Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

कसाबच्या जबाबाची सीडी चोरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा!
न्यायालयाचे सूचनावजा आदेश
मुंबई, ३० जुलै / प्रतिनिधी

पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याचा जबाब नोंदविताना पोलिसांनी त्याचे व्हिडियो शूटींग केले होते. मात्र एका खाजगी वृत्तवाहिनीने नुकतेच त्या व्हिडियो शूटींगचे केलेले प्रसारण

 

पोलिसांसाठी अडचण ठरली आहे. जबाबाची ही सीडी वृत्तवाहिनीपर्यंत पोहोचलीच कशी याची चौकशी करा आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर चोरी आणि फौजदारी विश्वासाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करा, असे सूचनावजा आदेश आज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनी अभियोग पक्षाला दिले.
मुंबईवरील हल्ल्याच्या रात्रीच डी. बी. मार्ग पोलिसांनी गिरगाव चौपाटी येथे कसाबला अटक केली होती. मात्र कसाब जखमी असल्याने त्याला उपचारासाठी नायर रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्या वेळी पोलिसांनी रुग्णालयात त्याचा जबाब नोंदविला होता. तसेच घटनेचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन संपूर्ण जबाबाचे व्हिडियो शूटींग केले होते. त्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. पोलिसांनी कसाबविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना त्याच्या पोलीस जबाबाचा समावेश केला नव्हता. गेल्या आठवडय़ात कसाबने न्यायालयात नाटय़मयरित्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर एका खाजगी वृत्तवाहिनीने कसाबच्या पोलीस जबाबाच्या व्हिडियो शूटींगचे प्रसारण केले. तोच धागा पकडून बुधवारी कसाबचे वकील अब्बास काझ्मी यांनी कसाबच्या जबाबाची सीडी न्यायालयात सादर करण्याची तसेच त्याची नोंद करून घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. आज अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी कसाबचा पोलीस जबाब हा चौकशीचा भाग असून न्यायालयात तो पुरावा म्हणून ग्राहय धरता येऊ शकत नाही, असा युक्तिवाद करून अ‍ॅड. काझ्मी यांची विनंती फेटाळून लावण्याची मागणी केली. त्यानंतर त्यावर न्यायालयाने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, कसाबच्या जबाबाच्या सीडीविषयी आपल्याला काहीच कल्पना नाही. तसेच कसाबचा पोलीस जबाब हा चौकशीचा भाग आहे व आरोपपत्रातही त्याचा समावेश नाही. त्यामुळे आतापर्यंत नोंदविण्यात आलेल्या पुराव्यांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. त्याच कारणास्तव स्वत:हून दखल घेऊन संबंधित वृत्तवाहिनीवर आपणाला न्यायालयीन अवमान केल्याप्रकरणी कारवाई करता येणार नाही. परंतु कसाबच्या पोलीस जबाबाची सीडी जर वृत्तवाहिन्यांकडे पोहोचली असेल तर ती खूप गंभीर बाब आहे. पोलिसांनी नोंदविलेला जबाब ही पोलिसांची मालमत्ता असते. त्यामुळे ज्या कोणी अधिकाऱ्याने ती वृत्तवाहिन्यांना उपलब्ध करून दिली आहे त्याने चोरी केली असून फौजदारी विश्वासाचा भंग केला आहे. त्यामुळे पोलिसांनीच या दोन आरोपांखाली संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे, असा सल्ला न्या. टहलियानी यांनी निकम यांना दिला. निकम यांनीही आपण या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करू असा विश्वास व्यक्त केला.
शिक्षा सुनावण्याआधीच कसाब कैद्यांच्या वेशात!
कसाब आज चक्क कैद्यांचे कपडे परिधान करून न्यायालयात आला होता. खुद्द न्यायालयानेही त्याची दखल घेत त्याबाबत विचारणा केली. शेवटी त्यांनी कसाबलाच त्याविषयी विचारले असता त्याने, ‘तुरूंगात जे कपडे दिले ते मी घातले’, असे उत्तर दिले. त्याच्या त्या उत्तरावर न्या. टहलियानी यांनी त्याला ‘या कपडय़ांतही तू खूप चांगला दिसत असल्या’चे विनोदाने म्हटले.
स्कोडा गाडीचोरीप्रकरणाला सुरूवात
कसाब आणि अबू इस्माईलने चोरलेल्या स्कोडा गाडी चोरीप्रकरणी आज शरण अरासा या गाडीमालकाची साक्ष नोंदविण्यात आली. त्या वेळी त्यांनी कशाप्रकारे कसाब आणि इस्माईलने आपली गाडी चोरून नेली हे न्यायालयाला सांगितले.