Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

आयसीसीच्या ‘अ‍ॅन्टी-डोपिंग’ चालीला बीसीसीआय शह देणार
उदय रंगनाथ, नागपूर, ३० जुलै

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीच्या अनुषंगाने त्यांच्या विचाराधीन असलेल्या जाचक अटी खेळाडूंवर लादण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सर्वेसर्वा संघटना असलेल्या आयसीसी यांच्यात पुन्हा एकदा जोरदार संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. आयसीसीचे ‘अ‍ॅन्टी डोपिंग’ नियम, हे खेळाडूंच्या खाजगी आयुष्यावर थेट हल्ला करणारे असल्याचे ठरवून बीसीसीआयने याला कडवा

 

विरोध करण्याचा पवित्रा घेतला आहे.
या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी येत्या रविवारी मुंबईला बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची तातडीची बैठक होणार आहे. आयसीसीच्या विचाराधीन असलेल्या या जाचक अटी भारतीय खेळाडूंनी आधीच फेटाळल्या असल्या तरी त्यांचे विचार मांडण्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग या तीन प्रमुख खेळाडूंनाही यासाठी आमंत्रित केले आहे. या मुद्यावर बीसीसीआयचा खेळाडूंना पूर्ण पाठिंबा राहणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.
जागतिक उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी संस्थेच्या (वर्ल्ड अ‍ॅन्टी-डोपिंग एजन्सी, ‘वाडा’) नियमानुसार आयसीसीने खेळाडूंसाठी जे नवे नियम आखले आहेत, त्यानुसार कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी, मग तो आयसीसीची स्पर्धा खेळत असो वा दोन देशांमधील मालिका किंवा सराव सत्रादरम्यान, इतकेच नव्हे तर, खेळाडूंच्या सुटीच्या काळातही त्यांना या चाचणीला हजर राहावे लागणार आहे. आयसीसीचा हा नियम लगेच १ ऑगस्ट २००९ पासून अमलातही येणार आहे. कुठल्याही क्षणी घेतल्या जाणाऱ्या या चाचणीसाठी आयसीसीने क्रिकेट खेळणाऱ्या देशातील प्रत्येकी आठ खेळाडूंना निवडले आहे. यात भारताच्या सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, महेंद्र सिंग धोनी, मुनाफ पटेल, हरभजन सिंग, युवराज सिंग, गौतम गंभीर आणि झहीर खानचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी पुढील ९० दिवसातील खेळाडूंच्या कार्यक्रमाची माहिती आयसीसीने मागितली आहे. या काळात ते सुटी घालवत असतील तरी केव्हाही त्यांना या चाचणीसाठी कोणतीही पूर्वसूचना न देता बोलावले जाऊ शकेल. समजा खेळाडूंच्या दिनक्रमात काही बदल झाला तर तोही तातडीने आयसीसीला कळवावा लागणार आहे. अन्यथा, त्या खेळाडूला दोषी धरले जाईल. याची शिक्षा म्हणून त्याच्यावर १२ ते २४ महिन्यांची बंदीही घातली जाऊ शकेल. आणखी चूक केल्यास, त्यात वाढही होऊ शकेल परंतु, भारताच्या या आठही खेळाडूंनी आयसीसीच्या या नियमाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, क्रिकेटविषयक कुठलेही कार्यक्रम सुरू असताना या चाचणीसाठी ते केव्हाही उपलब्ध राहण्याची त्यांनी तयारी दर्शवली असल्याची बीसीसीआयच्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आश्चर्याची बाब अशी की, या नव्या नियमाला भारत वगळता क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच देशांनी परस्पर मान्यताही दिली आहे. असाच आग्रह फुटबॉलच्या जागतिक महासंघाकडे धरण्यात आल्यावर त्यांनी तो लागलीच उधळून लावला होता. आयसीसीने हा आग्रह त्यांच्या सदस्य संघटनांकडे धरला असला तरी गेल्या काही महिन्यांपासून बीसीसीआयने मात्र त्याला जोरदार विरोध दर्शवला आहे.