Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

भारत-पाक संबंधांवर सोनियांकडून मनमोहन सिंग यांची पाठराखण
नवी दिल्ली, ३० जुलै/खास प्रतिनिधी

भारत-पाक संबंध तसेच सर्व प्रमुख परराष्ट्रविषयक धोरणांवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बुधवारी लोकसभेत केलेल्या निसंदिग्ध आणि ठाम निवेदनाची पाठराखण करताना पाकिस्तानविषयी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, असे स्पष्ट प्रतिपादन आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले. आज सकाळी काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधताना सोनिया

 

गांधी यांनी भारत-पाक संबंधांवरून काँग्रेस नेत्यांच्या मनातील ‘संभ्रम’ दूर केला. पाकबद्दलची काँग्रेसची भूमिका बदललेली नसून त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसाव्या, असे त्यांनी स्पष्ट केले. भारत-पाक समग्र संवादातून दहशतवादाचा मुद्दा बाजूला काढण्याचा तसेच बलुचिस्तानचा मुद्दा स्वीकारण्याच्या मनमोहन सिंग यांच्या भूमिकेमुळे सरकार आणि काँग्रेस पक्षात पाकिस्तान मुद्यावरून मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त पक्षातीलच काही नेते पसरवित आहेत. त्यामुळे हा मुद्दा विरोधकांच्या हाती लागला. पण त्यावर मनमोहन सिंग यांनी बुधवारी लोकसभेत स्पष्टीकरण दिल्यानंतर सोनिया गांधींनी आज प्रथमच त्यांच्या भूमिकेचे जाहीरपणे समर्थन केले. जोपर्यंत पाकिस्तान मुंबईवरील हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कायद्याच्या सापळ्यात अडकवित नाही आणि भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांसाठी आपल्या भूमीचा वापर थांबवित नाही, तोपर्यंत उभय देशांमध्ये अर्थपूर्ण चर्चा होऊ शकत नाही, या पंतप्रधानांच्या भूमिकेचा सोनियांनी आजच्या बैठकीत पुनरुच्चार केला. पाकिस्तानशी चर्चेची प्रक्रिया पुन्हा सुरु व्हायला हवी, पण त्यासाठी भारताला अपेक्षित असलेला गंभीरपणा पाकिस्तानला आपल्या कृतीत आणावा लागेल, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. युपीए सरकारमध्ये यावेळी काँग्रेसचे मंत्र्यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश असून त्यांनी कोणत्याही प्रकारची टाळाटाळ न करता पक्षाने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने काम करावे. देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खासदारांनी मंत्र्यांची मदत घ्यावी आणि मंत्र्यांनीही खासदारांना वेळ द्यावा. देशाच्या कानाकोपऱ्यात जात असताना मंत्र्यांनी पक्षाच्या कार्यालयांना भेट द्यावी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधावा. विशेषत काँग्रेसची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये केंद्रीय मंत्र्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांंच्या भावना जाणून घेऊन त्यांच्या संघर्षांत हातभार लावावा, असे निर्देश सोनिया गांधी यांनी दिले आहेत.