Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

नवनीत

हज़्‍ारत उमर हे इस्लामचे द्वितीय खलिफा होते. त्यांचा शासनकाळ मानवी इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे. ते एकदा आपल्या शासन अधिकाऱ्याबरोबर रात्रीच्या वेळी शहरात गस्त घालत होते. त्यांनी एका दाराच्या छिद्रातून एका घरात डोकावून पाहिले, तर त्यांना दिसले, की एका

 

म्हाताऱ्याच्या समोर दारूच्या बाटल्या आहेत आणि काही तरुणी गात आहेत. हे पाहताच दोघांनी एका उडीत भिंत ओलांडली आणि म्हाताऱ्याला झापले, की ‘‘या वयात तुझे हे कार्य किती अशोभनीय आहे.’’ हे ऐकताच म्हातारा उभा राहिला आणि म्हणाला, की ‘‘उमर! माझ्या संदर्भात काही आदेश देण्यापूर्वी माझे ऐकून घ्या!’’ उमरने त्याला अनुमती दिली. तो म्हणाला, ‘‘माझ्या हातून एक गुन्हा घडला, परंतु तुमच्या हातून अल्लाहच्या तीन आदेशांचे उल्लंघन झाले आहे. पहिले असे, की तुम्ही हेरगिरी केली आहे आणि अल्लाहने नागरिकांची हेरगिरी करण्यापासून रोखले आहे. कुरआनात म्हटले आहे, की ‘वलातजस्सू’ (हेरगिरी करू नका.) अल्हुजुरात : १२, दुसरे असे, की आपण माझ्या घरात पाठीमागून उडी मारून दाखल झालात. आदेश आहे, की ‘‘घरात त्यांच्या दारातून दाखल व्हा’’ (बक़रा : १८९) याच अध्यायात असेही म्हटले आहे, की ‘‘हे काही पुण्याईचे कार्य नाही की तुम्ही (कोणाच्या) घरात पाठीमागून दाखल व्हावे.’’ (बक़रा : १८९) आणि तिसरी चूक अशी, की आपण परवानगीविना घरात दाखल झालात. ईश्वरी आदेश आहे, की ‘‘आपल्या घराशिवाय दुसऱ्यांच्या घरात प्रवेश करू नका, जोपर्यंत त्या घरातील लोकांची संमती मिळत नाही आणि त्या घरातील लोकांना तुम्ही सलाम करीत नाही.’’ (अन्नूर : २७) हे ऐकून उमर स्तब्ध झाले. म्हाताऱ्याची त्यांनी माफी मागितली. म्हातारा त्यांना म्हणाला, ‘‘अल्लाह तुम्हाला माफ करील.’’ ते घरातून बाहेर पडले. त्यांना आपले अश्रू आवरेनात. ते ढसाढसा रडत होते आणि स्वत:ला उद्गारून म्हणत होते, ‘‘अल्लाहने मला माफ केले नाही तर मोठी हलाखत आहे. जो गुन्हा माणूस आपल्या कुटुंबीयांपासून लपवितो आता तो वयोवृद्ध म्हणेल की मला उमरने पाहिले आहे.’ अनीस चिश्ती

सूर्याचे आपल्या आकाशगंगेतील स्थान कुठे आहे? सूर्य स्थिर आहे की त्याला काही गती आहे?
आपणा पृथ्वीवासीयांच्या दृष्टीनं सूर्याचं महत्त्व अगदी मूलभूत स्वरूपाचं आहे, कारण सूर्य हा पृथ्वीवरच्या सजीवसृष्टीचा जीवनदाता आहे. सूर्याचं तेज इतकं प्रखर असतं, की आपण त्याच्याकडे एखादा सेकंदही थेटपणे पाहू शकत नाही. पण विश्वाचा एकूण पसारा लक्षात घेतला, तर त्यामध्ये आपल्या सूर्याचं स्थान ‘एक सामान्य तारा’ एवढंच आहे. अगदी आपल्या आकाशगंगेचा जरी विचार केला तरी सूर्यापेक्षा मोठे आणि तेजस्वी तारे लाखांच्या संख्येत मोजता येतील. आपल्या आकाशगंगेचा व्यास आहे एक लक्ष प्रकाशवर्ष. तिच्या केंद्रापासून सुमारे २५००० प्रकाशवर्ष अंतरावर आपल्या सूर्याचं स्थान आहे. सूर्य स्थिर नाही. तो स्वत:भोवती आणि आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरत आहे. सूर्य म्हणजे अतिशय तापलेल्या अशा वायूंचा भलामोठा गोळा आहे. एखादी घन गोलाकार वस्तू स्वत:भोवती फिरत असेल तर तिच्या सगळय़ा कणांना एक फेरी पूर्ण करण्यासाठी सारखाच कालावधी लागतो. पण सूर्याचं तसं नाही. त्याच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळचे प्रदेश ३४.४ दिवसांत एक फेरी पूर्ण करतात, तर विषुववृत्ताजवळचा प्रदेश एका फेरीसाठी २५.१ दिवसांचा कालावधी घेतो. त्यामुळे सूर्याचा स्वत:भोवती फिरण्याचा सरासरी काळ २५.४ दिवस एवढा धरला जातो. सूर्यावर असलेल्या डागांचा अभ्यास करून हे गणित मांडलं गेलं आहे. आपल्या आकाशगंगेच्या केंद्रात भलंमोठं कृष्णविवर आहे. आपल्या आकाशगंगेतले सगळे तारे या कृष्णविवराभोवती फिरत आहेत. साहजिकपणे सूर्यही या कृष्णविवराला प्रदक्षिणा घालतो आहे. एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्याला लागतात २० कोटी र्वष. दुसऱ्या पद्धतीनं सांगायचं तर या कक्षेत त्याची गती आहे २३० कि.मी. प्रति सेकंद.
गिरीश पिंपळे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

काराकोरम पर्वतरांगेत के-२ हे शिखर वसलेले असून, त्यांची उंची २८ हजार २५० फूट असून, ती एव्हरेस्टपेक्षा फक्त ७७५ फूट कमी आहे. तथापि के-२ची चढाई एव्हरेस्टपेक्षाही कठीण समजली जाते. के-२ शिखरावर अमेरिकन व इटालियन गिर्यारोहक चढाईचा प्रयत्न करत होते. शिखर सर करण्याचा प्रयत्न १९३९ व १९५३ साली खराब हवामानामुळे सोडून द्यावा लागला. त्यात कित्येकांना प्राण गमवावा लागला. १९५४ साली इटलीच्या आर्दितो देसियोच्या नेतृत्वाखाली के-२ शिखर सर करण्याची मोहीम आखली गेली. १८ सहकाऱ्यांच्या या मोहिमेत भूगर्भशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी चार शास्त्रज्ञही देसियोने घेतले होते. ११ गिर्यारोहकांची निवड त्याने केली. एप्रिल महिन्यात त्याने चढाईला सुरुवात केली. जूनच्या सुमारास मोहिमेतला एक सहकारी मारियो पुकोझ याच्या मृत्यूने सर्वानाच धक्का बसला. त्यातच लहरी हवामान, हिमवादळ, अंगावर कधीही कोसळू शकणारी हिमशिखरं या सर्वाचा अडथळा पार पाडत ३० जुलैपर्यंत २७ हजारांच्या फुटावर गिर्यारोहक येऊन ठेपले. लासिडेल्लीला तो अवघड कडा चढल्यावर त्यापेक्षाही चढायला अवघड कधी बर्फाची भिंत आडवी आली. जी कोणत्याही क्षणी त्यांच्या अंगावर कोसळू शकणार होती. तेव्हा अतिशय सावधगिरीने ती भिंत तिरप्या रेषेत पार केली आणि त्या क्षणी लक्षात आले, की प्राणवायू संपला. तरीही मोहीम त्याने चालू ठेवली. संध्याकाळचे सहा वाजल्यावर त्याच्या असे लक्षात आले, की आता चढायला काहीच रस्ता नाही. शिखरावर अर्धा तास थांबून देसियो आणि त्याच्या सहकाऱ्यांनी उतरायला सुरुवात केली.
संजय शा. वझरेकर

आदित्य नव्या गावात राहायला आला होता. बाबांची बदली झाल्यामुळे त्यांना मोठे शहर सोडून अमनपुरीसारख्या छोटय़ा गावी यावे लागले होते. मित्रमैत्रिणी सगळे दूर राहिले म्हणून आदित्यला फार वाईट वाटत होते. आई म्हणाली, ‘‘आदि, असा घरकोंबडय़ासारखा काय बसून राहतोस. बाहेर जावं, नवे मित्र करावेत.’’ आदित्यला वाटले, आपल्यासारखा शहरातला चुणचुणीत मुलगा पाहून सगळी मुले आपले स्वागत करतील. ‘‘अरे, ये ना खेळायला.. अरे, चल आपण चिंचा पाडायला जाऊ..’’ पण हे सगळे त्याचे स्वप्नच ठरले. मुले क्रिकेट खेळत होती. आदित्यने विचारले, ‘‘मी येऊ तुमच्यात खेळायला?’’ नाक उडवत एकजण म्हणाला, ‘‘ये, चेंडू अडवायला उभा राहा.’’ खेळ संपेपर्यंत त्याच्याशी कुणीच बोलले नाही. अंधार पडायला लागला, तसे सगळे घरी निघून गेले. आदित्य फार दु:खी झाला. ‘‘मला इथे मित्र मिळणारच नाहीत.’’ ‘‘आदित्य, दु:खी नको होऊस. मी मुलांना मदत करणारी परी आहे. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यापाशी मी होते. बोल! काय मदत हवीय तुला.’’ परीला पाहून आदित्य चकित झाला. ‘‘गावातल्या सगळय़ा मुलांना मी आवडायला पाहिजे.’’ ‘‘अंऽ ऽऽ तू मला खेळायला एक मोठ्ठा प्राणी दे. जो फक्त माझ्याकडेच असेल. बाकी गावात कुणाकडे नसेल. मग सगळी मुले येतील माझ्या मित्राला पाहायला.’’ आदित्य म्हणाला. परीने विचार केला, म्हणाली, ‘‘ठीक आहे.’’ आदित्य घरी आला. पाहतो तो दारात एक उंट उभा होता. हैराण चेहऱ्याने बाबा कमरेवर हात ठेवून त्याच्यासमोर उभे होते. आई कपाळाला हात लावून बसली होती. आदित्यला मात्र आनंद झाला. सगळे कसे आता आपणहून येतील माझ्याशी मैत्री करायला. त्याच्या मनात आले. उंटाला रात्री खायला काय द्यायचे? एवढे सारे पाणी त्याला प्यायला कुठल्या भल्यामोठय़ा भांडय़ात द्यायचे.. त्याला झोपायला आडोसा कसा करायचा. एक ना दोन अनेक प्रश्न उभे राहिले. आई वैतागून म्हणाली, ‘‘अरे, खेळायला, पाळायला प्राणी हवा होता तर कुत्रा, मांजर, शेळी, बकरी, कोंबडा, पोपट मागायचास.’’ बाबा म्हणाले,‘‘ हे बघ आदि, उद्या उजाडायच्या आत हा उंट इथून गेला पाहिजे. नसती ब्याद नको.’’ आदित्य परीची आठवण करू लागला. परीला म्हणाला, ‘‘मला उंट नको. मीच मित्र मिळवेन.’’ कुठलीही गोष्ट विनासायास मिळत नाही. त्यासाठी स्वत: प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न अयशस्वी झाला तर परत परत प्रयत्न करीत राहावे लागते. मगच आपली इच्छित गोष्ट आपल्याला प्राप्त होते. आजचा संकल्प : मी प्रयत्न करीत राहीन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com