Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

बेलापूर मतदारसंघावर काँग्रेसचा दावा
नवी मुंबई / प्रतिनिधी ठाणे जिल्ह्णााचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील बेलापूर या विधानसभा मतदारसंघावर दावा सांगून दोन दिवस उलटत नाही, तोच शहरातील कॉंग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत नाईकांचा हा दावा खोडून काढत नवी मुंबईतील किमान एक मतदारसंघ तरी कॉंग्रेसला सोडावाच लागेल, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. गणेश नाईकांचे वास्तव्य कोपरखैरणेत असून हा विभाग ऐरोली विधानसभा क्षेत्रात मोडतो. असे असताना नाईकसाहेबांनी बेलापूरमधून निवडणूक लढवली, तर लोक म्हणतील दादा घाबरले. त्यामुळे त्यांनी ऐरोलीतूनच निवडणूक लढवावी, असा सल्ला कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी एका पत्रकार परिषदेत दिला.

आक्रमक काँग्रेसची गणेशदादांना हूल!
जयेश सामंत

आठवडाभरापूर्वी नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघावर दावा सांगून विरोधकांसह स्वपक्षीयांचीही भंबेरी उडविणारे पालकमंत्री गणेश नाईक यांना आगामी निवडणुकांना सामारे जाताना शिवसेनेपेक्षा राज्यात मित्रपक्ष असलेल्या कांॅग्रेस पक्षाचे आव्हान मोडीत काढण्याची कसरत आधी करावी लागेल, असेच चित्र आहे. बुधवारी सायंकाळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघावर दावा सांगताना पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्षपणे का होईना, टीकेची झोड उठविली. नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करताना भगत यांनी ‘आम्ही दोघे भाऊ-भाऊ, तुझे आहे ते वाटून खाऊ, माझ्या वाटय़ाला हात नको लावू’, ही उक्ती सर्वाना ऐकविली.

गस्तीनौका सुरू करण्यासाठी गोरज मुहूर्ताचा शोध
उरण/वार्ताहर - नवी मुंबई आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या सागरी पोलीस ठाण्याला एक गस्तीनौका देण्यात आली असली, तरी मुहूर्त सापडत नसल्याने पावसाळ्यानंतरच या नौकेचे काम सुरू होणार असल्याची माहिती सूत्रानी दिली.नवी मुंबई आयुक्तालयाअंतर्गत मोरा व एनआरआय या दोन सागरी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात गस्त घालण्यासाठी सध्या या दोन्ही पोलीस ठाण्यांकडे एकही गस्तीनौका नाही. याआधी मोरा सागरी पोलीस ठाण्याकडे असलेली यशवंती ही गस्तीनौका पावसाळी हंगामात खराब हवामानाचा व खवळलेल्या समुद्री लाटांचा सामना करण्यास असमर्थ असल्याने दरवर्षी गस्तीनौका बंद ठेवली जाते.

‘पूना पॉइंट’वर कारवाई करण्याचे आयुक्तांचे आश्वासन
पनवेल/प्रतिनिधी - कळंबोली ग्रामपंचायतीने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिलेले नसताना, तसेच ग्रामस्थांचा विरोध डावलून सुरू करण्यात आलेल्या कळंबोली येथील पूना पॉइंट लॉजवर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नुकतीच त्यांची भेट घेऊन या लॉजवर कारवाई करण्याची मागणी केली. मॅकडोनल्डच्या मागील बाजूस कळंबोली गावात यावर्षी मार्चमध्ये हे लॉज सुरू करण्यात आले.

पनवेल-कल्याणदरम्यान केडीएमटीची कमी खर्चात बससेवा!
पनवेल/प्रतिनिधी - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ट्रान्सपोर्टतर्फे कल्याण-पनवेलदरम्यान नवी बससेवा नुकतीच सुरू करण्यात आली. ही सेवा एसटीच्या तुलनेत स्वस्त आणि अधिक वेगवान असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.तळोजे औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यात काम करणारे शेकडो कामगार आणि पनवेल परिसरातील नागरिक या बससेवेसाठी आग्रही होते. पनवेल प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे, सचिव श्रीकांत बापट, तळोजा औद्योगिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे सरचिटणीस यशवंत ठाकरे यांनी ही सेवा सुरू होण्यासाठी केडीएमटीशी वेळोवेळी पत्रव्यवहार आणि चर्चा केली होती. अखेर या सेवेला हिरवा कंदील मिळाला.३६ किलोमीटरच्या या अंतरासाठी प्रवाशांना १९ रुपये मोजावे लागतील. या प्रवासासाठी एसटीचे तिकीट २८ रुपये असल्याने केडीएमटीची सेवा प्रवाशांसाठी उपकारक ठरणार आहे. कल्याण रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या या गाडय़ा उसाटणे, तळोजा औद्योगिक क्षेत्र, नावडे या मार्गे पनवेल रेल्वे स्थानकात येतील. पनवेल रेल्वे स्थानकाबाहेरून पहिली गाडी सकाळी साडेआठ वाजता सुटणार असून, रात्री पावणेदहा वाजेपर्यंत दर अध्र्या तासाने गाडी उपलब्ध असेल. भविष्यात डोंबिवली-पनवेल, बदलापूर-पनवेल अशी सेवा देण्याचा केडीएमटीचा विचार आहे.

गणेशोत्सवासाठी एसटीचीविशेष बससेवा
पनवेल/प्रतिनिधी - पुढील महिन्यात गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन पनवेल एसटी आगारातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सावंतवाडी, मालवण आदी ठिकाणी अतिरिक्त गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. २०, २१ आणि २२ ऑगस्ट या दिवशी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन या विशेष गाडय़ा सुटतील.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी पनवेल आगारामध्ये संगणकीय आरक्षण व्यवस्था, तसेच ग्रुप आरक्षणाची सुविधा करण्यात आली आहे, अशी माहिती आगारप्रमुख एस.पी. चौधरी यांनी दिली. अधिक माहितीसाठी २७४५२७०१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.