Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

काही पाणी साचणारच; नसता आरडाओरडा नको!
अभिजित घोरपडे, मुंबई, ३० जुलै

सात बेटांची मुंबई आता ४३७ चौरस किलोमीटरची झाली, वस्ती-इमारती वाढल्या, अतिक्रमणे फोफावली, पाणी वाहून नेणारे नैसर्गिक प्रवाह संपले, पुराचा आघात झेलणारी खाडय़ांजवळची

 

खारफुटी तुटली, पाणी मुरण्याचे प्रमाणही शून्य झाले.. पण पावसाचे प्रमाण तसेच आहे, समुद्राला येणारी भरतीसुद्धा कायम आहे. मग पाणी जाणार कुठे आणि त्याचा निचरा होणार तरी कसा?
मुंबईच्या सर्वच नैसर्गिक स्रोतांवरचा (जमीन, तळी, नैसर्गिक प्रवाह, समुद्रसुद्धा) ताण प्रचंड वाढला आहे. या बदलांचा विचार न करता मुंबईत पाणी साचतेच कसे, हा सवाल केवळ अव्यवहार्य आहे. शहरातील पावसाचा वेग व हे पाणी वाहून जाण्यासाठी लागणारा कालावधी याचा समतोल बिघडला की पाणी साचते. पण मुंबईत हिंदूमाता, लोवर परळ, ग्रॅन्ट रोड, सात रस्ता यांची स्थितीच अशी आहे. मूळची खाजणाच्या या जागा भर टाकून वापरात आणल्या आहेत. पण येथील जमीन भरतीच्या पातळीच्या खाली आहे. भरती असेल, तर या भागातील पाणी वाहून जाऊच शकत नाही. त्यासाठी भरती संपण्याचीच वाट पाहावी लागते. म्हणूनच अशा ठिकाणी हलक्या-मध्यम स्वरूपाच्या पावसातही पाणी साचणे स्वाभाविक आहे. त्यामुळे ‘मुंबई बुडाली’ अशी ओरड माध्यमांनी केली, तरी पाणी साचणारच. त्याला अजून तरी पर्याय नाही.
मुंबईचा इतिहास पाहता भरती व बऱ्यापैकी पाऊस एकाच वेळी आल्यास काही तासांसाठी (भरती ओसरेपर्यंत) पाणी तुंबून राहते. असे प्रसंग दर पावसाळ्यात किमान पाच-सहा वेळा येतातच. हा इतिहास असतानाच मुंबईच्या भूरचनेत गेल्या काही दशकांमध्ये झालेले बदलही ध्यानात घ्यावे लागतील. पूर्वी खाजण जमिनीवर भर घालताना या भागात पुरेशा क्षमतेचे प्रवाहसुद्धा निर्माण करण्याची आवश्यकता होती. या भागातील पाणी व्यवस्थित वाहून न्यायचे असेल, तर हे प्रवाह पुरेसे रुंद व खोल असणे आवश्यक होते. ते तसे नसतील तर पाणी साचले नाही तरच आश्चर्य? आणखी एक बदल म्हणजे पावसाचे पाणी काही ना काही प्रमाणात साठविणारे तलाव (होल्डिंग पॉन्ड्स) आता संपले आहेत. मुंबईतील हे तलाव पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा भाग होते, पण मुंबईचा भौतिक विकास होताना ते बुजविण्यात आले. हे तलाव पावसाचे किमात दहा टक्के तरी पाणी साठवून ठेवायचे. त्यामुळे मुंबईच्या पुराची तीव्रता थोडीतरी कमी व्हायची. आता मात्र पावसाचे सर्व पाणी पुराच्या स्वरूपात वाहते. मुंबईतील पाणी वाहून नेणाऱ्या प्रवाहांचे आणखी एक वास्तव असे- पाणी समुद्रात नेणाऱ्या १८६ पैकी ४५ प्रवाहांच्या मुखांची (हे प्रवाह समुद्राला मिळतात ती ठिकाणे) पातळी समुद्राच्या सरासरी पातळीच्याही खाली आहे. त्यामुळे या प्रवाहांमधून पाणी समुद्रात सोडण्यासाठी ओहोटी येण्याची वाट पाहावी लागते. तेवढा वेळ मात्र पावसाचे पाणी तुंबूनच राहते. १३५ प्रवाहांच्या मुखांची पातळी भरतीच्या पातळीपेक्षा कमी आहे, तर केवळ सहा प्रवाहांची मुखे भरतीच्या पातळीच्याही वर आहेत. म्हणजेच हे सहा प्रवाह वगळता इतर प्रवाहांद्वारे भरतीच्या वेळी पाणी समुद्रात जाऊ शकत नाही. याशिवाय खाडय़ांजवळची खारफुटीच्या वनस्पती, नैसर्गिक नदी व नाल्यांच्या परिसरातील दलदल यांचीसुद्धा पुराचे पाणी शोषण्यासाठी मदत व्हायची. आता या जागाच उरल्या नाहीत. त्यामुळे नदीचे पाणी वाढले, की ते थेट रस्त्यावर येते किंवा घरांमध्ये शिरते. इतकेच नव्हे तर आताचे मिलन सबवे, अंधेरी, मालाड, मुलुंड, सांताक्रुझसारखे सबवे हे पूर्वी पाणी वाहून नेणारे नैसर्गिक प्रवाह होते. ते बुजवून रस्ता केल्यामुळेच तिथे पाणी साचते, त्यात आश्चर्य ते कसले?.. एकीकडे मुंबईच्या भूरचनेत असे बदल झाले आहेत, त्याच वेळी पावसाचे प्रमाण व त्याची तीव्रता कायम आहे. किंबहुना त्यात थोडीशी वाढच झालेली आहे. समुद्राची पातळीसुद्धा आहे तशीच आहे. मग हे पावसाचे पाणी सखल भागात साचणार नाही, तर जाणार कुठे?
या शहराची नैसर्गिक रचना व त्यात झालेले बदल पूर येण्यास पूरकच आहे. त्यामुळे येथे मोठा पाऊस पडल्यावर काही वेळासाठी पाणी साचणारच. ब्रिमस्टोवाड अहवालानुसार सर्व सुधारणा केल्या, तरी पुराची तीव्रता ७० टक्क्यांनी कमी होईल, पण काही प्रमाणात पाणी साचेलच, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे साचलेले पाणी लवकरात लवकर कसे बाहेर काढता येईल याचे नियोजन हवे. तसेच, पाणी साचल्यावर तातडीचे मदतकार्य, पर्यायी वाहतूकव्यवस्था कशी पुरविता येईल आणि नुकसान कसे कमी करता येईल यासाठी सज्जता व्हायला हवी. हे वास्तव नागरिकांना सांगायला हवे. नुसतेच मुंबई बुडाली (खरंतर ‘बहे गयी मुंबई’) असे ओरडत लोकांमध्ये अस्वस्थता पसरवून काही हाशील होणार नाही.
(समाप्त)