Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

आठवले ‘कालचा खेळ’ पुन्हा आज करणार?
प्रमुख नेते ६ ऑगस्टच्या बैठकीला जाणार
बंधुराज लोणे, मुंबई, ३० जुलै

रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी बोलावलेल्या रिपब्लिकन ऐक्याच्या बैठकीबाबत अन्य रिपब्लिकन नेत्यांनी मात्र सावधगिरीची भूमिका घेतली आहे. ऐक्य तर झाले पाहिजे मात्र ऐक्य करण्यामागे आठवलेंचा हेतू काय आहे, असा साशंक सवाल या नेत्यांकडून विचारला जात आहे.

 

दरम्यान, आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली राज्यसभा उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते समाधान व्यक्त करीत आहेत, तर अन्य नेते मात्र हा एक ‘स्टंट’ आहे, असा आरोप करीत आहेत.
रिपब्लिकन ऐक्यासाठी आठवले यांनी येत्या ६ ऑगस्ट रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीला आठवले यांनी प्रमुख नेत्यांसह आंबेडकरी चळवळीतील अन्य छोटय़ा मोठय़ा गटांनाही निमंत्रित केले आहे. त्यामुळे या बैठकीविषयी आठवले खरेच गंभीर आहेत का, अशी शंका काही नेते व्यक्त करीत आहेत. रिपब्लिकन पक्षांचे छोटे मोठे अनेक गट आहेत. या छोटय़ा - मोठय़ा गटांना ऐक्य प्रक्रियेत घेऊन आठवले यांना काय साध्य करायचे आहे, असा सवाल विचारला जात आहे.
१९८९ मध्ये झालेल्या ऐक्याच्या वेळीही अशीच तथाकथित ऐक्याची मोट बांधण्यात आली होती. कोणासोबत युती करायची यावरून ही मोट फुटली तेव्हा या प्रक्रियेत आठवले यांनी गोळा केलेल्या छोटय़ा मोठय़ा नेत्यांनी आठवले यांचे समर्थन केले होते. हाच कालचा खेळ आठवले आजही करण्याची शक्यता सावध नेत्यांना वाटते आहे.
पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की ऐक्य झाले पाहिजे. आठवले यांनी बोलावले म्हणून नव्हे तर ऐक्याची समाजाला गरज आहे म्हणून मी बैठकीला जाणार आहे. आठवले यांनी राज्यसभा का नाकारली , त्यांना खरेच राज्यसभा देण्यात येत होती का नाही, हे आठवले यांनाच माहीत, अशी टीकाही त्यांनी केली. आठवले यांना राज्यसभा नाकारायची होती तर त्यांनी आधी मागितली कशासाठी? असा सवाल माजी आमदार आणि रिपब्लिकन (डेमोक्रॅटिक)चे अध्यक्ष टी. एम. कांबळे यांनी या संदर्भात विचारला. आपला पक्ष तर सुरुवातीपासूनच ऐक्यवादी भूमिका घेत आहे. मात्र प्रमुख नेते प्रतिसाद देत नाहीत. ऐक्य झाले पाहिजे, मात्र ते केवळ एखाद्या नेत्याच्या फायद्यासाठी नव्हे तर समाजाच्या हितासाठी झाले पाहिजे, अशी आशा कांबळे यांनी व्यक्त केली. गवई गटाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी ऐक्यप्रक्रियेला पाठिंबा दिला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी आठवले यांचे अभिनंदन केले असून आठवले यांनी राज्यसभा नाकारल्यामुळे समाजात विश्वासाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, या निर्णयामुळे ऐक्य प्रक्रियेला गती मिळाली आहे, असे म्हटले आहे.