Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

ओमर व फारुक अब्दुल्ला यांना सीबीआयने दिलेली ‘क्लीन चीट’ पीडीपीला नामंजूर
श्रीनगर, २९ जुलै/पीटीआय

२००६ साली घडलेल्या सेक्स स्कँडलमध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला व त्यांचे पिता आणि माजी केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला यांचा हात नसल्याचे सीबीआयने जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अध्यक्षांना एका पत्राव्दारे कळविले आहे. सीबीआयने अब्दुल्ला पिता-पुत्रांना दिलेली

 

क्लीन चीट आम्हाला नामंजूर असल्याचे पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी)म्हटले आहे. या सेक्स स्कँडलची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी पीडीपीने आज विधानसभेत केली.
२००६ सालच्या सेक्स स्कँडलप्रकरणी १७ आरोपींवर विविध न्यायालयांत खटले दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर नऊ आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. सेक्स स्कँडलमध्ये ओमर अब्दुल्ला व फारुक अब्दुल्ला यांचा हात नाही. आरोपींच्या यादीत ओमर अब्दुल्ला तसेच आरोपपत्र दाखल केलेल्यांमध्ये फारुक अब्दुल्लांचा समावेश नाही अशा आशयाचे पत्र सीबीआयचे संचालक अश्विनीकुमार यांनी आपल्याला पाठविले असल्याचे जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष अकबर लोन यांनी आज सांगितले. दरम्यान ओमर अब्दुल्ला यांचा सेक्स स्कँडलमध्ये सहभाग असल्याचे सीबीआयला या प्रकरणाच्या तपासादरम्यान आढळून आलेले नाही असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी मंगळवारी म्हटले होते.
दरम्यान ओमर अब्दुल्ला व फारुक अब्दुल्ला यांना सीबीआयने दिलेली क्लीन चीट आम्हाला मंजूर नाही. २००६ साली घडलेल्या सेक्स स्कँडलची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी अशी मागणी पीडीपीच्या आमदारांनी आज विधानसभेत लावून धरली. ओमर अब्दुल्ला यांचा या प्रकरणात सहभाग नसल्याचे पत्र सीबीआयकडून आपल्याला प्राप्त झाले असल्याचे जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष अकबर लोन यांनी सांगितले. आपल्याला सीबीआयने पाठविलेले पत्र विधानसभा अध्यक्षांना सभागृहाच्या पटलावर ठेवले. त्यावर ही क्लीन चीट आम्हाला मान्य नसून सेक्स स्कँडलची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी पीडीपीच्या आमदारांनी विधानसभेत लावून धरली. यावेळी ओमर अब्दुल्ला विधानसभेत उपस्थित नव्हते.
मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी पक्षाच्या आमदारांनी असा आरोप केला की, काही बडय़ा धेंडांना वाचविण्यासाठी सेक्स स्कँडलसारख्या गंभीर प्रकरणातील सत्यावर सीबीआय पडदा टाकू पाहात आहे. विधानसभेच्या अध्यक्षांना सीबीआयने पाठविलेल्या पत्राची प्रत फाडत मेहबूबा मुफ्ती यांनी अशी मागणी केली की, सेक्स स्कँडलची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. पीडीपीच्या आमदारांनी ओमर अब्दुल्ला यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. पीडीपीचे उपनेते मुझफ्फर हुसैन बेग यांना बोलण्याची विधानसभा अध्यक्षांनी परवानगी दिली पण सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी गदारोळ माजवून बेग यांना बोलू दिले नाही. या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटे तहकूब करण्यात आले.
सेक्स स्कँडलमध्ये ओमर अब्दुल्ला यांचा हात असल्याच्या मुझफ्फर हुसैन बेग यांनी मंगळवारी केलेल्या आरोपामुळे खुप राजकीय गदारोळ माजला. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल एन. एन. व्होरा यांची भेट घेऊन त्यांना आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता.
आपल्यावरील आरोपांवरील चौकशी करण्यात यावी व दोषी असल्याचे आढळल्यास त्वरित राजीनामा स्वीकारावा असे अब्दुल्ला यांनी राज्यपालांना सांगितले होते. मात्र हा राजीनामा न स्वीकारता ओमर अब्दुल्ला यांना तूर्तास मुख्यमंत्रीपदावर कायम राहावे असे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी सांगितले.