Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

चार अंध कर्मचाऱ्यांची मध्य रेल्वेकडून फरफट
नियुक्ती होऊनही वर्षभर नेमणूक नाही
अजित गोगटे, मुंबई, ३० जुलै

निवड होऊनही सहा महिने नियुक्तीपत्र न देऊन आणि नियुक्तीपत्र दिल्यानंतरही गेले पाच महिने कोणत्याही कार्यालयात नेमणूक न देऊन मध्य रेल्वे प्रशासनाने विजय गुजर (वरखेडा, धुळे),वैशाली कांबळे (मुंबई), रामअवतार प्रजापती (दिल्ली) व दयानंद प्रसाद (बिहार) या चार

 

पूर्णपणे अंध कर्मचाऱ्यांची जीवघेणी फरफट चालविली आहे.
यापैकी विजय गुजर यांनी आपल्याला ताबडतोब नेमणूक दिली जावी, गेल्या ऑगस्टपासूनचा पगार दिला जावा आणि गेले ११ महिने कमालीचा मानसिक क्लेष दिल्याबद्दल व मानखंडना केल्याबद्दल संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी आपल्याला प्रत्येकी ५० हजार रुपये भरपाई द्यावी यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका केली आहे. गुजर यांची ही याचिका येत्या सोमवारी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणीस येईल. अंध-अपंगांसाठी राखीव असलेल्या तीन टक्के कोटय़ापैकी ‘ग्रुप डी’ मधील पदे भरण्यासाठी रेल्वे भरती मंडळाने नोव्हेंबर २००७ मध्ये ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’मध्ये जाहिरात दिली होती. त्यानुसार इतरांबरोबर गुजर, कांबळे, प्रजापती आणि प्रसाद यांनी अर्ज केले. डिसेंबर २००७ मध्ये घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर या चौघांच्याही कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची तपासणी केली गेली. त्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये वैद्यकीय तपासणीत उत्तीर्ण होऊनही पुढील सहा महिने त्यांना नियुक्तीपत्रे दिली गेली नाहीत. बराच तगादा लावल्यानंतर यंदाच्या फेब्रुवारीत मध्य रेल्वेच्या मुख्य कार्मिक व्यवस्थापकांच्या कार्यालयाकडून या चौघांनाही ‘ऑफिस बॉय’ म्हणून नियुक्तीपत्रे दिली गेली. एवढेच नव्हे तर रेल्वे कर्मचारी म्हणून त्यांना ‘शपथ’ही दिली गेली. मात्र ही नियुक्तीपत्रे हाती पडल्यावर रेल्वेत नोकरी लागल्याचा या चौघांना झालेला आनंद कालांतराने क्लेषदायक ठरला. कारण नियुक्ती होऊनही त्यांना कोणत्या कार्यालयात काम करायचे याविषयीचे नेमणूकपत्र पुढील सहा महिने दिले गेले नाही. वस्तुत: यांच्याबरोबरच निवड झालेल्या हाता-पायाने अपंग असलेल्या किंवा अंशत: अंध असलेल्या इतरांना निवडीनंतर लगेचच नियुक्तीपत्रे व नेमणुकाही दिल्या गेल्या होत्या. ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड’ (नॅब) या अंधांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटनेनेही रेल्वे प्रशासनास पत्र लिहिले व या अंध कर्मचाऱ्यांना नेमणुका देण्याची विनंती केली. एवढेच नव्हे तर कामाच्या बदलत्या स्वरूपानुसार त्यांना काही प्रशिक्षण देण्याची गरज असेल तर तेही देण्याची तयारी दर्शविली. अखेर १८ मे रोजी गुजर व कांबळे यांना मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांच्या कार्यालयात नेमणूक दिली गेली. तेथे कोणतेही काम न देता दिवसभर स्टुलावर बसवून ठेवले गेले. एवढेच नव्हे तर ‘अशा अंध-अपंगांची भरती केली तर रेल्वे चालणार कशी? त्यांचा काही उपयोग नाही. ते काही कामाचे नाहीत’ असे ऐकू जातील अशा आवाजात टोमणे मारून त्यांची मानखंडनाही केली गेली. २० मे रोजी वाणिज्य व्यवस्थापक कार्यालयाने ‘तुम्ही पाठविलेले कर्मचारी आमच्या काही उपयोगाचे नाहीत’ असे पत्र लिहून त्यांना मुख्य कार्मिक व्यवस्थापकांकडे परत पाठविले. दिली गेलेली नाही. तेव्हापासून त्यांची रेल्वेत नोकरी आहे पण नेमणूक नाही व पगारही नाही अशी विचित्र अवस्था झाली आहे.