Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

एक कोटी रुपयांच्या लाचप्रकरणी बुटासिंग यांच्या मुलाला अटक
मुंबई, ३० जुलै / प्रतिनिधी

नाशिकमधील कचरा उचलणारा कंत्राटदार रामराव पाटील याच्याकडून एक कोटींची लाच मागितल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आखिल भारतीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे अध्यक्ष बुटा सिंग यांच्या मुलास ताब्यात घेतले आहे. रामराव पाटील याच्यावरील अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल झालेले एक प्रकरण मिटविण्यासाठी त्याने

 

ही लाच मागितली होती, असा आरोप आहे.
बुटा सिंग यांच्या मुलाचे नाव सरबज्योत सिंग उर्फ हॅपी सिंग असून, सीबीआयने त्याला दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अधिक चौकशीसाठी त्याला मुंबईला आणले आहे. रामराव पाटील विरोधात ९ जुलै रोजी नाशिकमध्ये अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सरबज्योत सिंगविरुद्ध पित्याच्या पदाचा वापर करून, हे प्रकरण मिटविण्यासाठी एक कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे. ‘आम्ही सरबज्योतला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे’, असे सीबीआयचे सहसंचालक (पश्चिम विभाग) ऋषीराज यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणी एकूण तीन जणांना अटक करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्याबाबत कोणतीही माहिती देण्यास ऋषीराज यांनी नकार दिला. राज्यातील अनेक शहरांमध्ये गाजलेल्या घंटागाडी प्रकरणात सहभागी असलेल्या रामराव पाटीलने बहुचर्चित चंद्रकांत बढे पतसंस्थेकडून मोठय़ा रकमेचे कर्ज घेतले होते. कचरा वाहतुकीसाठी ट्रॅक्टरसारखी उपकरणे खरेदी करण्याच्या नावाखाली त्याने आपल्याकडे काम करणाऱ्या काही सफाई कर्मचाऱ्यांच्या नावे ते घेतले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी ९ जुलै रोजी त्याच्याविरोधात आर्थिक फसवणुकीसह अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. तेव्हापासून रामराव पाटील नाशिकमधून परागंदा होता.
हे कर्जाचे प्रकरण उघडकीस आले तेव्हा नाशिकमध्ये एकच खळबळ माजली होती. नेमके त्याचवेळी आखिल भारतीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचे अध्यक्ष बुटा सिंग नाशिक दौऱ्यावर होते. या प्रकरणी रामराव पाटीलविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास सांगून, गरीब सफाई कामगारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईची सूचना बुटा सिंग यांनी केली होती.