Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

साखरेपाठोपाठ रेशनचा तांदूळही गायब
जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीस संधी
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी
रेशन दुकानात गेल्या दोन महिन्यांपासून साखर आणि आता तांदूळही नसल्याने तूरडाळीसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवण्याची संधीच व्यापाऱ्यांना चालून आली आहे. पेट्रोल, डिझेल, डाळी, भाज्या आदींच्या भाववाढीमुळे जनता त्रस्त झालेली असतानाच रेशन दुकानातील एक-एक वस्तू दुर्मीळ होत आहे. श्रावण महिन्यात सणासुदीच्या तोंडावर रेशन धान्य दुकानात गेल्या दोन महिन्यांपासून साखर दिसेनाशी झाली तर, आता तांदळाची टंचाई उद्भभवली आहे.

महापालिकेच्या संकुलातील गाळ्यांवर बडय़ा व्यापाऱ्यांचा कब्जा
* एकाच व्यापाऱ्याकडे २४ गाळ्यांचा ताबा
* इतवारीतील २५००० चौरस फूट जागेवर अतिक्रमण
* आयुक्तांचे चौकशीचे आश्वासन
नागपूर, ३० जुलै/ प्रतिनिधी

शहरातील प्रमुख भागात असलेल्या महापालिकेच्या व्यावसायिक संकुलातील गाळ्यांवर बडय़ा व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे कब्जा केला आहे. अत्यल्प किराया देऊन या व्यापाऱ्यांनी पूर्वपरवानगी शिवायच गाळ्यांची मोडतोडही केली आहे. एकाला एकच गाळा देण्याचा नियम असताना यशवंत स्टेडियममध्ये एका व्यापाऱ्याने तब्बल २४ गाळे ताब्यात घेतले आहेत, तर जुन्या धान्य बाजारातील महापालिकेच्या मालकीची २५ हजार चौरस फूट जागा एका व्यापाऱ्याने परस्पर किरायाने देऊन कोटय़वधी रुपयांचा मलिदा लाटला आहे. आयुक्त असीम गुप्ता यांनी या साऱ्या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन सभागृहाला दिले.

तोतया पोलिसांचा सुळसुळाट; खरे ढिम्म!
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी

पोलीस असल्याची बतावणी करून लुटणाऱ्या भामटय़ांनी शहरात धुमाकूळ घातला असून पुन्हा गुरुवारी सकाळी अशा तीन घटना शहरात घडल्या. सरासरी रोजच अशा घटना घडत असून खऱ्या पोलिसांसमोर तोतया पोलिसांनी आव्हान उभे केले आहे. पहिली घटना सीता नगरात आऊटर रिंग रोडजवळ गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. विजय श्याम मोकद्दम (रा. वैशाली अपार्टमेंट, सीतानगर) हे वृद्ध गृहस्थ ‘मॉर्निग वॉक’ला निघाले असता दोन मोटारसायकलवरून चारजण आले आणि त्यांनी मोकद्दम यांना थांबवले.

आदेश ‘ऑनलाईन’चे कामकाज मात्र कागदावर
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची संथ वाटचाल
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला त्यांच्या जिल्ह्य़ातील महिला बचत गटाच्या कामकाजाची माहिती ‘ऑनलाईन’ देण्याचे आदेश असतानाही राज्यातील एकाही जिल्ह्य़ातून याबाबत पुढाकार घेण्यात आला नाही उलट कामकाजाची माहिती जुन्याच पद्धतीने (कागदावर) पाठवल्याने विभागीय आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात सुधारणा न झाल्यास संबंधिक प्रकल्प संचालकांवर करावाई करण्याचा इशारा दिला आहे.

अकरावीची केंद्रीय प्रवेश समिती बरखास्त; दलाल बळावले
नागपूर, ३० जुलै/ प्रतिनिधी

अकरावीची प्रवेश प्रक्रिया आज संपताच केंद्रीय प्रवेश समिती बरखास्त करण्यात आली असून अद्यापही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. दरम्यान, ठराविक महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून केंद्रीय प्रवेश समितीच्या काही सदस्यांवर दलाल मंडळी दबाव आणत असल्याचे धनवटे नॅशनल महाविद्यालयात निदर्शास आले.
विद्यार्थ्यांला जेवढे कमी गुण तेवढी दलालीची रक्कम जास्त असे गणित दलालांनी आखले आहे. गेल्या २३ जूनपासून विज्ञान व वाणिज्य शाखेचे केंद्रीय पद्धतीने प्रवेश समितीमार्फत देण्यात आले.

घरकुल योजनेतील रहिवाशांवरील नासुप्रच्या कारवाईला स्थगिती
नागपूर, ३० जुलै/ प्रतिनिधी

नागपूर सुधार प्रन्यासच्या नंदनवन येथील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठीच्या घरकुल योजनेतील रहिवाशांनी त्यांच्या गाळ्यांचा ताबा सोडावा, यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने सुरू केलेल्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली असून, याप्रकरणी सुधार प्रन्यासच्या नावे दाखलपूर्व नोटीस काढली आहे.प्रन्यासची २८८ गळ्यांची घरकुल योजना आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील लोकांसाठी आहे.

मतदारसंघाच्या सर्वागीण विकासाचा ध्यास
ज्ञानेश्वर उबाळे

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व यवतमाळ जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मनोहर नाईक यांनी गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत २६२ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी पुसद व महागाव तालुक्यांच्या विकासासाठी खेचून आणला. मतदारसंघाचा सर्वागीण विकासाचा ध्यास मनोहर नाईकांनी घेतला आहे.मनोहर नाईक यांनी पुसद विधानसभा मतदारसंघात रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे.

नवोदितांनी मेहनतीनेच कलाक्षेत्रात ओळख निर्माण करावी -भार्गवी चिरमुले
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी

रिअ‍ॅलिटी शो किंवा मालिकांमध्ये काम करण्यासाठी नवोदित कलावंतांनी केवळ क्रेझ म्हणून याकडे न बघता मेहनत करुन स्वतची कला क्षेत्रात ओळख निर्माण करण्याची गरज असल्याचे मत अभिनेत्री व ‘एकापेक्षा एक’या कार्यक्रमातील विजेती भार्गवी चिरमुले यांनी व्यक्त केले. कोलगेट कंपनीच्या प्रचार आणि प्रसारासाठी भार्गवी चिरमुले आज नागपुरात आल्या असता त्या ‘लोकसत्ता’शी बोलत होत्या. ‘एकापेक्षा एक’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे माझ्यातील कला लोकांसमोर मांडता आली. लहानपणापासून नृत्याची आवड असल्यामुळे या शोसाठी तयारी करणे सोपे गेले.

राज्य शासनाकडून महिला आयोगाची उपेक्षा
वाढीव अनुदानाची मागणी दफ्तरदिरंगाईत
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी
महिलांना राजकारणात ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचे विधेयक अद्याप संसदेत संमत होऊ शकले नसल्यामुळे महिलांचे महत्त्व मान्य करण्याबाबत राजकीय नेते कितपत गंभीर आहेत हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. राज्य महिला आयोगाची किती उपेक्षा होत आहे, हे पाहिले तर महिलांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचाच मुद्दा अधोरेखित होतो. आयोगाने अनुदानाची रक्कम वाढवून मागितली असली तरी सरकारने ती अद्याप मंजूर केलेली नाही.

शासकीय भूखंडांवर अतिक्रमण
महसूल सचिवांसह प्रतिवादींना नोटीस
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्य़ातील शासकीय भूखंडांवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाल्याची तक्रार करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्याच्या महसूल सचिवांसह इतर प्रतिवादींच्या नावे दाखलपूर्व नोटीस काढली आहे.नागपूर शहर आणि जिल्ह्य़ातील शासकीय भूखंडांवर मोठय़ा प्रमाणात स्थायी अतिक्रमण झाले आहे. महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांचे त्यांच्याच मालकीच्या जागांवर नियंत्रण नाही.

निसर्गाच्या सानिध्यात नेणारी संजय गुल्हाणे यांची चित्रे
नागपूर ३० जुलै प्रतिनिधी

सीमेवर देशाचे रक्षण करताना सैनिक हा निसर्गाच्या सानिध्यात राहत असतो, मात्र त्याला कधीही निसर्गाचा आनंद घेता येत नाही, पण चित्रकार संजय गुल्हाणे यांच्या चित्राचा आस्वाद घेत असताना पुन्हा एकदा सीमेवर जाऊन निसर्गाचा आनंद घेण्याची इच्छा प्रगट झाली असल्याचे प्रतिपादन ‘प्रहार’चे संस्थापक कर्नल सुनील देशपांडे यांनी केले. मुंडले एज्युकेशनल ट्रस्ट संचालित सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्टस (सिस्फा)तर्फे लक्ष्मीनगरातील सिस्फा की छोटी गॅलरीत सुरू असलेल्या ‘मान्सून बोनांझा’ या चित्रप्रदर्शन मालिकेत शेवटचे प्रदर्शन खामगावच्या पंधे गुरुजी चित्रशिल्प महाविद्यालयाचे प्रश्नचार्य संजय गुल्हाने यांनी रेखाटलेल्या चित्रांचे आयोजित करण्यात आले आहे.

आमदाराच्या पी.ए.चा तमाशा
मर्जीतील कंत्राटदाराला कामे मिळाली नाहीत
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आमदार निधी खर्च करण्याची घाई झालेल्या आमदारांनी यातून होणारी कामे ते सांगतील त्याच कंत्राटदारांना मिळावी यासाठी धरलेला आग्रह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने डावलल्याने एका आमदाराच्या पी.ए.ने बुधवारी बांधकाम विभागाच्या कार्यालयात तमाशा केल्याचे वृत्त आहे.

दलित सफाई कामगार महासंघाची आज निदर्शने
नागपूर, ३० जुलै/प्रतिनिधी

उपेक्षित दलित सफाई कामगार महासंघाच्यावतीने सफाई मजदूर दिनानिमित्त उद्या, ३१ जुलैला विविध मागण्यांसंदर्भात रिझर्व बँक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सकाळी ११ ते दुपारी ४ वाजतापर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सफाई कामगारांसाठी मालकी तत्वावरील घर देण्याची वेगळी योजना तयार करावी, सफाई सेवेच्या संवर्गात बदल करून त्याचे नियम निश्चित करावे, केंद्र व राज्य शासनाप्रमाणे राज्यातील सर्व नगर परिषद, महानगरपालिका, जिलहा परिषद येथे सहावा वेतन आयोग लागू करावा, आदी मागण्यांच्या समर्थनार्थ हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

तेली समाजातील उपवर-वधूंचा ३० ऑगस्टला परिचय मेळावा
रविवारी नोंदणी शिबीर
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी
साई मंगल मॅरेज ब्युरो, श्री शनैश्वर फाऊंडेशन व श्री संताजी फाऊंडेशन पुणे यांच्यावतीने तेली समाजातील डॉक्टर, इंजिनिअर आदी उच्चशिक्षित उपवरवधुंचा परिचय मेळावा येत्या ३० ऑगस्टला उद्यान प्रसाद कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी नोंदणी शिबिराचे आयोजन रविवार, २ ऑगस्टला उद्यान प्रसाद कार्यालय, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात आयोजित केले आहे. नोंदणी करताना उपवर वधुवरांचा संपूर्ण बायोडाटा व क्लोजअप फोटो आणणे आवश्यक आहे. नोंदणी करणाऱ्या उपवर वधूवरांची रंगीत छायाचित्रासहीत माहिती लाइफ पार्टनर या वधूवर सुचक पुस्तकात प्रकाशित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी साई मंगल मॅरेज ब्युरोचे संचालक कृष्णा घुग्गुसकर, ९८२३७४७९१७, श्री संताजी फाउंडेशनचे संस्थापक प्रकाश सेठ पवार ९४२२०२९००९, श्री शनैश्वर फाउंडेशनचे संस्थापक अ‍ॅड. रामचंद्र पंचगडे ९७६६६९४५८२, श्री संताजी फाउंडेशनचे संस्थापक अ‍ॅड. रामचंद्र रायरीकर ९८८१५५३३६६, श्री शनैश्वर फाउंडेशनचे आधारस्तंभ सुभाष रेवतकर ९०९६०२०२४७ येथे संपर्क साधावा.

नवभारत शाळेत लोकमान्य टिळकांची जयंती साजरी
टिळक जयंतीला वृक्षारोपण
नागपूर, ३० जुलै/ प्रतिनिधी
नवभारत प्रश्नथमिक शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून शाळेच्या प्रश्नंगणात व उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अ‍ॅड. अभय भगवंत गायकवाड, मुख्याध्यापक अशोक जिवने, कृष्णा पत्की, नगरसेवक प्रवीण दटके, नगरसेवक बंडू राऊत, विश्व हिंदू परिषदेचे श्रीकांत आगलावे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ शिक्षक रचना सूतकर यांनी सादर केलेल्या टिळकांच्या भक्ती गीताने झाली. मुख्याध्यापक अशोक जिवने यांनी पाहुण्यांचा परिचय, स्वागत व प्रश्नस्ताविक केले. अश्विनी राघोर्ते यांनी टिळकांच्या ऐतिहासिक घटना कथन केल्या. संचालन करुणा शेंडे व ममता कळमकर यांनी केले. कार्यक्रमासाठी मंगला मालोदे, वैशाली जयस्वाल, नरेंद्र झाडे, दीपक उईके, सुवर्णा मारबते, रितू कुडवे, प्रीती जोशी, संगीता मोहिते, लक्ष्मी मैदूरकर, मंगला येनस्कर यांचे सहकार्य मिळाले.

लोकमान्य टिळक जयंती साजरी
नागपूर, ३० जुलै/प्रतिनिधी

युवा चेतना मंचतर्फे लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप दिवरे व प्रमुख पाहुणे म्हणून श्याम तांबोळी उपस्थित होते. लोकशाहीचा आधार म्हणजे नागरिकांना दिलेले मुलभुत अधिकार आहेत. जोपर्यंत नागरिक आपल्या अधिकाराचा वापर करणार नाही तोपर्यंत सामान्य जनतेला न्याय मिळणार नाही, असे प्रतिपादन श्याम तांबोळी यांनी केले. युवकांनी शासकीय यंत्रणांवर अवलंबुन न राहता स्वत: समाज हितासाठी समोर येऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन दिलीप दिवरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन दत्ता शिर्के यांनी केले. सुहास माहुरकर यांनी आभार मानले. याप्रसंगी श्रीकांत देहाडराय, प्रदीप करमरकर, विवेक पोहाणे, पांडू डोळस, राजू लुटे, उमेश कोतेवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रबोधन कॉन्व्हेंटमध्येही लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका वैशाली काष्टे यांनी टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी सार्थक अतकर, समिक्षा लोणारे, चैताली ढोमणे या विद्यार्थ्यांनी विचार मांडले. संचालन पुजा सोनी यांनी केले. रक्षा चौबे यांनी आभार मानले.

ओंकार भावे यांना श्रद्धांजली
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी

विश्व हिंदू परिषदेतर्फे धंतोली कार्यालयात ओंकार भावे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रदेश संघटन सचिव विजय माताडे यांनी चरित्रवाचन केले. प्रभा नेटके यांनी मनोगत व्यक्त केले. गीत सुरेश देशपांडे यांनी सादर केले, तर प्रश्नस्ताविक हरिष हरकरे यांनी केले. यावेळी महादेव वंजारी यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला बाबुराव लंके, डॉ. हेमंत जांभेकर, बाबुराव राजे व कार्यकर्ते उपस्थित होते.

तथागत संस्थेच्या स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन
नागपूर, ३० जुलै/ प्रतिनिधी

तथागत बहुउद्देशीय संस्थेतर्फे इमामवाडय़ातील संस्थेच्या सभागृहात नि:शुल्क स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. हिंद परिवारचे अध्यक्ष किशोर भुसारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन इमामवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील बोंडे यांनी केले. प्रमुख पाहुणे नाथे अकादमीचे संजय नाथे होते. नगरसेविका सुजाता कोंबाडे, मानसोपचार तज्ज्ञ अभय कुमार पाटील, संस्थेचे अध्यक्ष मनीष ढेंगरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी वस्तीतील दहावी- बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादित केलेल्या मोनाली भारशंख व पायल गजभिये आणि इतर १५ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन राजू गायकवाड यांनी केले. प्रश्नस्ताविक अरुण भारशंख यांनी तर, धर्मपाल धाबर्डे यांनी आभार मानले. सुनील जवादे, कुणाल कांबळे, सचिन बुटले, धीरज ढेंगरे, प्रदीप गणवीर, सोनू जवादे आणि साहील धाबर्डे यांचे सहकार्य लाभले.

एसबीआयच्या ‘महाआनंदचा’ शुभारंभ
नागपूर, ३० जुलै/प्रतिनिधी

एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या ‘महाआनंद’ योजनेचा शुभारंभ हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंट येथे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेश बंग यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी सभापती राजू वाघ, एसबीआय लाईफ इन्शुरन्सचे प्रदेश प्रमुख राजीव श्रीवास्तव, शाखा व्यवस्थापक पुनित मारवाह, क्षेत्रीय व्यवस्थापक पंकज पाटील, व्यवस्थापक प्रवीण बुरडकर, युनिट व्यवस्थापक मनिष सुलके उपस्थित होते. श्रीवास्तव यांनी ‘महाआनंद’बद्दल माहिती दिली. मध्यमवर्गीयांच्या हितासाठीच ही योजना तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जीवन विमा ही महत्वाची गरज असून ‘महाआनंद’ हा सर्वाना परवडणारा प्लॅन असल्याचे रमेश बंग यावेळी म्हणाले. या प्लॅनमधून कमी प्रिमीयम देऊन जास्तीतजास्त नफा मिळेल पण, त्याचबरोबर जीवन सुरक्षाही मिळेल, असे बंग म्हणाले. संचालन प्रवीण बुरडकर यांनी केले. परेश महल्ले यांनी आभार मानले.

‘कोशिश’च्या वतीने चष्मे व नोटबुकचे वाटप
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी
कोशिश फाऊंडेशनच्यावतीने कृष्णनगर सेमिनरी हिल्स येथील प्रियदर्शनी विद्यानिकेतन प्रश्नथमिक शाळेत मोतिबिंदू शस्त्रकिया करण्यात आलेल्या रुग्णांना चष्मे व विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप संस्थेचे अध्यक्ष सलील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कोशिश फाउंडेशनतर्फे नेहमी गरजूंना मदत केली जाते. सर्व समाजातील शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात जे मागे पडत आहेत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी कोशिश फाऊंडेशन नेहमी अग्रेसर असते, असे देशमुख म्हणाले. यावेळी माजी नगरसेविका रेखा कारोंडे, गब्बर आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रश्नस्ताविक विद्या निकेतन प्रश्नथमिक शाळेचे संचालक मुकेश शर्मा व संचालन शकील यांनी केले. श्व्ोता शाहू यांनी आभार मानले.

नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी
नागपूर, ३० जुलै/ प्रतिनिधी
मुसळधार पावसाचे पाणी टोली, रहाटेनगर, रामटेकेनगर येथील घरांमध्ये शिरल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना मदत देण्यात यावी, यामागणीचे निवेदन काँग्रेसचे युवा नेते नियामत खान, रामसिंग लोंढे व सचिव पांडुरंग वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार यांना दिले. पावसाळा सुरू झाल्यापासून लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून अतोनात नुकसान झाले. पाच दिवस वस्तीतील काही लोक फागोजी रहाटे वाचनालय, रहाटेनगर येथे मुक्कामी होते. आजूबाजूच्या लोकांनी त्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. परंतु प्रशासनाकडून त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. यावेळी तहसीलदारांनी लवकरात लवकर पाहणी करून लोकांना आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळामध्ये नागेश मानकर, मिलिंद वाचनेकर, सुरेश ग्वालवंशी, मुन्नी लोधी आदी उपस्थित होते.

विणकर समाजाचे शिष्टमंडळ सोनिया गांधींना भेटले
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी
विणकर समाजाच्या एका शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन नागपूर विणकर सहकारी सूत गिरणी पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. माजी वस्त्रोद्योग मंत्री गिरणी पून्हा सुरू करण्यात अडथळा निर्माण करत असल्याचेही यावेळी शिष्टमंडळाने सोनिया गांधी यांच्या लक्षात आणून दिले.खासदार विलास मुत्तेमवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. राजू देवघरे, अ‍ॅड. चैतन्य बारापात्रे, अशोक धापोडकर, भास्कर मौंदेकर, ताराचंद बारापात्रे यांचा समावेश होता. यावेळी सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.
खासदार विलास मुत्तेमवार यांनी लोकसभेत हलबा समाजाचा प्रश्न उपस्थित केल्याबद्धल हलबा समाजाने त्यांचे अभिनंदन केले असल्याचे डॉ. राजू देवघरे यांनी म्हटले आहे.

साईमंदिरात आज धार्मिक कार्यक्रम
नागपूर, ३० जुलै/प्रतिनिधी
सुर्वेनगर जयताळा रोडवरील श्री साईमंदिरात उद्या, ३१ जुलैला दोन वष्रे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त उद्या धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ९ वाजता प्रशांत कवीमंडन यांच्या पौरोहित्याखाली श्रींची प्रश्नणप्रतिष्ठा तसेच, षोड्शोपचार पूजा करण्यात येईल. दुपारी ४ वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत वेदमूर्ती गोविंद आर्वीकर आणि ब्रम्हवंृद यांच्या पौरोहित्याखाली पाद्यपूजा करण्यात येईल. या कार्यक्रमाला साईदत्तपीठाचे पीठाधीश साईदत्तनाथ पूर्णवेळ उपस्थित राहील.

लाईफ इन्शुरन्स एजंट संघटनेचे स्नेहसंमेलन
नागपूर, ३० जुलै/ प्रतिनिधी
लाईफ इन्शुरन्स एजंट संघटनेच्या ९७२ शाखेच्या प्रतिनिधींचे स्नेह संमेलन गुरुदेव सेवाश्रमच्या सभागृहात उत्साहात पार पडले. कार्यक्रमात वन मिनिट शो, फॅशन शो आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पश्चिम क्षेत्राचे उपाध्यक्ष पी.एल. ढोले, वसंत पडोळे, चंद्रकांत हिंगे परीक्षक म्हणून उपस्थित होते. फॅशन शो कार्यक्रमात सुरेश कुबडे, डी.एस. सिसोदिया, मोहिते, धनविजय उपाध्याय यांच्या कुटुंबीयांनी भाग घेतला. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष माधव भोंडे उपस्थित होते. त्यांचे यावेळी भाषण झाले. सचिव अनिल गुप्ता यांनी आभार मानले.

संयुक्ता देशपांडे शिष्यवृत्ती परीक्षेत २० वी मेरीट
नागपूर, ३० जुलै/ प्रतिनिधी
बजाजनगरातील परांजपे स्मृती उच्च प्रश्नथमिक शाळेची सातवीतील विद्यार्थिनी संयुक्ता पराग देशपांडे हिने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत गुणानुक्रमे ती २० वी मेरीट आली आहे. शाळेच्या संचालक डॉ. रंजना पारधी व शिक्षकांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.

उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय विद्यार्थी सेनेच्या उत्तर-नागपूर विभागातर्फे विनोबा भावे नगरातील हनुमान मंदिरात रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाप्रमुख रामचरण दुबे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भारतीय विद्यार्थी सेनेचे शहरप्रमुख मुन्ना तिवारी, किसन प्रजापती, उपशहर प्रमुख शरद सरोदे, शरद बांते, जयसिंग भोसले, प्रवीण शर्मा, बजरंग दलाचे संयोजक दिलीप पखाले प्रश्नमुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी निलेश तिघरे, सचिन तिडके, सतीश सोनकुसरे, महेंद्र उमरेडकर, कमलेश बारापात्रे, इकबाल शेख, मतिन शेख, नितेश परमाल आदींनी रक्तदान केले. मेयो रुग्णालयातील ब्लड बँकेच्या चमूने रक्त गोळा केले.

भांडेवाडीत हॉकर्स झोन निर्माण करण्याची मागणी
नागपूर, ३० जुलै/ प्रतिनिधी
भांडेवाडीतील नागरिकांनी स्थानिक समस्यांना घेऊन महापालिका वॉर्ड अधिकारी आणि सहाय्यक आयुक्तांना निवेदन सादर केले. भांडेवाडीतील रेल्वे लाईनच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीत आतापर्यंत गडर लाईन टाकण्यात आली नाही. भांडेवाडीत महापालिकेने हॉकर्स झोन करीता जागा आरक्षित करूनही आतापर्यंत कसल्याही सुविधा उपलब्ध न केल्याने गेल्या अनेक वर्षापासून भाजीपाल्याची दुकाने भंडारा मेन रोडवर लावली जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे भांडेवाडी येथे हॉकर्स झोन निर्माण करावा, अशी मागणी शिष्टमंडळातर्फे करण्यात आली. शिष्टमंडळात डॉ. हरिश्चंद्र मेश्राम, सुदाम घरडे, लक्ष्मण वाकोडीकर, कवडू हेमने, लक्ष्मण टिचुकले, सुनीता आतीलकर आदींचा समावेश होता.

अनुदानित अंध, अपंग शाळा कर्मचाऱ्यांचे उद्या धरणे आंदोलन
नागपूर, ३० जुलै/ प्रतिनिधी
अनुदानित अंध, अपंग शाळा व कर्मशाळेतील शिक्षक, निर्देशक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी विदर्भ शिक्षक संघाशी संलग्न असलेल्या अनुदानित अंध, अपंग शाळा व कर्मशाळा कर्मचारी संघटनेतर्फे १ ऑगस्टला धरणे आंदोलन केले जाणार आहे.रिझव्‍‌र्ह बँक चौकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ १ तारखेला दुपारी साडेबारा ते तीन या वेळेत संघटनेतर्फे धरणे देण्यात येतील. सहावा वेतन आयोग, पेन्शन योजना लागू करणे, नियमित वेतन, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या मिळणे, कालबद्ध पदोन्नती इ. प्रमुख मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन आहे. कर्मचाऱ्यांनी यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजाराम शुक्ल, के.जे. चव्हाण, किशोर लहाने, राजेश हाडके व इतरांनी केले आहे.

जिल्ह्य़ातील शिक्षकेतर कर्मचारी ४ ऑगस्टपासून संपावर
नागपूर, ३० जुलै/ प्रतिनिधी
विविध मागण्यांसाठी जिल्ह्य़ातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी येत्या ४ ऑगस्टपासून संपावर जातील, असा निर्णय नागपूर जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघाच्या कार्यकारिणीच्या सभेत सर्वानुमते घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष सुभाष आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत कार्यवाह माधव कुकडे व इतर सदस्य उपस्थित होते.संपाच्या संदर्भात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जाहीर सभा १ ऑगस्टला सीताबर्डीवरील कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूल येथे दुपारी ३ वाजता होणार आहे. राज्य कर्मचारी संघटनेचे निमंत्रक अशोक दगडे, बबन तायवाडे, बाबूराव झाडे, दत्तात्रेय मिर्झापुरे प्रभृती यावेळी हजर राहतील.

आयएमएच्या नवीन चमूचे रविवारी पदग्रहण
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नागपूर शाखेचा पदग्रहण समारंभ २ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजता उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमएच्या सभागृहात होणार आहे. याप्रसंगी डॉ. अनिल लद्धड हे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढावू राहणार आहेत तर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार डॉ. कुमार सप्तर्षी, तसेच सुधार प्रन्यासचे विश्वस्त अनंत घारडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी डॉ. संजय दमके (सचिव), डॉ. नरेन्द्र ताम्हणे आणि डॉ. अविनाश रोडे (उपाध्यक्ष), डॉ. अनिल बजाज (कोषाध्यक्ष), डॉ. अविनाश वासे आणि डॉ. अजय देशपांडे (सहसचिव) हेसुद्धा सूत्रे स्वीकारणार आहेत.

डॉ. बाबा नंदनपवार यांच्या ‘संस्कारकवच’चे उद्या प्रकाशन
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी
म.ल. मानकर शैक्षणिक विकास व सेवा प्रतिष्ठानचे संचालक डॉ. बाबा नंदनपवार यांनी संपादित केलेल्या ‘संस्कारकवच’ या पुस्तकाचे शनिवारी, १ ऑगस्टला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. अंध विद्यालयातील मुंडले सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार असून यावेळी प्रवचनकार विवेक घळसासी हे उपस्थित राहणार आहेत. ‘संस्कारकवच’ हे नंदनपवार यांचे पाचवे पुस्तक असून या पुस्तकात भारतीय पारंपरिक मूल्ये, त्यांचे महत्त्व, विविध श्लोक आदींचे संकलन करण्यात आले आहे. यावेळी विवेक घळसासी यांचे ‘मुकी होत चाललेली घरं’ या विषयावर व्याख्यानही होणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अशोक मानकर आणि नंदनपवार परिवारातर्फे करण्यात आले आहे.

गळफास घेऊन दोघांची आत्महत्या
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी

बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास सेवादल नगरात राहणाऱ्या एका महिलेचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह सापडला. ममता सदानंद झरबडे हे तिचे नाव आहे. घरातील छताच्या पंख्याला तिने गळफास घेतला. हे समजताच अजनी पोलीस घटनास्थळी गेले. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्ण्यालयात पाठवला. अजनी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. ती मनोरुग्ण असल्याचे पोलिसांना समजल़े बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास वैशाली नगरात राहणाऱ्या एका तरुणाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह सापडला. गिरीश विठ्ठल उईके (रा. वैशाली नगर) हे त्याचे नाव आहे. त्याने घरातील छताच्या पंख्याला दुपट्टय़ाने गळफास घेतला. हे समजताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली़

आनंद शेष यांना कुसुमाग्रज पुरस्कार
नागपूर, ३० जुलै / प्रतिनिधी

स्टेट बँकेचे कर्मचारी आनंद शेष यांना नाशिक कवी- कुसुमाग्रज राज्यस्तरीय कवितालेखन स्पर्धेत ‘कतांना’ या चारोळी प्रकारात प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे नुकत्याच झालेल्या समारंभात ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांच्या हस्ते शेष यांना रोख एक हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


टीव्हीएसची ‘मोहल्ला मस्ती’
नागपूर, ३० जुलै/प्रतिनिधी
टीव्हीएस कंपनीच्या गाडय़ांचे अधिकृत विक्रेते जयमल टीव्हीएसमध्ये ‘मोहल्ला मस्ती’ ही नवीन विपणन योजना सुरू करण्यात आली आहे.टीव्हीएस कंपनीच्या विविध योजनांपैकीच ही एक योजना असून यामध्ये ४५ दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यात अपाची आरटीआर १८०, क्लेम एस आर १२५ आणि स्कुटी स्ट्रीक या वाहनांवरील योजनांचा समावेश आहे. या योजनेत एक डिस्प्ले व्हॅन शहरातील विविध भागातून फिरणार असून एखाद्या चौकात ‘मोहल्ला मस्ती’ कार्यक्रम घेण्यात येईल. यावेळी मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यात नृत्य, नकला, गायन आणि इतर अनेक कार्यक्रम घेण्यात येतील. त्यातील विजेत्यांना विविध पुरस्कार वितरित करण्यात येतील. यावेळी लहान मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर डिस्प्ले राहणार आहे. तसेच याठिकाणी ग्राहकांना कंपनीच्या गाडी खरेदीसाठी विविध वित्त योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या योजनेत टीव्हीएस अपाची आरटीआर १८० ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशी स्पोर्टिग बाईक आहे. ही अत्यंत हायपरफॉर्मन्स बाईक असून ती आकर्षक रूपात सादर करण्यात आली आहे.

रिलायन्स मोबाईलचा ग्राहक सेवा मेळावा
रिलायन्स मोबाईलने त्यांच्या महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांसाठी खास मान्सूननिमित्त योजना जाहीर केली असून सर्व प्रकारच्या हॅन्डसेटस, तसेच म्डाटा कार्डवर खास आकर्षक योजना सादर केल्या आहेत. आगामी ९० दिवसांसाठी आयोजित केलेल्या ग्राहक सेवा मेळाव्यात या योजना पुरविण्यात येणार आहेत.यात रिलायन्सच्या स्टोअरमधून करण्यात येणाऱ्या प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. यात हायस्पीड डाटा कार्ड जीएसएम आणि ब्लॅक बेरी यासारखी सर्व नवीन उत्पादने सादर केली जाणार आहेत. कोणत्याही ग्राहकाच्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी तसेच नवीन उत्पादने आणि सेवा याची ग्राहकांना माहिती देण्यासाठी हे खास आयोजन करण्यात आले आहे.

‘डीएसपी ब्लॅकरॉक वल्र्ड एनर्जी फंड’चा शुभारंभ
डीएसपी ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सने आज ‘डीएसपी ब्लॅकरॉक वल्र्ड एनर्जी फंड’च्या शुभारंभाची घोषणा केली आहे. ही योजना ब्लॅकरॉक ग्लोबल फंड वर्ल्ड एनर्जी फंडातील फिडर फंड आहे. या फंडद्वारे तेल आणि ऊर्जा कंपन्यांमधील इक्विटी कर्जरोख्यांमधील गुंतवणूक करण्यात येते. ही योजना कमाल ३० टक्के एवढी गुंतवणूक बीजीएफ न्यू एनर्जी फंडमध्ये करणार असून हा फंड पर्यायी ऊर्जा आणि ऊर्जा तंत्रज्ञांनामधील कंपन्यांच्या इक्विटी सिक्युरिटीमध्ये गुंतवणूक करणार आहे. डीएसपी ब्लॅकरॉक वर्ल्ड एनर्जी फंड भारतीय गुंतवणूकदारांना अनोखी अशी ही गुंतवणूक संधी उपलब्ध करून देत आहे.

‘चिंग्स नूडल्स’ तीन फ्लेवरमध्ये
‘चिंग्स इन्स्टंट नूडल्स’ आता शेजवान, मंचुरियन आणि हॉट गार्लिक या तीन फ्लेवरमध्ये उपलब्ध झाले आहेत. युवावर्ग आणि कार्यालयात काम करणाऱ्यांकडे प्रश्नमुख्याने लक्ष असलेल्या चिंग्स इन्स्टंट नूडल्सने या उत्पादनाचे आकर्षक पॅकेटस् बाजारात सादर केले आहेत. कंपनीने भारतासह अमेरिका, युनायटेड किंग्डम, आखाती देश, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया येथील ४०० शहरांमध्ये नव्या पॅकींगसह हे उत्पादन सादर केले आहे. चिंग्स नूडल्सने त्यांचा मल्टीमिडिया उपक्रम टीव्ही, सिनेमा, होर्डिग्ज, इंटरनेट आणि मोबाईलच्या सहाय्याने सुरू केला आहे. ‘चिंग्स खाओ बाकी भूल जाओ’ ही कंपनीच्या जाहिरातीची टॅगलाईन आहे. ‘चिंग्स इन्स्टंट नूडल्स’चा ७५ ग्रॅमचा पॅक १५ आणि ३०० ग्रॅमचा पॅक ५९ रुपयात उपलब्ध आहे.