Leading International Marathi News Daily

गुरुवार, ३० जुलै २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

‘आठवडय़ात नॅनो द्या नाहीतर ती नकोच’
बडोदा, २९ जुलै/पी.टी.आय.

बहुचर्चित नॅनो कार मुंबईतील अशोक विचारे यांना मिळाल्याचे कळताच देशातील पहिल्या महिला छायाचित्रकार ९६ वर्षीय होमी व्यारावाला यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पहिली नॅनो आपल्याला देण्याचे टाटा कंपनीने जाहीर केले होते. परंतु ते आश्वासन हवेत विरल्याने त्या संतापल्या आहेत. पाठोपाठ गुजरातेतील सुरेंद्रनगर येथील उमंगसिंग परमार यांनाही कार मिळाल्याने तर त्या अधिकच अस्वस्थ झाल्या. आता सात दिवसांत ही कार मिळाली नाही तर ती आपल्याला नकोच,

 

अशी तंबी त्यांनी दिली आहे.
सात दिवसांत कार मिळाली नाही तर मी नॅनोचे बुकिंग रद्द करीन, अशी धमकी व्यारावाला यांनी दिली. टाटा कंपनीने आपली पहिली कार प्रसारमाध्यमांतील पहिल्या महिला फोटोग्राफर या नात्याने दंतकथा बनून राहिलेल्या होमी व्यारावाला यांना देण्याचे जाहीर केले होते. व्यारावाला यांनी आपल्या उमेदीच्या काळात नेहरू, इंदिरा गांधी, फिरोज गांधी, विजयालक्ष्मी पंडित, लेडी माऊंटबॅटन, मोरारजी देसाई आदी नेत्यांची छायाचित्रे काढली होती. परदेशातही त्या छायाचित्रण मोहिमेवर गेल्या होत्या. त्यांची ही ख्याती लक्षात घेऊनच टाटांनी त्यांना ही ‘ऑफर’ दिली होती.
होमी व्यारावाला यांनी आपली ५५ वर्षांची जुनी फियाट कार (ही कार इटालीहून थेट आयात केली होती.) तिचे सुटे भाग मिळत नसल्याने या वर्षीच जानेवारी महिन्यात मुंबईत भावाकडे पाठवून दिली आहे. पहिली नॅनो त्यांना मिळणार, असे जाहीर झाल्याने कार आली का, अशा नातेवाईकांच्या तसेच परिचितांच्या चौकशांनी आपण बेजार झालो आहोत, अशी प्रतिक्रिया होमी यांनी दिली आहे.