Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

रणजितसिंह मोहिते-पाटील बिनविरोध विलासराव, गोविंदरावांच्या विरोधात शिवसेना रिंगणात
मुंबई, ३० जुलै / खास प्रतिनिधी

राज्यसभेच्या तीन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या

 

विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारे शिवसेनेचे राहुल नार्वेकर यांनी विलासराव देशमुख आणि गोविंदराव आदिक या दोघांच्या विरोधात आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
राज्यसभेच्या तीन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता वेगवेगळ्या अधिसूचना काढण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेताना निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. या याचिकेवर येत्या सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनीच तीनपैकी दोन जागांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवापर्यंत आहे. नेमकी त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. राज्यसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये प्रत्येक जागेसाठी वेगळी अधिसूचना काढण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशावर यापूर्वी १९९४ मध्ये तसेच जानेवारी २००९ मध्ये न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळेच शिवसेनेची याचिका कायदेशीरवर मुद्दय़ावर कितपत टिकेल, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीकरिता केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. या जागेसाठी नार्वेकर यांनी दुपारी १२ च्या सुमारास शिवसेना आमदारांच्या उपस्थितीत अर्ज भरला. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास नऊ मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना नार्वेकर यांनी गोविंदराव आदिक यांच्या विरोधात दुसरा अर्ज दाखल केला. त्या वेळी नार्वेकर हे एकटेच आले होते. नार्वेकर यांच्या अर्जावर फक्त शिवसेनेच्याच आमदारांच्या सूचक म्हणून स्वाक्षऱ्या आहेत. भाजपने ही पोटनिवडणूक फारशी गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. सुप्रिया सुळे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. अर्थात उद्या अर्जांची छाननी होईल.
नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास दोन जागांवर पोटनिवडणूक होईल. विजयासाठी १४० मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेसाठी खुल्या पद्धतीने मतदान असल्यामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विजयासाठी फारशी अडचण येणार नाही. फक्त आमदारांच्या स्वपक्षाच्या आमदारांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतील. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून विलासराव देशमुख यांनी प्रयत्न सुरू केल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात आले.