Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

एकच चित्रपट मराठी आणि मल्ल्याळम भाषेत
काही चित्रपट मराठीनंतर हिंदी पडद्यावर जातात, काही दक्षिण भारतीय चित्रपट डब होऊन हिंदीत आणि मराठीतही येतात. आता मात्र एकच चित्रपट एकाच वेळी मराठी आणि मल्ल्याळम अशा दोन्ही भाषांमध्ये चित्रीत होत आहे. मराठी चित्रपटाचे नाव चित्रपट ‘त्रिनेत्र’ या नावाने तर मल्ल्याळम भाषेतील चित्रपट ‘त्रिकन्ना’ या नावाने प्रदर्शित होणार आहे.
व्ही. मेनन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्यांतील प्रेक्षकांना भावेल, असा या चित्रपटाचा विषय आहे. त्यामुळे या दोन्ही भाषांमध्ये चित्रपट करण्याचे ठरविले. हा एक ‘कौटुंबिक थरारपट’ आहे. पायाने अधू असलेल्या नवऱ्याला त्याच्या पत्नीवर संशय असतो. पत्नीचे एका तरुण मुलावर प्रेम असते. पत्नी त्या तरूण मुलाकडून आपल्या नवऱ्याचा खून करवते. पत्नीला केवळ त्याचा पैसा हवा असतो. तरुण मुलाचा केवळ एक प्यादे म्हणून वापर करण्यात येतो. पण मृत नवरा जिवंतच असतो. त्यानंतर घडणाऱ्या घटनांभोवती या चित्रपटाची कथा फिरते.
मराठी चित्रपटात दक्षिण भारतीय नट रजी आणि नेहा पेंडसे हे मुख्य भूमिकांमध्ये आहेत. नेहाच्या पतीची भूमिका मिलिंद गुणाजी याने साकारली आहे. मल्ल्याळम चित्रपटातही रजी व नेहा पेंडसे यांच्या भूमिका आहेत.
सुनील डिंगणकर

आशियातील सर्वात महागडा चित्रपट!
‘रेड क्लीफ’ हा निर्मितीवर सर्वाधिक खर्च झालेला आशियाई चित्रपट ठरला आहे. पण तेवढेच एक कारण या चिनी चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनासाठी पुरेसे नाही. हॉलीवूडमधले ‘फेस ऑफ ’, ‘मिशन इम्पॉसिबल’, ‘विंडटॉकर्स’, ‘पे चेक’ हे उल्लेखनीय चित्रपट खात्यावर असणाऱ्या आणि आपल्या स्टायलिस्ट शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘जॉन वू’ यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ८० दशलक्ष डॉलर्स इतकी भलीमोठी खर्चिक निर्मिती असणाऱ्या आणि चिनी स्टुडिओनी तयार केलेल्या या चित्रपटाने जपान सोडून सर्वच आशियाई देशांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर धुमाकूळ घातला आहे. मूळ चित्रपटाची लांबी सुमारे चार तास इतकी मोठी असल्यामुळे तो चीनमध्ये दोन भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. मात्र इतर देशांमधील प्रेक्षकांसाठी दोन्ही भागांना कात्री लावून अडीच तास इतकी लांबी करण्यात आली . चिनी बॉक्स ऑफिसवर आजतागायत सर्वाधिक व्यवसाय करणाऱ्या ‘टायटॅनिक’चा विक्रम मोडून ‘रेड क्लीफ’ने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चीनच्या इतिहासातील ‘हान’ साम्राज्याच्या ओहोटी काळावर प्रकाश टाकणाऱ्या ‘रेड क्लीफ बॅटल’चा आधार दिग्दर्शकाने चित्रपटासाठी घेतला आहे. त्यामुळे ‘हिरो’, ‘क्राऊंचिंग टायगर हिडन ड्रॅगन’, ‘वॉरलॉर्ड्स’च्या धर्तीवर प्रश्नचीन पौर्वात्य लढाया असलेला ‘रेड क्लीफ’ यंदाचा महत्त्वपूर्ण आशियाई चित्रपट ठरावा. डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या लढाया आणि बिग बजेटचा प्रभाव या चित्रपटात जागोजागी जाणवतो. ज्यांना ‘हिरो’, ‘क्राऊंचिंग टायगर..’ आणि मार्शल आर्टचा भरपूर वापर असणारे चिनी चित्रपट आवडत असतील त्यांच्यासाठी ‘रेड क्लीफ’ ही मोठी मेजवानी आहे.

प्रेमाचा नवा फंडा
सैफ अली खानने ट्रीम केलेली दाढी, दीपिका पदुकोण आणि सैफच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे वैतागलेली करिना या सर्व वादविवादांमुळे ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट आधीच चर्चेचा विषय झाला आहे. त्याचप्रमाणे टीव्हीवर होणाऱ्या प्रमोशनमधून दिसणारी गाणीही हीट झाली आहेत. त्यामुळे सैफ अली खानची पहिली वहिली निर्मिती असलेल्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाची सर्वच प्रेक्षक वाट पाहत आहेत. जय प्रेमासारखी भावना आर्थिक व्यवहारांसारखी कशी काय हाताळू शकतो, हे वीरला समजत नाही आणि हरलीनच्या प्रेमात वीरसिंग एवढा वेडा कसा होऊ शकतो, याचे जयला आश्चर्य वाटत असते. एकूणच कालच्या आणि आजच्या प्रेमाचा फंडा समजावून सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक इम्तियाझ अलीने या चित्रपटातून केला आहे. सारांशावरून फारसे काही कळत नाही. सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण दुहेरी भूमिकेत आहेत. म्हाताऱ्या सैफच्या भूमिकेत ऋषी कपूर तर म्हाताऱ्या दीपिकाच्या भूमिकेत अवा मुखर्जी आहे. ‘जब वुइ मेट’ चित्रपटामुळे इम्तियाझ अलीकडून अपेक्षा फार वाढल्या आहेत. या आठवडय़ात हा एकच चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे वीकएण्डला हा चित्रपट पाहण्यावाचून काहीच चॉइस नाही.