Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

देशात केवळ तीन टक्केविद्यार्थ्यांनाच सरकारी नोकऱ्यांमध्ये स्वारस्य!
मुंबई, ३० जुलै/प्रतिनिधी

सरकारी नोकरीत असणे हे काही वर्षांपूर्वी आयुष्यातील सुरक्षितता आणि स्थैर्य असल्याचे मानले जात होते. पण गेल्या दशकात देशात रुजलेल्या कॉर्पोरेट कल्चरमुळे आज ही परिस्थिती बदलली आहे. याचा प्रत्यय नुकताच टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने (टीसीएस) केलेल्या ‘वेब २.० जनरेशन’ या सर्वेक्षणात आला आहे. देशातील केवळ तीन टक्के विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये

 

स्वारस्य असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे.
देशभरातील १२ शहरातील आठ ते १८ वयोगटातील १४ हजार विद्यार्थ्यांचे विविध निकषांवर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांची तंत्रज्ञान, सोशल नेटवर्किंग, शिक्षण, करिअर आदी बाबींचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये तर ४८ टक्के विद्यार्थ्यांना आयटी आणि परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी करण्यामध्ये स्वारस्य असल्याचे नमूद केले आहे. या सर्वेक्षणातून भावी पिढीची मानसिकता समोर आली आहे असे टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एस. रामदुराई यांनी सांगितले. सध्याचे विद्यार्थी डिजिटल वर्ल्डमध्ये रमत असल्याने हे विद्यार्थी शिक्षण आणि सामाजिक जीवनाच्या बाबतीतही तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याचे निदर्शनास आले असल्योच त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा हा कल समजावून घेऊन नवी सक्षम पिढी तयार करणे हे पालक, शैक्षणिक संस्था, धोरण ठरविणारे आणि नोकरदारांसमोर मोठे आव्हान आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. देशातील बहुतांशी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि आयटी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. तर मिडीया, एन्टरटेनमेंट, ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम ही क्षेत्रे येत्या काळात विद्यार्थ्यांंच्या पसंतीची असणार आहेत. याशिवाय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी अमेरिकेला आणि इंग्लंडला सर्वाधिक पसंती असल्याचेही सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणात आढळलेल्या इतर नोंदी :
६३ टक्के शहरी विद्यार्थी रोज किमान एक तास इंटरनेटचा वापर करतात. तर ९३ टक्के विद्यार्थ्यांना सोशल नेटवर्किंग साइटची माहिती आहे, यामध्ये ऑर्कुट आणि फेसबूक या साइटस् लोकप्रिय आहेत. ४६ टक्के विद्यार्थी ऑनलाइन बातम्या वाचणे पसंत करतात तर २५ टक्के विद्यार्थी बातम्यांसाठी टिव्ही आणि वर्तमानपत्र यावर अवलंबून असतात. तर ६२ टक्के विद्यार्थ्यांकडे स्वत:चा कॉम्प्युटर आहे. महानगरांमध्ये चार पैकी एका विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप तर तीन पैकी दोन विद्यार्थ्यांकडे म्युझिक प्लेअर आहे. मुंबईत सोशल नेटवर्किंगमध्ये तरुणांची ऑर्कुटपेक्षा फेसबूकला सर्वाधिक पसंती आहे.