Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

मुंबई - गोवा महामार्ग अर्थात मृत्यूचा सापळा : चौपदरीकरणाचा अद्याप मुहूर्तही नाही !
रवींद्र पांचाळ, मुंबई, ३० जुलै

कोकणाची कायम उपेक्षा करणाऱ्या राज्यकर्त्यांनी मुंबई - गोवा या मृत्यूचा सापळा ठरलेल्या राष्ट्रीय क्र. १७ या महामार्गाबाबतही उदासीनता आणि दिरंगाईचे धोरण अवलंबिले असून वारंवार

 

चौपदरीकरणाची मागणी होऊनही त्यासंदर्भात कोणतीच ठोस हालचाल दृष्टीपथात नाही. नाही म्हणायला, या चौपदरीकरणाच्या कामासाठी सर्वेक्षण करण्यासाठी आणि सुसाध्यता अहवालासाठी सल्लागार नेमणुकीच्या निविदा आताशा कुठे मागवल्या गेल्या आहेत. त्यामुळे या महामार्गावर पुढील काही वर्षे भीषण अपघातांची मालिका सुरुच राहणार हे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील अन्य भागांच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र अक्षरश: सुजलाम सुफलाम करणाऱ्या राज्यकर्त्यांनी कोकणातील राजकीय नेत्यांमध्ये असलेल्या दुहीचा फायदा घेत कोकणच्या पानाला कायम पाने पुसली आहेत. मुंबईला लागून असलेल्या निसर्गरम्य अशा या प्रदेशाची भरभराट व्हावी, कोकणी माणसाचे जीवनमान उंचावले जावे, यासाठी राज्यकर्त्यांनी अनेकदा विविध योजनांच्या पोकळ घोषणा मात्र केल्या. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या या प्रदेशात एप्रिल - मे महिन्यात महिला वर्गाची पाण्यासाठी वणवण सुरु होते. त्यासाठी पाणी अडवण्याच्या योजना, धरणांची कामे जाहीर झाली. मात्र बहुतांशी योजना निधीअभावी अपूर्णावस्थेत वा काही तर कागदावरच राहिल्या आहेत. आताही निवडणुकीच्या तोंडावर कोकणासाठी राज्यकर्त्यांनी गवगवा करीत जाहीर केलेल्या कोटय़वधींच्या पॅकेजचा प्रत्यक्षात कोकणाला काय फायदा होणार, याबाबत साशंकताच आहे. या साऱ्या उपेक्षेच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्र. सतराबाबतही राज्यकर्त्यांचे तेच धोरण कायम राहिले आहे.
केंद्राच्या सुवर्णचतुष्कोण मार्ग योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राचा कायापालट झाला. पुण्यापासून सांगली, सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर या भागांतून विमानाची धावपट्टी भासावा, असा पुणे - बंगळूर सहापदरी महामार्ग साकार झाला. या मार्गावरील दुभाजकामुळे वाहनांची समोरासमोर टक्कर होऊन घडणाऱ्या भीषण अपघातांचे प्रमाण तर जवळजवळ शून्यावर आले. या महामार्गाच्या तुलनेत मुंबई - गोवा महामार्ग म्हणजे मृत्यूचा महाभयंकर सापळा ठरत असून राज्यकर्त्यांना मात्र या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याची निकड भासत नसल्याचे दिसते आहे. या महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांबाबत महाराष्ट्राच्या विधिमंडळात सातत्याने आवाज उठवण्याचे काम ज्या आमदारांनी केले आहे त्यांत विशेषत: विधानपरिषदेतील सर्वश्री विनोद तावडे, मधु चव्हाण, अनिल परब, डॉ. दिपक सावंत, दिवाकर रावते आदींचा समावेश आहे. मात्र थातूरमातुर आश्वासनांखेरीज सत्ताधाऱ्यांनी कोकणाकडे दुर्लक्षच केले आहे. राज्य विधिमंडळाबरोबरच मुंबई - गोवा महामार्गासाठीचा आवाज संसदेत उठवला जाण्याची गरज असली तरी महाराष्ट्राच्या खासदारांकडून त्याबाबत कोकणच्या पदरी निराशाच पडत आली आहे.
मुंबई गोवा महामार्ग सहापदरी करावा, यासाठीचा विशेष उल्लेख भाजपचे मधु चव्हाण यांनी राज्य विधिमंडळाच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनात केला होता. त्यासंबंधी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी चव्हाण यांना जे उत्तरवजा पत्र पाठविले आहे, त्यावरून चौपदरीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरु व्हायला बराच विलंब होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. मुंबई गोवा महामार्ग क्र. सतराची राज्यातील एकूण लांबी ४७५.२१० कि.मी. असून या महामार्गाची देखभाल व दुरुस्ती केंद्र शासनाकडून केली जाते. केंद्राच्या वार्षिक योजनेतून मंजुरी व निधी उपलब्ध झाल्यानंतर राज्य शासनाकडून या कामांची पूर्तता करण्यात येते. दुपदरी असलेल्या या रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत राज्य अपघात निवारण समितीने कायम स्वरुपाच्या सुधारणांची २७९ कामे सुचविली होती. त्यापैकी ६० कामे अद्याप व्हायची असून पूर्ण झालेल्या कामांवर १७ कोटी ८६ लाख ६७ हजार एवढा खर्च झाला आहे. या साठ कामांना अद्यापी मुहूर्त नसून ती केंद्र शासनाच्या वार्षिक आराखडय़ामध्ये समाविष्ट करून पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
भारतीय रस्ते महासभेच्या मानकाप्रमाणे दहा हजार पी. सी. यू. पेक्षा जास्त वाहतूक असलेल्या रस्त्याचे चौपदरीकरण तसेच ३० हजार पी. सी. यू. पेक्षा जास्त वाहतुकीसाठी सहापदरीकरण करणे आवश्यक असते. मुंबई गोवा महामार्गावरील सध्याची वाहतूक १८ हजार ७८६ पी. सी. यू असल्याने चौपदरीकरण करण्याचे ठरवले गेले असले तरी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सुमारे ५०० किलोमीटरपैकी अवघ्या २१ किलोमीटर रस्त्याचेच चौपदरीकरण प्रारंभी हाती घेऊन कोकणाची पार उपेक्षा केली आहे. भुजबळ यांच्या पत्रानुसार इंदापूर ते झाराप (सुमारे ३६६ कि.मी.) या टप्प्यातील चौपदरीकरणाच्या सर्वेक्षणासाठी आणि अहवाल देण्यासाठी सल्लागार नेमणुकीच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. पळस्पे ते इंदापूर (८४ कि.मी.) हे काम मंजूर झालेले असले तरी याच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मंजूरी मिळायची आहे. चौपदरीकरणाचे एकमेव पूर्ण होत आलेले काम झाराप ते पत्रादेवी हे अवघे २५.५० कि. मी. चे असून तेही पुढच्या वर्षांअखेरीस म्हणजे २०१० च्या ऑक्टोबरात पूर्ण होणे अपेक्षित आहे. या सुमारे सव्वीस किलोमीटरच्या टप्प्यावर आजपर्यंत सुमारे ५३ कोटी रुपये खर्च झाला आहे !