Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

गायत्रीदेवी यांचे निधन
जयपूर, २९ जुलै/पी.टी.आय.

‘व्होग’ मासिकाच्या जगातील सवरेत्कृष्ठ दहा सौंदर्यवतींमध्ये स्थान मिळविणाऱ्या आणि देशाच्या राजकारणात एकेकाळी सक्रिय भूमिका बजावलेल्या राजमाता गायत्रीदेवी (९०) यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आणीबाणीच्या कालावधीत तुरुंगवास पत्करलेल्या गायत्री देवी यांनी ‘स्वतंत्र’ पक्षाची स्थापना केली होती. तिसऱ्या आणि चौथ्या लोकसभेच्या त्या सदस्याही होत्या.

 

गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गायत्रीदेवी काही दिवसांपूर्वीच घरी परतल्या होत्या. काल त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या प्रकृतीची देखरेख करणाऱ्या सुभाष काला यांनी दिली. कुचबिहार येथील राजकन्या असलेल्या गायत्री देवी यांचा जन्म लंडनमध्ये झाला . १९३९ ते १९७० या कालावधीपर्यंत जयपूरची तिसरी महाराणी म्हणून त्यांची ओळख होती. १९७० साली सवाई मानसिंग दुसरे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांना ‘राजमाता’ संबोधले जाऊ लागले. १९६२ सालापासून त्या राजकारणात सक्रिय झाल्या. राजस्थान स्वतंत्र पक्षाच्या त्या संस्थापक सदस्य होत्या.
१९६२ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने निर्विवाद विजय मिळविला. आणीबाणीच्या कालावधीत त्यांना तिहार येथील तुरुंगात डांबण्यात आले होते. व्होग मासिकानेच दहा सौंदर्यवतींमध्ये समाविष्ट केलेल्या ‘ब्युटिक्विन’ लीला नायडू यांचे मंगळवारी निधन झाले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी गायत्रीदेवींचे निधन हा मनाला चुटपूट लावणारा काळयोग आहे.