Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

विविध

गायत्रीदेवी यांचे निधन
जयपूर, २९ जुलै/पी.टी.आय.

‘व्होग’ मासिकाच्या जगातील सवरेत्कृष्ठ दहा सौंदर्यवतींमध्ये स्थान मिळविणाऱ्या आणि देशाच्या राजकारणात एकेकाळी सक्रिय भूमिका बजावलेल्या राजमाता गायत्रीदेवी (९०) यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आणीबाणीच्या कालावधीत तुरुंगवास पत्करलेल्या गायत्री देवी यांनी ‘स्वतंत्र’ पक्षाची स्थापना केली होती. तिसऱ्या आणि चौथ्या लोकसभेच्या त्या सदस्याही होत्या. गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गायत्रीदेवी काही दिवसांपूर्वीच घरी परतल्या होत्या. काल त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ओमर व फारुक अब्दुल्ला यांना सीबीआयने दिलेली ‘क्लीन चीट’ पीडीपीला नामंजूर
श्रीनगर, २९ जुलै/पीटीआय

२००६ साली घडलेल्या सेक्स स्कँडलमध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला व त्यांचे पिता आणि माजी केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला यांचा हात नसल्याचे सीबीआयने जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना एका पत्राव्दारे कळविले आहे. सीबीआयने अब्दुल्ला पिता-पुत्रांना दिलेली क्लीन चीट आम्हाला नामंजूर असल्याचे पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी)म्हटले आहे. या सेक्स स्कँडलची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी पीडीपीने आज विधानसभेत केली.२००६ सालच्या सेक्स स्कँडलप्रकरणी १७ आरोपींवर विविध न्यायालयांत खटले दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर नऊ आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. सेक्स स्कँडलमध्ये ओमर अब्दुल्ला व फारुक अब्दुल्ला यांचा हात नाही.

राखीचे ‘स्वयंवर’ गोत्यात?
जयपूर, २९ जुलै/पीटीआय

आयटमगर्ल राखी सावंतने स्वयंवराचा बेत आखून विवाहाचा घाट घातला, तेव्हाच सर्वाच्या भुवया उंचावल्या होत्या. आता स्वयंवरद्वारे राखीचा ‘पतीशोध’ अंतिम टप्प्यात आला आहे. २ ऑगस्टला राखीचा विवाह होणार आहे, तोही ‘लाइव्ह’. परंतु जयपूर कोर्टाने पोलिसांना राखी सावंत आणि अन्य पाचजणांवर ‘एफआयआर’ दाखल करण्यास सांगितल्यामुळे तिचे स्वयंवर गोत्यात येण्याची चिन्हे आहेत.

आर.के.आनंद यांची शिक्षा कायम
नवी दिल्ली, २९ जुलै / पीटीआय

विख्यात फौजदारी वकील आर.के.आनंद यांना न्याय प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न करत न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल ठोठावलेली शिक्षा व ज्येष्ठता रद्द करण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज कायम ठेवला. आनंद यांच्या बरोबरीने शिक्षा ठोठावलेले बीएमडब्ल्यू प्रकरणातील विशेष सरकारी वकील आय.यू.खान यांची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय न्यायमूर्ती बी.एन.आगरवाल, अफताब आलम, जी.एस.सिंघवी यांच्या खंडपीठाने दिला. मात्र, त्याचवेळी आनंद यांची शिक्षा का वाढवू नये असा प्रश्नही निकालावेळी विचारला.

‘आठवडय़ात नॅनो द्या नाहीतर ती नकोच’
बडोदा, २९ जुलै/पी.टी.आय.

बहुचर्चित नॅनो कार मुंबईतील अशोक विचारे यांना मिळाल्याचे कळताच देशातील पहिल्या महिला छायाचित्रकार ९६ वर्षीय होमी व्यारावाला यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पहिली नॅनो आपल्याला देण्याचे टाटा कंपनीने जाहीर केले होते. परंतु ते आश्वासन हवेत विरल्याने त्या संतापल्या आहेत. पाठोपाठ गुजरातेतील सुरेंद्रनगर येथील उमंगसिंग परमार यांनाही कार मिळाल्याने तर त्या अधिकच अस्वस्थ झाल्या. आता सात दिवसांत ही कार मिळाली नाही तर ती आपल्याला नकोच, अशी तंबी त्यांनी दिली आहे.

‘गॅसपुरवठयासंदर्भातील खटल्याची १ सप्टेंबरला अंतिम सुनावणी घ्या’
नवी दिल्ली, २९ जुलै/पीटीआय

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल)कडून अनिल अंबानी यांच्या आरएनआरएल कंपनीला होणाऱ्या गॅसपुरवठय़ाप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्याची अंतिम सुनावणी येत्या १ सप्टेंबर रोजी घेण्यात यावी अशी विनंती आरएनआरएल सर्वोच्च न्यायालयाला उद्या करणार असल्याचे अनिल अंबानी यांनी सांगितले. पेट्रोलियम खाते हे मुकेश अंबानी यांची बाजू घेत आहे असा आरोप अनिल अंबानी यांनी मंगळवारी केला होता. आरएनआरएलने पेट्रोलियम मंत्रालय व मुकेश अंबानी यांच्या आरआयएलला स्वतंत्रपणे नोटीसा पाठविल्या आहेत.

मिनीट्रकची जीपला धडक; तीन भाविक ठार, आठ जखमी
खामगाव, २९ जुलै / वार्ताहर

भरधाव मिनीट्रकने जीपला धडक दिली. यामध्ये जीपमधील दोन महिला व चालक जागीच ठार तर ११ महिला जखमी झाल्या आहेत. त्यापैकी ८ महिलांची प्रकृती चिंताजनक आहे. हा भीषण अपघात खामगाव ते चिखली मार्गावरील हिवरखेड शिवारात मंगळवारी रात्री ९ वाजतादरम्यान घडला.साखरखेर्डा येथील १५ महिला मॅक्स जीपने (एमएच२८-३४९१) शेगावला जाण्यासाठी खामगावपर्यंत आल्या. खामगाव येथून महिला पहाटेच संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत शेगावला गेल्या. दर्शन आटोपून परत साखरखेर्डाला जाण्यासाठी त्याच जीपने शेगाव येथून निघाल्या. दरम्यान खामगाव-चिखली मार्गावरील हिवरखेड शिवारातील टेकडीच्या वळणावर त्यांच्या जीपला समोरून भरधाव येणाऱ्या डीसीएम मिनीट्रकने (क्र.एमएच१९-५६८७) जोरदार धडक दिली. यामध्ये जीपचा चालक विश्वनाथ पुंजाजी झोरे, पुष्पा जाधव, कैकई भिकाजी चव्हाण तिघेही रा. साखरखेर्डा हे जागीच ठार झाले.

‘सच का सामना’ सुरूच राहणार
नवी दिल्ली, २९ जुलै/पीटीआय

‘सच का सामना’ या वादग्रस्त टीव्ही शोच्या प्रसारणाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती ए. पी. शाह यांच्या विभागीय खंडपीठाने याचिकाकर्त्यांना केंद्र सरकारकडे जाण्याचे निर्देश दिले आहेत. एखाद्या कार्यक्रमावर बंदी घालावी की नाही, हा निर्णय केंद्र सरकार घेईल. हे न्यायालयाचे काम नाही. देशात यापेक्षा बऱ्याच गंभीर समस्या आहेत, ज्या न्यायालयाला सोडवायच्या असतात, असे ताशेरे या खंडपीठाने ओढले आहेत. दीपक मैनी आणि प्रभात कुमार या दोघांनी स्टार प्लस वाहिनीवर सुरू असलेल्या ‘सच का सामना’च्या प्रसारणाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती.

प्रसिद्ध मल्याळी अभिनेते राजन पी. देव यांचे निधन
कोची, २९ जुलै/पी.टी.आय.

मल्याळी चित्रपटसृष्टीतील चतुरस्र अभिनेते राजन पी. देव यांचे आज पहाटे येथील खासगी इस्पितळात निधन झाले. ५८ वर्षीय देव गेले काही दिवस यकृताच्या विकाराने आजारी होते. खलनायकी आणि विनोदी भूमिकांसाठी विशेषत्वाने लोकप्रिय असलेल्या देव यांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रदीर्घ काळ गाजविला. मल्याळी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधील सुमारे १८० चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या देव यांनी दोन चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटांमध्ये येण्याआधी त्यांनी रंगभूमीही गाजवली होती आणि त्यांची भूमिका असलेल्या ‘कटुकुथिरा’ या नाटकाचे हजारावर प्रयोग झाले होते.

बलात्काराचे गुन्हे मध्यप्रदेशात सर्वाधिक
नवी दिल्ली:
बलात्काराच्या घटनांमध्ये २००७ सालात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून सर्वाधिक गुन्हे मध्यप्रदेशात घडल्याची नोंद झाली आहे. त्याखालोखाल पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक आहे. अधिकृत आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमध्ये २००७ साली बलात्काराच्या ३०१० गुन्ह्य़ांची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये २१०६, उत्तर प्रदेशात १६४८ तर बिहारमध्ये १५५५ गुन्हे नोंदले गेले.

तृणमूलच्या दोन नेत्यांची भोसकून हत्या
वर्धमान :
पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्य़ातील खार्जुट येथे तृणमूल कॉँग्रेसच्या दोन नेत्यांची संशयित माकप कार्यकर्त्यांनी हत्या केली असून अन्य चौघेजण जखमी झाले आहेत. प्राथमिक शिक्षक व तृणमूल कॉँग्रेसचे स्थानिक नेते शेख सैमुद्दिन (४०) यांची जमावाने एका शेतात भोसकून हत्या केली. या घटनेत दुसरे एक नेते जफर अली यांना जमावाने लाठय़ाकाठय़ांनी बेदम मारहाण केल्यामुळे त्यांचा इस्पितळात मृत्यू झाला. हल्लेखोर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा संशय असून ते सर्वजण फरारी आहेत.

माजी क्रिकेटपटूची आत्महत्या
लखनौ :
खालावलेल्या आर्थिक स्थितीमुळे खचलेल्या तालकटोरा भागातील माजी क्रिकेटपटूने आत्महत्येचा मार्ग पत्करला. शिवेश रंजन मजुमदार (३२) या क्रिकेटपटूने आपल्या राजाजीपुरम कॉलनीतील निवासस्थानी गळफास लावून मंगळवारी आपले आयुष्य संपविले.