Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

अखेर पोलिसांची कठोर कारवाई!
नवी मुंबईत ११ जणांना मोक्का, तर ७१ तडीपार
नवी मुंबई, ३० जुलै/प्रतिनिधी

नवी मुंबई परिसरात दिवसागणिक वाढू लागलेली गुन्हेगारी निपटून काढण्यासाठी शहर पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली असून ऐरोलीतील कुख्यात गुंड अन्नु आंग्रे याच्यासह

 

तब्बल ११ जणांवर आज पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. विशेष म्हणजे, ऐरोली, घणसोली, तुर्भे या भागातील तब्बल ७१ जणांना तडीपार करण्याचे आदेशही जारी करण्यात आले असून २८ गुडांना ‘गुंडा रजिस्टर’मध्ये नोंदविण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी दिली.
नवी मुंबई परिसरात मागील काही वर्षांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली असून ऐरोली हे उपनगर तर गुन्हेगारीकरणाचे केंद्रिबदू ठरले आहे. मागील महिनाभरात शहरात गोळीबाराच्या सलग तीन घटना घडल्या. यामध्ये २० ते २५ वयोगटातील मिसरुड फुटलेल्या तरुणांचा समावेश असल्याचे पोलिसांनाही घाम फुटला होता.
गल्लोगल्ली निर्माण होत असलेले गल्ली गुंडही पोलिसांकरिता डोकेदुखी ठरली होती. ऐरोली परिसरात सुरुवातीच्या काळात दबदबा निर्माण करणारे दत्तात्रय दातार या पोलिस अधिकाऱ्याचाही मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारांवर वचक राहिला नव्हता. या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी तब्बल ११ जणांवर आज मोक्का अंतर्गत कारवाई केली.
ऐरोलीतील अन्नु आंग्रे, राहुल आंग्रे, अक्रम हुसेन सत्तार, सिद्धार्थ पवार उर्फ सिद्धू तसेच आणखी सहाजणांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या ११ जणांपैकी एकासही अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ही कारवाई करीत असताना ७१ जणांना तडीपार करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, असे दिघावकर यांनी स्पष्ट केले. यापैकी ५२ जणांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या मागील काही वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असून शहरातील गल्ली गुंडशाही रोखण्याच्या दृष्टीने ही मोठी कारवाई मानली जात आहे.