Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

प्रादेशिक

लहान मुलांनी दहीहंडी फोडण्यास कोर्टाची मनाई नाही
मुंबई, ३० जुलै/प्रतिनिधी

गोकुळअष्टमीच्या दिवशी दहीहंडय़ा फोडणाऱ्या पथकांतील ‘गोिवदा’ खाली पडून दगावण्याच्या किंवा जायबंदी होण्याच्या दरवर्षी होणाऱ्या घटना लक्षात घेऊन निदान लहान मुलांना तरी या धोकादायक कार्यक्रमात भाग घेण्यास मनाई करावी, ही विनंती मुंबई उच्च न्यायालयाने आज मान्य केली नाही. मात्र हजारोंच्या सहभागाने साजरा होणारा हा उत्सव सुरक्षितपणे साजरा व्हावा यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून देणे गरजेचे असेल तर सरकारने त्यावर विचार करून तसा निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. यंदाचा ‘गोिवदा’ उत्सव १४ ऑगस्ट रोजी आहे.

आठवले ‘कालचा खेळ’ पुन्हा आज करणार?
प्रमुख नेते ६ ऑगस्टच्या बैठकीला जाणार
बंधुराज लोणे, मुंबई, ३० जुलै

रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी बोलावलेल्या रिपब्लिकन ऐक्याच्या बैठकीबाबत अन्य रिपब्लिकन नेत्यांनी मात्र सावधगिरीची भूमिका घेतली आहे. ऐक्य तर झाले पाहिजे मात्र ऐक्य करण्यामागे आठवलेंचा हेतू काय आहे, असा साशंक सवाल या नेत्यांकडून विचारला जात आहे. दरम्यान, आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली राज्यसभा उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते समाधान व्यक्त करीत आहेत, तर अन्य नेते मात्र हा एक ‘स्टंट’ आहे, असा आरोप करीत आहेत.

१९९५ नंतरच्या दीड लाख झोपडय़ा शासनाकडून जमीनदोस्त
समर खडस, मुंबई, ३० जुलै

राज्य शासनाने २००० सालापर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण दिले असले तरी राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर दिलेल्या माहितीतूनच १९९५ नंतरच्या झोपडय़ा जुन्या अधिनियमानुसार निष्कासित करण्यासाठी वेगाने पावले उचलली होती. त्यानुसार राज्य शासनाने १,४९,२४९ झोपडय़ा निष्कासित केल्या व २६,९४४ जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते.

महासंचालकांच्या मुदतवाढीस पोलीस उपनिरीक्षकाचेच आव्हान!
मुंबई, ३० जुलै/प्रतिनिधी

राज्याचे पोलीस महासंचालक सर्बजीत सिंग विर्क यांना उद्या ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याच्या निर्णयासंबंधीचे सर्व रेकॉर्ड उद्या शुक्रवारी सकाळी सादर करण्यास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले आहे. मरोळ पोलीस ठाण्यात सशस्त्र दलात असलेले एक पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव िशदे यांनी केलेल्या जनहित याचिकेच्या निमित्ताने हा विषय मुख्य न्यायाधीश न्या. स्वतंत्र कुमार व न्या. अजय खानविलकर यांच्या खंडपीठापुढे आला होता.

कसाबच्या जबाबाची सीडी चोरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा!
न्यायालयाचे सूचनावजा आदेश
मुंबई, ३० जुलै / प्रतिनिधी

पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याचा जबाब नोंदविताना पोलिसांनी त्याचे व्हिडियो शूटींग केले होते. मात्र एका खाजगी वृत्तवाहिनीने नुकतेच त्या व्हिडियो शूटींगचे केलेले प्रसारण पोलिसांसाठी अडचण ठरली आहे. जबाबाची ही सीडी वृत्तवाहिनीपर्यंत पोहोचलीच कशी याची चौकशी करा आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर चोरी आणि फौजदारी विश्वासाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करा, असे सूचनावजा आदेश आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनी अभियोग पक्षाला दिले.

रेखा देशपांडे, धनराज वंजारी, प्रेमानंद गज्वी, सुहास बारटक्के, डॉ. द. ना. धनागरे यांची निवड
आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर
मुंबई, ३० जुलै/प्रतिनिधी

‘आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान’तर्फे विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या ‘आचार्य अत्रे पुरस्कारा’ची घोषणा आज करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. द. ना. धनागरे, पोलीस अधीक्षक धनराज वंजारी, लेखक सुहास बारटक्के, नाटककार प्रेमानंद गज्वी, ‘लोकसत्ता’च्या वरिष्ठ सहसंपादिका रेखा देशपांडे आदींची आचार्य अत्रे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

काही पाणी साचणारच; नसता आरडाओरडा नको!
अभिजित घोरपडे, मुंबई, ३० जुलै

सात बेटांची मुंबई आता ४३७ चौरस किलोमीटरची झाली, वस्ती-इमारती वाढल्या, अतिक्रमणे फोफावली, पाणी वाहून नेणारे नैसर्गिक प्रवाह संपले, पुराचा आघात झेलणारी खाडय़ांजवळची खारफुटी तुटली, पाणी मुरण्याचे प्रमाणही शून्य झाले.. पण पावसाचे प्रमाण तसेच आहे, समुद्राला येणारी भरतीसुद्धा कायम आहे. मग पाणी जाणार कुठे आणि त्याचा निचरा होणार तरी कसा? मुंबईच्या सर्वच नैसर्गिक स्रोतांवरचा (जमीन, तळी, नैसर्गिक प्रवाह, समुद्रसुद्धा) ताण प्रचंड वाढला आहे.

देशात केवळ तीन टक्केविद्यार्थ्यांनाच सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वारस्य!
मुंबई, ३० जुलै/प्रतिनिधी

सरकारी नोकरीत असणे हे काही वर्षांपूर्वी आयुष्यातील सुरक्षितता आणि स्थैर्य असल्याचे मानले जात होते. पण गेल्या दशकात देशात रुजलेल्या कॉर्पोरेट कल्चरमुळे आज ही परिस्थिती बदलली आहे. याचा प्रत्यय नुकताच टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने (टीसीएस) केलेल्या ‘वेब २.० जनरेशन’ या सर्वेक्षणात आला आहे. देशातील केवळ तीन टक्के विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वारस्य असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. देशभरातील १२ शहरातील आठ ते १८ वयोगटातील १४ हजार विद्यार्थ्यांचे विविध निकषांवर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

मुंबई -गोवा महामार्ग अर्थात मृत्यूचा सापळा :चौपदरीकरणाचा अद्याप मुहूर्तही नाही!
रवींद्र पांचाळ, मुंबई, ३० जुलै

कोकणाची कायम उपेक्षा करणाऱ्या राज्यकर्त्यांनी मुंबई - गोवा या मृत्यूचा सापळा ठरलेल्या राष्ट्रीय क्र. १७ या महामार्गाबाबतही उदासीनता आणि दिरंगाईचे धोरण अवलंबिले असून वारंवार चौपदरीकरणाची मागणी होऊनही त्यासंदर्भात कोणतीच ठोस हालचाल दृष्टीपथात नाही. नाही म्हणायला, या चौपदरीकरणाच्या कामासाठी सर्वेक्षण करण्यासाठी आणि सुसाध्यता अहवालासाठी सल्लागार नेमणुकीच्या निविदा आताशा कुठे मागवल्या गेल्या आहेत. त्यामुळे या महामार्गावर पुढील काही वर्षे भीषण अपघातांची मालिका सुरुच राहणार हे स्पष्ट झाले आहे.

बोरिवली अत्रे कट्टय़ावर बासरीवादन
मुंबई, ३० जुलै/प्रतिनिधी

बोरिवली (प.) येथे चालणाऱ्या आचार्य अत्रे कट्टय़ावर या रविवारी, २ ऑगस्ट रोजी ख्यातनाम बासरीवादक आनंद काशीकर यांचे बासरीवादन आयोजित करण्यात आले आहे. या अत्रे कट्टय़ाचे कार्यक्रम पावसाळ्यात चोगले कुटुंबियांच्या श्रीराम हनुमान मंदिर, बाभई नाका, बोरिवली (प.) येथे होतात. रविवारचा कार्यक्रमही याच ठिकाणी ५ ते ७ या वेळात होणार आहे. आनंद काशीकर हे स्व. पं. मल्हारराव कुलकर्णी यांचे पट्टशिष्य असून देशात व परदेशात अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. रसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती अत्रे कट्टय़ाचे संयोजक वर्षां रेगे तसेच शुभांगी व अविनाश बाक्रे यांनी केले आहे.

तलाव अजून तहानलेलेच!
१५ ऑगस्टपर्यंत कृत्रिम पावसाचा प्रयोग
मुंबई, ३० जुलै / प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी मोडकसागर वगळता इतर सर्व तलाव अजूनही तहानलेलेच आहेत. या आठवडय़ात तलाव क्षेत्रात पाऊस झाला नाही तर कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. २२ जुलैपर्यंत तलाव क्षेत्रात पाऊस पडत होता. २२ जुलै रोजी मोडकसागर वाहायला लागला. मात्र इतर प्रमुख तलावांच्या क्षेत्रात पुरेसा पाऊस पडलेला नाही. जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात पाऊस सुरूच राहील, अशी शक्यता वेधशाळेने व्यक्त केली होती. त्यामुळे तलाव पूर्ण भरतील, असे प्रशासनाला वाटत होते. मात्र पुन्हा एकदा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे अजूनही प्रमुख तलावांत पुरेसा पाणीसाठा नाही. अप्पर वैतरणा ३८ टक्के, तानसा ५६, भातसा ४९, विहार २७ तर तुलसी ६६.८ टक्के भरले आहेत. त्यामुळे या आठवडय़ात पाऊस पडला नाही तर कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची तयारी पालिकेने केली आहे. अतिरिक्त आयुक्त अनिल डिग्गीकर यांनी नुकतीच हैदराबाद येथे जाऊन आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा अभ्यास केला. हा प्रयोग यशस्वी झाला असून पावसात १५-२० टक्के वाढ झाली आहे, असे डिग्गीकर यांनी सांगितले.