Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

भारत कुपोषणमुक्त करू ही घोषणा हवेतच विरली - गडकरी
मुंबई, ३० जुलै / प्रतिनिधी

‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘संपूर्ण भारत कुपोषणमुक्त करू’, अशी घोषणा अर्थसंकल्पाच्या पाश्र्वभूमीवर केली असली तरी अन्नधान्याच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने त्यांची ही घोषणा दोन आठवडय़ातच हवेत विरली असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष

 

नितीन गडकरी यांनी केली आहे.
केवळ घोषणा करून कुपोषण आणि भुकेपासून मुक्ती मिळणार नाही. दररोजच्या पोषणासाठी चौरस आहाराद्वारे २७०० ते ३५०० कॅलरीज आणि प्रथिने, व्हिटॅमिन्स, कबरेदके आणि लोह हे घटक शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असतात. त्यांच्याच कमतरतेमुळे कुपोषणाची समस्या निर्माण होते. त्यासाठी पूर्णान्न योजनेची गरज आहे व त्यासाठी अन्नसुरक्षा हवी आहे, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर नियंत्रण राहावे यासाठी राज्यातील जनतेला कोणतीही योजना दिली नाही. परिणामी अन्नधान्यांच्या किमती गगनाला भिडल्या. याउलट राज्यात युती सरकारने पाच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवल्या होत्या, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. गुरेढोरेही खाणार नाहीत असा लाल आणि निकृष्ट दर्जाचा गहू गोरगरीब जनतेला वितरित केला. देशातील गव्हाचा भाव आठ रुपये असताना डुकरांना खावयास देण्यात येणारा हा लाल गहू ऑस्ट्रेलियाहून १६ रुपये असा दराने आयात करण्यात आला आणि हा गहू शिधापत्रिकाधारकांना घेण्याची सक्ती करण्यात आली, असेही प्रदेशाध्यक्षांनी एका पत्रकात म्हटले आहे.
तूरडाळ ९० रुपये आणि तांदूळ २५ रुपयांवर गेल्याने गरीब डाळभात खाण्यापासून वंचित राहावा, अशी तरतूद काँग्रेस सरकारने केली आहे. राष्ट्रपतींनी गरीब जनतेला अन्न मिळावे यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचे अभिभाषणात म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात विपर्यस्त स्थिती निर्माण झाली आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.