Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९


रायगड जिल्ह्यातील शहापूर-धेरंडसह नऊ गावांतील रस्ते गुरूवारी अलिबाग तालुक्यातील तीनविरा धरणाजवळील श्रीगणी (खिडकी) गावाच्या दिशेने फुलले होत़े तर सुधागड एज्युकेशन सोसायटी विद्यालय (कुरुळ), हाशिवरे हितवर्धक माध्यमिक शाळा, तीनविरा शाळा, फोपेरी शाळा,माणकुळे शाळा या शाळांमधील विद्यार्थीही गणवेशात याच दिशेने निघाले होत़े श्रीगणीला मैदानावर दोन महाकाय क्रेन सज्ज होत्या तर ‘पवनचक्की’ चे चित्र या मैदानात आखून ठेवण्यात आले होत़े कार्लेखिंडीच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या हिरव्यागार परिसरातआखलेल्या पवनचक्कीच्या आकारात रांगोळीचे ठिपके भरावेत तसे ग्रामस्थ आणि विद्यार्थी जाऊन बसत होत़े हळूहळू आकार येऊ लागला आणि मानवी ठिपक्यांतून संपूर्ण पवनचक्कीचा अद्भूत आकार तयार झाला़ क्रेनच्या हूक ला लावलेल्या लोखंडी पाळण्यात छायाचित्रकार उभे राहिले, पाळणा आकाशात सुमारे ५० मीटर उंच गेला आणि एक विलोभनीय साक्षात्कारच अनुभवण्यास मिळाला.. सर्वाच्या कॅमेराच्या शटर्सना सेकंदाचीही उसंत नव्हती़ मानवी ठिपक्यांच्या या पवनचक्कीतून संदेश येत होता़ ‘नो कोल’ ‘दगडी कोळशाला नकार, पवन ऊर्जेचा करू स्वीकार’, असा संदेश देणाऱ्या हजारो मानवी ठिपक्यांनी पवनचक्कीच्या आकाराचे चित्र साकारण्यात आले. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांसाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर सर्वप्रथम आंदोलन करून अलिबाग व तालुक्यातील टाटा, रिलायन्स, पटनी, गेल, इस्पात आदी कंपन्यांच्या १०हजार मेगाव्ॉट औष्णिक ऊर्जानिर्मितीच्या विरुद्ध गेली चार वष्रे सुरू असलेला लढा जागतिक मंचावर आणण्याचे काम गुरुवारी या आंदोलकांनी केल़े संपूर्ण देशात असे आंदोलन सर्वप्रथम करुन जागतिक तापमानवाढीच्या प्रष्टद्धr(२२४)नाला अलिबाग तालुक्यातील नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर वाचा फोडली आह़े (छाया: नरेंद्र वासकर)

विर्क यांना मुदतवाढ मिळाल्याने पवारांना दणका !
मुंबई, ३० जुलै / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या वेळी पोलीस महासंचालकपदी अनामी रॉय हे असावेत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची इच्छा काही फलद्रूप होऊ शकलेली नाही ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पोलीस महासंचालक एस. एस. विर्क यांना मुदतवाढ मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने विर्क यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. पोलीस महासंचालक विर्क हे नियत वयोमानानुसार उद्या निवृत्त होणार होते. मात्र मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या धर्तीवर पोलीस महासंचालक विर्क यांनाही मुदतवाढ मिळाली पाहिजे, अशी भूमिका चव्हाण यांनी घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी पोलीस महासंचालकपदी अनामी रॉय हे असावेत, अशी पवारांची मनोमन इच्छा होती. कारण निवडणुकीच्या वेळी रॉय हे राष्ट्रवादीला फायदेशीर ठरू शकले असते.

आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या सोसायटय़ांचे व्यापारीकरण
निशांत सरवणकर, मुंबई, ३० जुलै

आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची मुंबईत घरे नसल्याने या सोसायटय़ांना शासनाकडून विशेषाधिकार वापरून भूखंड वितरीत केले जातात. या भूखंडांवर हे अधिकारी इमारती बांधतात आणि हक्काच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करतात. या फ्लॅटमध्ये हे सर्व अधिकारी प्रामुख्याने निवृत्तीनंतरच राहावयास जातात. परंतु तोपर्यंत भाडय़ाने फ्लॅट देऊन गडगंज मलिदा कमावीत असतात. गेल्या काही वर्षांंत शासनाने वितरीत केलेल्या भूखंडांवर इमारती बांधण्याबरोबरच त्याचे संपूर्णपणे व्यापारीकरण करून या सोसायटय़ांनी रग्गड नफा कमावल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या नफ्यातून या अधिकाऱ्यांनी आपले फ्लॅट तहहयात देखभाल खर्चातून मुक्त करून घेतले आहेत किंवा नाहीत हे मात्र कळू शकलेले नाही.

आयसीसीच्या ‘अ‍ॅन्टी-डोपिंग’ चालीला बीसीसीआय शह देणार
उदय रंगनाथ, नागपूर, ३० जुलै

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीच्या अनुषंगाने त्यांच्या विचाराधीन असलेल्या जाचक अटी खेळाडूंवर लादण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सर्वेसर्वा संघटना असलेल्या आयसीसी यांच्यात पुन्हा एकदा जोरदार संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. आयसीसीचे ‘अ‍ॅन्टी डोपिंग’ नियम, हे खेळाडूंच्या खाजगी आयुष्यावर थेट हल्ला करणारे असल्याचे ठरवून बीसीसीआयने याला कडवा विरोध करण्याचा पवित्रा घेतला आहे. या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी येत्या रविवारी मुंबईला बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची तातडीची बैठक होणार आहे. आयसीसीच्या विचाराधीन असलेल्या या जाचक अटी भारतीय खेळाडूंनी आधीच फेटाळल्या असल्या तरी त्यांचे विचार मांडण्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या तीन प्रमुख खेळाडूंनाही यासाठी आमंत्रित केले आहे. या मुद्यावर बीसीसीआयचा खेळाडूंना पूर्ण पाठिंबा राहणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.

भारत-पाक संबंधांवर सोनियांकडून मनमोहन सिंग यांची पाठराखण
नवी दिल्ली, ३० जुलै/खास प्रतिनिधी

भारत-पाक संबंध तसेच सर्व प्रमुख परराष्ट्रविषयक धोरणांवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी लोकसभेत केलेल्या निसंदिग्ध आणि ठाम निवेदनाची पाठराखण करताना पाकिस्तानविषयी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असे स्पष्ट प्रतिपादन आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले. आज सकाळी काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधताना सोनिया गांधी यांनी भारत-पाक संबंधांवरून काँग्रेस नेत्यांच्या मनातील ‘संभ्रम’ दूर केला. पाकबद्दलची काँग्रेसची भूमिका बदललेली नसून त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसाव्या, असे त्यांनी स्पष्ट केले. भारत-पाक समग्र संवादातून दहशतवादाचा मुद्दा बाजूला काढण्याचा तसेच बलुचिस्तानचा मुद्दा स्वीकारण्याच्या मनमोहन सिंग यांच्या भूमिकेमुळे सरकार आणि काँग्रेस पक्षात पाकिस्तान मुद्यावरून मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त पक्षातीलच काही नेते पसरवित आहेत.

एक कोटी रुपयांच्या लाचप्रकरणी बुटासिंग यांच्या मुलाला अटक
मुंबई, ३० जुलै / प्रतिनिधी

नाशिकमधील कचरा उचलणारा कंत्राटदार रामराव पाटील याच्याकडून एक कोटींची लाच मागितल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आखिल भारतीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे अध्यक्ष बुटा सिंग यांच्या मुलास ताब्यात घेतले आहे. रामराव पाटील याच्यावरील अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल झालेले एक प्रकरण मिटविण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती, असा आरोप आहे. बुटा सिंग यांच्या मुलाचे नाव सरबज्योत सिंग उर्फ हॅपी सिंग असून, सीबीआयने त्याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अधिक चौकशीसाठी त्याला मुंबईला आणले आहे.

पिसाळलेल्या हत्तीच्या हल्ल्यातून अभिषेक-अ‍ॅश बचावले
माहुताने मात्र जीव गमावला
त्रिचूर, ३० जुलै/पी.टी.आय.

पिसाळलेल्या हत्तीने केलेल्या हल्ल्यामधून अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बालंबाल बचावले पण माहूताला जीव गमवावा लागला. मणीरत्नम यांच्या ‘रावण’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान ही दुर्घटना घडली. अभिषेक आणि अ‍ॅश यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे चित्रिकरण येथील अथीरापल्ली धबधबा परिसरात सुरू होते. यावेळी अचानक एक हत्ती पिसाळला व त्याने सेटवर धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे सेटवर एकच पळापळ झाली. अभिषेक तसेच ऐश्वर्या या दोघांनाही तातडीने सेटच्या बाहेर नेण्यात आले. हत्तीने केलेल्या हल्ल्यामध्ये अन्य कोणी जखमी झाले नसले तरी त्यावर अंकुश ठेवणाऱ्या माहुताला मात्र हत्तीने ठार केले.

दाऊद, छोटा शकीलला ताब्यात देण्यास पाकिस्तानचा नकार
नवी दिल्ली, ३० जुलै/वृत्तसंस्था

दाऊद इब्राहिम, छोटा शकील आदी आंतरराष्ट्रीय कुख्यात अतिरेक्यांसह एकूण ४२ जणांना आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी भारतातर्फे सातत्याने केली जात आहे. परंतु यासंदर्भात पाकिस्तानने कायम आडमुठी भूमिका घेत सहकार्य करण्यास नकार दिला, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी आज राज्यसभेत दिली. या यादीमध्ये दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन या भारतीय नागरिकत्व असलेल्या अतिरेक्यांचाही समावेश आहे. परंतु हे अतिरेकी पाकिस्तानात नाहीतच, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे, असे कृष्णा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या ४२ जणांमधील जे अतिरेकी पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांच्याविरुद्ध पुरेसा पुरावा नाही तसेच पाकिस्तानातील गुन्हेगारांचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी आवश्यक असा करार उभय देशांमध्ये झालेला नाही, अशी कारणे दिली आहेत. मात्र असा करार करण्यासाठी भारतातर्फे आजवर तब्बल ११ वेळा प्रयत्न करण्यात येऊनही पाकिस्तानने असा करार अद्याप केलेला नाही, असेही कृष्णा यांनी निदर्शनास आणले.

 

प्रत्येक शुक्रवारी