Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘एकला चलो’चे समर्थक दिग्विजय सिंगसुद्धा राष्ट्रवादीबरोबर आघाडीस तयार!
मुंबई, ३० जुलै / खास प्रतिनिधी

उत्तर प्रदेशमधील यशानंतर ‘एकला चलो’रे ची भूमिका मांडणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी सुद्धा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची भूमिका आज मांडली. आघाडीचा निर्णय शेवटी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी या घेणार असल्या तरी

 

आघाडी व्हावी, असे आपलेही मत असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसने देशभर स्वबळावर लढावे, अशी भूमिका दिग्विजय सिंग यांनी मांडली होती. दिग्विजय सिंग हे शरद पवार विरोधक आणि विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याकरिता आलेल्या दिग्विजय सिंग यांनी आघाडीला अनुकूलता दर्शविली.
२००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी पक्षाने दिग्विजय सिंग यांच्यावर सोपविली होती. यंदा पश्चिम महाराष्ट्रातील सर्व तसेच लातूर आणि नागपूर अशा १२ लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सिंग यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सिंग यांचा राष्ट्रवादीला असलेला विरोध लक्षात घेऊन बहुधा पक्षाने जाणिवपूर्वक त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपविली असावी.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेल्या दिग्विजय सिंग यांनी आज टिळक भवनमध्ये १२ लोकसभा मतदारसंघांतील पक्षाचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या वेळी बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, रविशेठ पाटील हे मंत्री तर आमदार संजय दत्त, आशिष कुळकर्णी, गणेश पाटील हे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
महूसलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्याशी त्यांनी काल चर्चा केली होती. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. आघाडीत जागावाटप करताना किती जागांवर दावा करता येईल याचाही त्यांनी आढावा घेतला.