Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

आर.के.आनंद यांची शिक्षा कायम
नवी दिल्ली, २९ जुलै / पीटीआय

विख्यात फौजदारी वकील आर.के.आनंद यांना न्याय प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न करत न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल ठोठावलेली शिक्षा व ज्येष्ठता रद्द करण्याचा दिल्ली उच्च

 

न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज कायम ठेवला.
आनंद यांच्या बरोबरीने शिक्षा ठोठावलेले बीएमडब्ल्यू प्रकरणातील विशेष सरकारी वकील आय.यू.खान यांची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय न्यायमूर्ती बी.एन.आगरवाल, अफताब आलम, जी.एस.सिंघवी यांच्या खंडपीठाने दिला. मात्र, त्याचवेळी आनंद यांची शिक्षा का वाढवू नये असा प्रश्नही निकालावेळी विचारला.
१९९९ मध्ये माजी नौदलप्रमुख एस.ए.नंदा यांचा नातू संजीव नंदा याने आपली बीएमडब्ल्यू गाडी बेफामपणे चालवताना तीन पोलिसांसह सहाजणांना चिरडले होते. त्याला दोन वर्षांची शिक्षा नुकतीच सुनावली आहे. या प्रकरणात आनंद हे बचाव पक्षाची तर खान हे सरकारी पक्षाची बाजू मांडत होते. या प्रकरणातील एक वादग्रस्त साक्षीदार कुलकर्णी याला ३० मे २००७ रोजी पैसे देऊन आनंद व खान हे प्रभावीत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे एनडीटीव्हीने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये दिसून आले. उच्च न्यायालयाने याची दखल घेऊन या दोघांविरूद्ध कारवाई करून शिक्षा ठोठावली होती. आनंद व खान यांना चार महिने न्यायालयीन कारवाईत सहभागी होण्यावर बंदी व दोन हजारांचा दंड ठोठावला होता. या निकालाला दोघांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. एनडीटीव्हीचे स्टींग ऑपरेशन हे प्रसारमाध्यमांनी निवाडा देण्याचा प्रकार नसून सार्वजनिक हितासाठी केलेले कृत्य असल्याचे निरीक्षणही खंडपीठाने आपल्या निकालात नोंदविले आहे. दरम्यान, या निकालाचे अनेक ज्येष्ठ वकिलांनी स्वागत केले आहे.