Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

जिल्ह्य़ातील ४ हजार ६५९ विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’चा लाभ
अकरावीच्या ४० वाढीव तुकडय़ांची आवश्यकता
मोहनीराज लहाडे , नगर, ३० जुलै
अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या परीक्षेतील एटीकेटीचा फायदा जिल्ह्य़ातील ४ हजार ६५९ अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळेल. मात्र प्रवेशासाठी तसा विकल्प नोंदवावा लागेल व ऑक्टोबर २००९ किंवा मार्च २०१० मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास अकरावीचा प्रवेश रद्द केला जाईल. एटीकेटीच्या आधारावर या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जिल्ह्य़ात किमान ४० वाढीव तुकडय़ांची आवश्यकता भासेल, असा अंदाज आहे.

नगरसेवक विकासनिधीत कपात
विविध बदलांसह मनपा अंदाजपत्रक मंजूर
नगर, ३० जुलै/प्रतिनिधी
स्थायी समितीने सूचविलेल्या विविध बदलांसह महापालिकेचे सन २००९-१० चे १७७ कोटी २६ लाख ४४ हजार ९३१ रुपयांचे अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत आज मंजूर केले.
नगरसेवक विकास निधी किमान १० लाख रुपये करावा, ही सत्ताधाऱ्यांसह सर्वच नगरसेवकांनी केलेली मागणी प्रशासनाने मनपाच्या तिजोरीत यासाठी जमा रक्कम नसल्याची स्पष्ट भूमिका मांडल्याने अमान्य झाली. स्थायी समितीने हा निधी ९ लाख केला होता. प्रशासनाने तर तो फक्त तीन लाख इतकाच मर्यादित सुचवला होता.

इंग्रजी माध्यमाच्या ३१२ शाळा अखेर कायम विनाअनुदानित
पारनेर, ३० जुलै/वार्ताहर

राज्य सरकारने राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या एकूण ३१२ शाळांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांत इयत्ता सातवी ते दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावरील टांगती तलवार दूर झाली आहे.

दरवाढ ही दूधउत्पादकांची फसवणूक डेरे
पारनेर, ३० जुलै/वार्ताहर

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अवघ्या दोन महिन्यांसाठी दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपये दरवाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. ही दूध उत्पादकांची फसवणूक असल्याची टीका दूध उत्पादक कल्याणकारी संघाचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी केली. दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर किमान चार रुपये दरवाढ करावी, या मागणीसाठी डेरे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

शब्दगंध साहित्य संमेलन उद्यापासून
नगर, ३० जुलै/प्रतिनिधी

सातवे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन कवि फ. मुं. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि. १) व रविवारी (दि. २) यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्या हस्ते होईल. संमेलनात विविध कार्यक्रम होणार असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष नंदकुमार पवार यांनी दिली.
शनिवारी दुपारी ३ वाजता हमाल पंचायत येथून लोकसाहित्य जागर यात्रा निघेल. फ. मुं. शिंदे यांच्यासह अभिनेत्री विभावरी प्रधान, अभिनेते योगेश सोमण जागरणात सहभागी होणार आहेत.

आगरकरांची भूमिका अजून संदिग्धच!
‘कुठल्याच राजकीय नेत्याला भेटलो नाही’
नगर, ३० जुलै/प्रतिनिधी

राजकीय भूमिका गुलदस्त्यातच ठेवत माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांनी आज पक्षविरहीत नागरी चळवळ उभारण्याची घोषणा केली. समविचारी लोकांना बरोबर घेऊन शहराच्या विकासासाठी सामूहिक नेतृत्व निर्माण करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे सांगून कोणताही पक्ष किंवा राजकीय नेत्याशी आपली भेट झाली नाही असा निर्वाळा त्यांनी दिला.

वाळकी प्रकरणाने ‘उद्योगी’ कारभाऱ्यांचे धाबे दणाणले
नगर, ३० जुलै/वार्ताहर

निधीच्या अपहारप्रकरणी वाळकी ग्रामपंचायतीच्या माजी पदाधिकारी व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने मनमानी कारभार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. आपल्यावरही हा प्रसंग ओढवतो की काय या चिंतेने अन्य ग्रामपंचायत सदस्य धास्तावले आहेत.तालुक्यात वाळकी ग्रामपंचायत ही राजकीयदृष्टय़ा महत्त्वाची मानली जाते.

राहुरीला डाळिंब रोपवाटिका उभारणार- म्हेत्रे
भारत-इस्रायल उच्च कृषी तंत्रज्ञान अवलंबणार
राहुरी, ३० जुलै/वार्ताहर
डाळिंब उत्पादकांना रोग-कीडविरहित जातिवंत रोपांचा पुरवठा करण्यासाठी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात भारत-इस्रायलच्या उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित अडीच हेक्टर क्षेत्रावर सवरेत्कृष्ट डाळिंब रोपवाटिका, तर पाच हेक्टर क्षेत्रावर प्रश्नत्यक्षिक प्रक्षेत्राचे उत्कृष्ट केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत विद्यापीठास ४ कोटी ४५ लाखांचा निधी मिळणार असल्याची माहिती संशोधन संचालक डॉ. सुभाष म्हेत्रे यांनी दिली.

ऑडिट मेमो लपवून ठेवून सभासद, ठेवीदारांचा अपमान
प्रश्नथमिक शिक्षक बँक
नगर, ३० जुलै/प्रतिनिधी
जिल्हा प्रश्नथमिक शिक्षक सहकारी बँकेचा सन २००७-०८ चा ऑडिट मेमो ‘ब’ वर्गाचा असताना संचालक मंडळाने तो लपवून ठेवून सभासद व ठेवीदारांचा अपमान केल्याचा आरोप बँक बचाव कृती समितीने केला. बँकेच्या ९ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत ठेवलेले सन २००७-०८ व ०८-०९ हे दोन्ही लेखापरीक्षण अहवाल नामंजूर करावेत, असे आवाहनही समितीने केले .समितीतर्फे सदाशिव पवार, कल्याण राऊत, विष्णू बांगर, महादेव चोभे, सुनील जाधव, रावसाहेब सुंबे, संजय त्रिभुवन, बशीर शेख, अकबर शेख आदींनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

विविध मागण्यांसाठी सावंत यांचे उद्यापासून उपोषण
निघोज, ३० जुलै/वार्ताहर
दूध धंद्याबाबत सरकारने ठोस निर्णय घेतले, तर दुधाला २५ रुपये प्रति लिटर भाव देता येईल. तसेच पिंपळनेर देवस्थानला ‘ब’ दर्जासाठी दि. १ ऑगस्टपासून पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे उपोषण करण्याचा इशारा संत निळोबा सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक सावंत यांना दिला.निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत. दुष्काळी तालुक्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करावी. पिंपळनेर देवस्थानला सध्या ‘क’ दर्जा आहे. परंतु भाविकांना येथे मिळत नाहीत. त्यामुळे ‘क’ ऐवजी ‘ब’ दर्जा द्यावा.तालुक्यासह इतर ठिकाणी दूधधंदा चांगला चालला आहे. परंतु काही जण भेसळ करतात. त्यामुळे ग्राहकांच्या जीवाला भाव द्यावा. पिंपळगाव जोगा धरणाचे काम पूर्ण करून पारनेरला लवकर पाणी द्यावे. कुकडीचे पाणी पठार भागाला देण्याची तजवीज करावी. मुळा नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांचा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. तालुक्यातील लोकांनी उपोषणास पाठिंबा द्यावा, असे आवाहन सरपंच सुनंदा रासकर, उपसरपंच विश्वनाथ कळसकर, भाऊसाहेब लटांबळे, रघुनाथ रासकर आदींनी केले आहे.

वाहनाची धडक बसून वृत्तपत्रविक्रेत्याचा मृत्यू
नगर, ३० जुलै/प्रतिनिधी

मोटारसायकलवरून रात्री घरी परतणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्याचा अज्ञात वाहनाची धडक बसून मृत्यू झाला. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावर अक्षता गार्डनसमोर हा अपघात झाला.
संतोष दिनकर गाडेकर (वय २७ वर्षे, भोसले आखाडा, नगर) असे मृताचे नाव आहे. कोतवाली ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गाडेकर मोटारसायकलवरून (एमएच १६, डब्ल्यू १५५०) घरी जात असताना अज्ञात वाहनाची त्यांना धडक बसली. ते गंभीर जखमी झाले. उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनाबद्दल वृत्तपत्रविक्रेत्यांनी दु:ख व्यक्त केले.

नगर अर्बनच्या सदाशिव पेठ शाखेचे उद्या मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन
शत्रुघ्न सिन्हा उपस्थित राहणार
नगर, ३० जुलै/प्रतिनिधी
नगर अर्बन बँकेच्या पुण्यातील सदाशिव पेठ शाखेचे उद्घाटन शनिवारी (दि. १) सकाळी ११ वाजता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. शिवाजी मंदिर प्रश्नंगणात होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सिनेअभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा असतील, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी दिली. कार्यक्रमाला पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी, माजी खासदार अण्णा जोशी, प्रदीप रावत, आमदार गिरीश बापट, सहकार आयुक्त डॉ. कृष्णा लव्हेकर, महापौर राजलक्ष्मी भोसले, आमदार चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, दिगंबर भेगडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बँकेची ही पुणे जिल्ह्य़ातील तिसरी शाखा आहे. पुण्यातील मार्केट यार्ड व शिरूरमध्ये बँकेची शाखा आहे. सदाशिव पेठ शाखेत सर्व आधुनिक सोयीसुविधा आहेत. बँकेला करमाळा (सोलापूर), नाशिक, शिर्डी येथे शाखा उघडण्याची तत्त्वत: परवानगी रिझव्‍‌र्ह बँकेने दिली आहे. त्यामुळे बँकेच्या शाखांची संख्या ३८ वर पोहोचली, असे गांधी यांनी सांगितले. उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा, उपाध्यक्ष सुरेश बाफना, संचालक मंडळांनी केले.

काँग्रेसच्या वाणिज्य, उद्योग राज्य कार्यकारिणीवर अनंत देसाई
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी
जिल्हा युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस अनंत देसाई यांची पक्षाच्या वाणिज्य व उद्योग विभागाच्या राज्य कार्यकारिणीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. विभागाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र दर्डा यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. जिल्हय़ाचे संपर्कमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार राजीव राजळे, डॉ. सुधीर तांबे, ज्ञानदेव वाफारे, नगरसेवक धनंजय जाधव यांनी देसाई यांचे अभिनंदन केले. शहर व परिसरातील उद्योग व व्यापाराशी संबंधित प्रश्न लोकसंघटनेच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न करण्याचा मानस देसाई यांनी व्यक्त केला. यापूर्वी एमआयडीसीतील एल व एस ब्लॉकचा प्रश्न, जकात ठेकेदाराची मनमानी, आदी प्रश्नांतून देसाई यांनी यशस्वी मार्ग काढला. अशा प्रयत्नांना सरकार व पक्षाचा भक्कम पाठिंबा राहील, असे मंत्री थोरात यांनी देसाई यांना आश्वासन दिले.

कब्रस्तान रस्त्यावरील झुडपे काढण्याचा आदेश
नगर, २९ जुलै/प्रतिनिधी
काटवन खंडोबा परिसरातील शहाशवा गाजी कब्रस्तानाची पाहणी आज उपमहापौर नजीर शेख यांनी केली. कब्रस्तानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील झाडेझुडपे काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आयुक्त कल्याण केळकर, विरोधी पक्षनेता किशोर डागवाले, शहर अभियंता नंदकुमार मगर, अभियंता व्ही.जी. सोनटक्के उपमहापौरांसमवेत होते.

पाटबंधारे विभाग स्थलांतराला खासदार गांधींचा विरोध
नगर, ३० जुलै/प्रतिनिधी
पाटबंधारे खात्याचे येथील मध्यम प्रकल्प विभाग बंद करून नागपूरला नेण्याच्या निर्णयाला विरोध करीत खासदार दिलीप गांधी यांनी हा निर्णय रद्द केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा काल दिला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जलसंपदामंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून गांधी यांनी काल त्यांना या निर्णयामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली. सीना प्रकल्प कालवा उपविभाग क्रमांक १, उपविभाग प्रकल्प क्रमांक २ व ताजनापूर लिफ्टसाठी केंद्र सरकारने नुकतेच ४५० कोटी मंजूर केले असून, कार्यालयांचे नागपूरला स्थलांतर केल्यास ही सर्व कामे ठप्प होतील, याकडे त्यांनी चव्हाण व पवार यांचे लक्ष वेधले.

विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्याची मागणी
नगर, ३० जुलै/वार्ताहर
मंजूर विकास योजनेतील विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्याची मागणी येथील आर्किटेक्ट इंजिनिअर्स अ‍ॅण्ड सव्‍‌र्हेअर्स असोसिएशनच्या वतीने महारापालिकेकडे करण्यात आली. या संदर्भात महापौर, उपमहापौर व आयुक्तांशी चर्चा करण्यात आली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष अजित माने, उपाध्यक्ष मनोज जाधव, सचिव अजय दगडे, संचालक विशारद पेटकर, वैभव फिरोदिया, प्रदीप तांदळे, सुनील हळगावकर, विकार काझी, सुनील औटी व सदस्य उपस्थित होते. सभासदांनी संबंधित नियमांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची माहिती दिली. महापौरांनी नगररचनाकारांशी चर्चा करून सर्वसाधारण सभेत या प्रश्नांची दखल घेण्याचे आश्वासन दिले.

शालेय विद्यार्थिनींसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर
नगर, ३० जुलै/प्रतिनिधी
अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व अशोकभाऊ फिरोदिया मेरिट फाउंडेशनच्या वतीने सर्व शाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ च्या विद्यार्थिनींसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर आयोजित केले आहे. शिबिर दि. १, ८ व २९ ऑगस्ट, ५ सप्टेंबर दुपारी २.३० ते ४ या वेळेत जैन धार्मिक परीक्षा बोर्ड येथे होईल. प्रवीण ऋषीजी महाराज मार्गदर्शन करतील अधिक माहितीसाठी २३२३५९४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

आदिवासी, भटक्या महिला बचत गटाचा आज मेळावा
नेवासे, ३० जुलै/वार्ताहर
भटक्या विमुक्त संघटना व आदिवासी भटक्या महिला बचत गटाचा मेळावा उद्या (शुक्रवारी) १० वाजता कुकाणे येथे होणार आहे. या मेळाव्यास माजी आमदार यशवंतराव गडाख, भटक्या विमुक्त संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेखा काळे उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यास मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अजनुज लिंगणगाव रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी
नगर, ३० जुलै/प्रतिनिधी
श्रीगोंदे तालुक्यातील अजनुज ते लिंपणगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती बाळासाहेब गिरमकर यांनी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदन पाठवून केली.अजनुज ते लिंपणगाव रस्त्याचे काम सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून महिन्यापूर्वी करण्यात आले. डांबरीकरण न करता केवळ खड्डे बुजवून ठेकेदाराने त्यावर कारपेट केले. काम अंदाजपत्रकानुसार झालेले नाही. महिन्यातच रस्ता ठिकठिकाणी खचला. पुन्हा खड्डे पडल्याने शाखा व उपअभियंत्यांला चौकशी करून कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी, ‘अर्बन’चे मुख्य रोखपाल सुभाष कुलकर्णी यांचे निधन
नगर, ३० जुलै/प्रतिनिधी
ज्येष्ठ रंगकर्मी व नगर अर्बन बँकेतील मुख्य रोखपाल सुभाष कृष्णाजी कुलकर्णी यांचे आज पहाटे निधन झाले. ते ५८ वर्षाचे होते. त्यांच्या मागे दोन भाऊ, मुलगा, पुतणे असा परिवार आहे. कुलकर्णी यांच्यावर दुपारी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभाष कुलकर्णी यांनी प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर, सुधाकर निसळ यांच्यासमवेत अनेक नाटय़प्रयोग केले. छिन्न, काही स्वप्नं विकायची, सूर्याची पिल्ले आदी नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी अनेक एकांकिकाही सादर केल्या. बँकेच्या कला-क्रीडा मंडळाचे ते सचिव होते. नाटय़ परिषदेच्या शाखेचे ते सक्रिय मार्गदर्शक होते.

केशवदास नगरकर यांचे वृद्धापकाळाने निधन
नगर, ३० जुलै/वार्ताहर

गुजराथी समाजातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ व्यावसायिक केशवदास विठ्ठलदास नगरकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. ते बाळासाहेब या नावाने बाजारपेठेत सुपरिचित होते. प्रश्नरंभी त्यांनी ‘विनोद व्हॉइस’ हा रेडिओ विक्रीचा तसेच कापडाचा व्यवसाय केला. त्यांच्यामागे ‘नगरकर क्लासेस’चे प्रश्न. विनोद व प्रश्न. विश्वास ही मुले, चार मुली, नातू असा परिवार आहे.

आनंदडोह नाटय़ाविष्काराचे रविवारी सादरीकरण
नगर, ३० जुलै/प्रतिनिधी

संत तुकाराममहाराजांच्या जीवनावर आधारित ‘आनंदडोह’ या नाटय़ाविष्काराचे आयोजन दि. २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.३० वा. येथील महानगरपालिकेच्या सभागृहात केल्याची माहिती शैलेश मोडक यांनी दिली. तुकाराममहाराजांच्या चौथ्या जन्मशताब्दीनिमित्त येथील चेरिश थिएटर्सच्या वतीने हा कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक योगेश सोमण या नाटय़ाविष्काराचे सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाच्या सन्मानिका चेरिश थिएटर्स कोर्टाच्या मागे तसेच अभिरुची वाचनालय, श्रमिक नगर, नगर येथे उपलब्ध आहेत. रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त उद्या श्रीरामपूरला विविध कार्यक्रम
श्रीरामपूर, ३० जुलै/प्रतिनिधी
शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येत्या शनिवारी (दि. १) शहरात जयंती एकता समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती साईप्रसाद जगधने यांनी दिली.
यानिमित्त उद्या (शुक्रवार) सकाळी १० वाजता आगाशे सभागृहात शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रात्री ११.३० वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे. शनिवारी ज्येष्ठ नागरिकांचा गुणगौरव, प्रबोधनपर जाहीर व्याख्यान, साहित्यिक पुरस्कार, मोटारसायकल रॅली, चित्ररथ मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. अभिवादन कार्यक्रमास आमदार जयंत ससाणे, नगराध्यक्ष मंदाबाई कांबळे, राजश्री ससाणे,संजय फंड, रवींद्र गुलाटी, मुळा प्रवरेचे उपाध्यक्ष सचिन गुजर उपस्थित राहणार आहेत.

रस्ते व पुलांच्या कामांसाठी एक कोटीचा निधी मंजूर
श्रीरामपूर, ३० जुलै/प्रतिनिधी
रस्ता खडीकरण, डांबरीकरण तसेच लहान पुलांच्या बांधकामासाठी ९६ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार जयंत ससाणे यांनी दिली.कोल्हार-बेलापूर रस्त्यावरील एकलहरे येथील पुलाचे काम पूर्ण झाले असून त्याकरिता २५ लाख १० हजार रुपये खर्च आला. घोगरगाव ते कमालपूर रस्त्यासाठी १० लाखांचा निधी मंजूर झाला असून, हे काम प्रगतिपथावर आहे. खानापूर ते सराला रस्त्याच्या खडीकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. खानापूर रस्त्यावर १० लाख रुपये खर्चाच्या सेतू पुलाचे काम करण्यात आले असून, कारेगाव येथील पुलासाठी १० लाख, गळनिंब येथील मोदी बांधकामासाठी २ लाख ५० हजार, फत्याबाद येथील मोदी कामासाठी दीड लाख, भोकर तळ्यावरील मोदी बांधकामाकरिता २ लाख २० हजार, गोंडेगाव येथील मोदी बांधकामासाठी ३ लाख ५० हजार, दिघी येथील मोदी बांधकामासाठी ३ लाख रुपये मंजूर झाले आहे. जळगाव-गोंडेगाव रस्ता व दिघी-चितळी रस्त्याच्या कामाकरिता ५० लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती ससाणे यांनी दिली.

संगणक शिक्षणासाठी सात कोटींचा प्रकल्प
श्रीरामपूर, ३० जुलै/प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यासाठी सात कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्यासाठी लोकसहभागातून निधी उभारणी केली जाणार असल्याची माहिती अरुण कडू यांनी दिली. काचोळे माध्यमिक विद्यालयातील तीन वर्ग खोल्यांचे भूमिपूजनप्रसंगी कडू बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मीनाताई जगधने, विजय बनकर उपस्थित होते. कडू यांनी काचोळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढ प्रकल्पाचे कौतुक केले. याप्रसंगी मीनाताई जगधने, मुख्याध्यापक भागवत मैड यांची भाषणे झाली. प्रश्नस्ताविक किसन जेजूरकर यांनी केले. आभार रावसाहेब झावरे यांनी मानले. कार्यक्रमास प्रकाश निकम, नामदेव देसाई, प्रश्नचार्य ज्ञानदेव म्हस्के, महेश सोनार, शिवाजी लंके उपस्थित होते.

संत निळोबाराय देवस्थान परिसरात विकासकामे प्रगतिपथावर
वाडेगव्हाण, ३० जुलै/वार्ताहर
पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील संत निळोबाराय देवस्थान परिसरात १ कोटीची विकासकामे प्रगतिपथावर असल्याची माहिती सरपंच सुनंदा रासकर व उपसरपंच विश्वनाथ कळसकर यांनी दिली. या देवस्थानला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे.परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण, प्रशस्त बगीचा, भोजनालय, व्यावसायिक गाळे इ. कामे लवकरच पूर्णत्वास येतील. तर मंगलकार्यालय, शौचालय, धर्मशाळा, दवाखाना, पथदिवे, वारक ऱ्यांसाठी स्नानगृह इ. विकासकामे पूर्ण झाली आहेत. लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या हेतूने सर्जेराव म्हसकर महाराज यांनी संत निळोबाराय श्रमसंस्कार संस्थेची स्थापना केली. या संस्थेत शंभर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गावकऱ्यांनी हाती घेतले आहे. यासाठी संत निळोबाराय मंडळाचे अध्यक्ष अशोक सावंत तसेच देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव पठारे यांनी प्रत्येकी १ लाख रुपयांची देणगी दिली आहे.

टिळकनगरला रविवारी नेत्र शस्त्रकिया शिबिर
श्रीरामपूर, ३० जुलै/प्रतिनिधी
मुंबई येथील रामानुगृह ट्रस्ट व डहाणूकर उद्योग समुहाच्या वतीने टिळकनगर येथे येत्या रविवारी (दि. २) सकाळी १० वाजता मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केल्याची माहिती मुख्य व्यवस्थापक एम. आर. के. नायर यांनी दिली.शिबिरात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सुब्रमण्यम शर्मा हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. पहिल्या शंभर रुग्णांना नंबरचे चष्मे देण्यात येणार आहेत. शिबिरासाठी सी. आर. रमेश, नंदकुमार शिंदे, दीपक जोशी, दीपक देशपांडे, प्रकाश मेहेत्रे, दिलीप कुऱ्हे, नवनाथ गोपाळे आदी परिश्रम घेत आहेत.

साई पालखी दिंडीचे राजूरहून शिर्डीला प्रस्थान
राजूर, ३० जुलै/वार्ताहर

अध्यात्माची कास धरल्यास ग्रामविकासाला गती मिळते. त्याचाच भाग म्हणून येथे साईंची पालखी व दिडी निघाली आहे, असे उद्गार स्वामी गगनगिरीमहाराज भक्त प्रतिष्ठानच्या अध्यक्ष हेमलताताई पिचड यांनी काढले. राजुरी-शिर्डी पायी दिंडीचे यंदा तिसरे वर्षे असून, दिंडीत राजूर व परिसरातील रहिवासी मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत. शिवमंदिर-गणपती मंदिरात दर्शन घेऊन पायी दिंडी निघाली. दिंडीचे प्रमुख अनिल सहामगे, संजय हेकरे, सखाराम बंदसोडे, विठ्ठल शिंदे यांनी दिंडीचे तीन वर्षापासून नियोजन केले. हरिनामाच्या जयघोषात दिंडीचे प्रस्थान ठेवले. संतोष बंदसोडे यांनी प्रश्नस्ताविक केले. सिंधुबाई पाबळकर यांनी आभार मानले. दिडीत ३०० भाविक सहभागी झाले.

राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षपदी सरला कोठारी
कोपरगाव, ३० जुलै/वार्ताहर
राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षपदी नगरसेविका सरलाताई कोठारी यांची, तर जिल्हा महिला राष्ट्रवादी प्रतिनिधीपदी ताराबाई वाजे व शीलाताई भगत यांची नुकतीच निवड करण्यात आली. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - वैशाली आढाव (उपाध्यक्ष), सुनीता जगदाळे (उपाध्यक्ष), सुरेखा बंब (खजिनदार), वैशाली जाधव (सचिव), कमल आढाव (सहसचिव).

चोरटय़ास पकडले
राहुरी, ३० जुलै/वार्ताहर

तालुक्यातील धामोरी येथून वीजपंप चोरणाऱ्या चोरटय़ास पकडून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दत्तात्रय बाचकर यांच्या मोटार चोरून नेणारा बशीर रज्जाक शेख (प्रसादनगर, राहुरी) यास पोलिसांनी पकडले.