे गेम शो यासारख्या गंमती चालू होत्या तोवर ठीक होतं. पण बिग बॉसने एक पाऊल पुढे टाकलं. सात-आठ माहीतही नसलेल्या लोकांना एका घरात कोंबून त्यांचे उद्योग पाहणे हा काय मनोरंजनाचा प्रकार होऊ शकतो का? पण झाला. कारण आपल्याला असलेली उपजत नाक खुपसायची सवय. तरी आपल्याकडे बाथरूममध्ये कॅमेरे नव्हते. बिग बॉसचे मूळ रूप असलेल्या बिग ब्रदरमध्ये तिथेही कॅमेरे असतात. (म्हणून शिल्पा शेट्टीने म्हणे आठ दिवसात कपडेच बदलले नव्हते. शी..) पण तो शो हीट झाला आणि आपल्याकडचा बिग बॉसही हीट झाला. लोकांनी पाहिला म्हटल्यावर उधारी उसनवारीचे अनेक शोज आपल्याकडे येऊ लागले.
‘सच का सामना’ हा एक असाच कार्यक्रम. त्यावरूनही गेल्या आठवडय़ात संसदेत गदारोळ झाला. आपली संस्कृती यामुळे भ्रष्ट होते असं आपल्या खासदारांना वाटलं. वा वा.. आपल्या संस्कृतीची ही काळजी पाहून माझ्या डोळ्यात पाणीच की हो आलं. म्हणजे यांच्या नावावर गुन्हे असतात, हे धड शिकलेले नसतात, हे संसदेत मारामाऱ्या करतात, रोज धुळवड असल्यासारखी बोंबाबोंब करतात, तरीही हे आपलं प्रतिनिधित्व करतात (म्हणजे काय करतात ते देवालाच ठाऊ क) त्यात आपल्या या संस्कृतीची मान खाली जात नाही. पण एका फालतू शोमुळे संस्कृती बुडते? कमाल आहे. एवढी जर ती तकलादू असेल तर ती बुडलेलीच बरी ना. पण तसं नाही झालंय. गेली पाच हजार वर्षे ती आहे ना टिकून.
म्हणजे मी या शोची भलामण करतोय असं समजू नका. या शोमध्ये जे वाह्यात प्रश्न विचारले जातात त्यात मला काडीचाही रस नाही. म्हणून मी तो कार्यक्रम कधी पाहिला नाही.. पाहणार नाही. पण आमचे खासदार या प्रश्नावर दंगा करतात. म्हणजे ते हा कार्यक्रम पाहतात. अरे पण रिमोट आहे ना तुमच्याकडे? नका पाहू तो. सोपं आहे. अनुल्लेखाने मारणे हा प्रकार माहीत नाही का तुम्हाला? उदाहरणार्थ सांगतो. गेल्या तीन-चार महिन्यांत प्रदर्शित झालेल्या एका मराठी सिनेमात इतके अश्लील संवाद होते की मी ते इथे लिहू शकत नाही. बरं या सिनेमात आजचे अत्यंत मान्यवर कलाकार होते बरं का.. त्या सिनेमाचे नाव मी सांगत नाही. कारण तुम्ही मग तो शोधाल आणि पाहाल. मला आनंद याचा वाटला की कोणीही या सिनेमाच्या अभद्र, बिभत्स, ओंगळ, गलिच्छ संवादांबद्दल काहीही लिहिले नाही. त्यामुळे तो बाराला लागून सव्वाबाराला कमरेचं हाड मोडेल इतक्या जोरात आपटला. उत्तम. वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करणाऱ्याला ती प्रसिद्धी मिळू न देणे हेच योग्य नाही का? सच का सामना हा असाच एक सनसनाटी निर्माण करण्यासाठी स्क्रिप्टेड, ठरवून केलेला, सवंग अट्टहास आहे असं मला वाटतं. काही काळाने लोकांना ते उमगणार आहे. लोक मूर्ख नाहीत.
कपडय़ाच्या आत सगळेच नागडे असतात म्हणून रस्त्यावर कुणी कपडे काढून फिरत नाही. त्यामुळे हे असले चाळे दुर्लक्ष करण्याचे असतात. पण त्यामुळे संस्कृती बुडते वगैरे गळा काढण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. जगात चांगले पदार्थ आहेत, तसेच वाईटही आहेत. ज्याला श्रीखंड खायचे असेल त्याला ते खाऊ द्या, ज्याला शेण खायचे आहे त्याला ते खाऊ द्या. पण हल्ली संस्कृतीचा ढोल वाजवण्याची फॅशन झाली आहे. काही काळापूर्वी आय पिल या गर्भनिरोधक गोळ्यांबद्दल एका बाईचे पत्र वाचल्याचे आठवते. त्यांनीही यामुळे अनैतिकतेचा बाजार भरेल या अर्थाचा लेख लिहिला होता. मला हे अजब वाटते. राजीव गांधींच्या काळात गर्भनिरोधक साधनांची जाहिरात रात्री नऊनंतर दाखवावी असा एक फतवा काढला होता. का, तर म्हणे या जाहिराती मोठय़ांसाठी आहेत. त्यामुळे त्या मुलं झोपल्यावर दाखवाव्यात. भारतवर्षांतील तमाम बाळे नऊ वाजता झोपी जातात हे यांनी कुठून शोधून काढले. एका बाजूला आपण शाळेमध्ये लैंगिक शिक्षण देण्याची चर्चा करतो आणि दुसऱ्या बाजूला आय पिलमुळे संस्कृती बुडते? म्हणजे माचीसचा शोध लावायचा नाही. कारण इतक्या सहज आग पेटवता आली तर लोक जाळपोळ करत सुटतील किंवा नेमबाजी लोकांना शिकवायची नाही कारण मग ते लगेच बाहेर जाऊन खून पाडतील. मुलाला ड्रायव्हिंग शिकवायचं नाही कारण मग तो वाह्य़ातपणे गाडी चालवून चार लोकांना चिरडेल, असं म्हणण्यासारखं हे आहे. ज्ञान, माहिती ही थांबवता येत नाही. ती तुम्ही नाही दिलीत तरी लोक त्यांना जे करायचं ते करतातच. म्हणून त्यांना योग्य असं ज्ञान द्यायला हवं आणि शेवटी नैतिक-अनैतिक हे व्यक्तिसापेक्ष आहे. त्याला तुम्ही नियमात बांधू शकत नाही. शेवटी सर विन्स्टन चíचलचं एक वाक्य आहे. ते त्यांच्या पार्लमेंटमध्ये म्हणाले की, ‘तुम्ही जे म्हणताय ते मला अजिबात पटत नाही. पण तरीही तुम्हाला ते म्हणण्याचा पूर्ण हक्क असायला हवा यासाठी मी भांडेन.’ लोकशाही म्हणजे दुसरं काय असतं? केव्हा कळणार आहे आपल्याला हे?
अभय परांजपे
asparanjape1@gmail.com