Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पिसाळलेल्या हत्तीच्या हल्ल्यातून अभिषेक-अ‍ॅश बचावले
माहुताने मात्र जीव गमावला
त्रिचूर, ३० जुलै/पी.टी.आय.

पिसाळलेल्या हत्तीने केलेल्या हल्ल्यामधून अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बालंबाल बचावले पण माहूताला जीव गमवावा लागला. मणीरत्नम यांच्या ‘रावण’ चित्रपटाच्या

 

चित्रिकरणादरम्यान ही दुर्घटना घडली. अभिषेक आणि अ‍ॅश यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे चित्रिकरण येथील अथीरापल्ली धबधबा परिसरात सुरू होते. यावेळी अचानक एक हत्ती पिसाळला व त्याने सेटवर धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे सेटवर एकच पळापळ झाली. अभिषेक तसेच ऐश्वर्या या दोघांनाही तातडीने सेटच्या बाहेर नेण्यात आले. हत्तीने केलेल्या हल्ल्यामध्ये अन्य कोणी जखमी झाले नसले तरी त्यावर अंकुश ठेवणाऱ्या माहुताला मात्र हत्तीने ठार केले. या हत्तीने रस्त्यावरही धुमाकूळ घातल्याने कलाकार तसेच तंत्रज्ज्ञ हॉटेलवर जाऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांना येथून जवळच असलेल्या वाझाचल येथील वनविभागाच्या विश्रांतीगृहात नेण्यात आले.
मणिरत्नमला नोटीस
दरम्यान, चित्रपटात हत्तींचा वापर करण्यासाठी आवश्यक ती परवानगी न घेतल्याबद्दल ‘रावण’ चित्रपटाचे दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या कंपनीला अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या चित्रिकरणासाठी दोन हत्ती मागविण्यात आले होते, त्यातील एका पिसाळलेल्या हत्तीने माहुतास ठार मारल्याने हा प्रकार उजेडात आला. या संदर्भात अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाचे सचिव डी. राजशेखर यांनी चेन्नईहून पी.टी.आय.शी बोलताना सांगितले की, मणिरत्नम यांनी चित्रिकरणात हत्तींचा वापर करण्यासाठी कोणत्याही प्रकारे परवानगी घेतली नव्हती. चित्रपट, टीव्ही मालिका अथवा जाहिराती यापैकी कशातही प्राण्यांचा वापर करायचा असल्यास त्यासाठी रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे, असे ते म्हणाले.