Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

नाशिक जिल्ह्य़ाचा पतपुरवठा आराखडा ३,४२४ कोटींचा
कृषी व्यवसायासाठी भरीव तरतूद

प्रतिनिधी / नाशिक

जिल्ह्य़ाचा २००९-१० या आर्थिक वर्षासाठी ३,४२४ कोटी ८१ लाखाचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये कृषी व्यवसायासाठी २,२६५ कोटी ३५ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. आराखडय़ाच्या पुस्तिकेचे प्रकाशन गुरूवारी जिल्हधिकारी पी. वेलरासू यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा आराखडा सुमारे ४५० कोटीने अधिक आहे. तसेच त्यामध्ये प्रश्नधान्य क्षेत्रासाठी केलेली तरतूदही १९ टक्क्य़ाने जास्त आहे.
येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जुन्या इमारतीतील सभागृहात पतपुरवठा आराखडय़ाच्या विषयावर बैठक झाली. याप्रसंगी रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहायक महाप्रबंधक आर. पी. हेब्बर, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक अनंत म्हसकर, महाराष्ट्र बँकेचे उपव्यवस्थापक विनायक हातवळणे, मुख्य व्यवस्थापक वसंत म्हस्के, अग्रणी जिल्हा प्रबंधक आत्माराम माळी आदी उपस्थित होते.

अवघ्या पाच मिनिटांत पाच कोटींच्या कामांना मंजुरी
* स्थायी समितीचा कारभार
* घंटागाडीचा विषय वगळला
प्रतिनिधी / नाशिक

देवळाली येथील क्रीडांगणाकरिता तीन कोटी ४३ लाख रुपयांची अंतिम नुकसान भरपाई देणे, खत प्रकल्पासाठी सव्वा कोटी रुपयांच्या यंत्रणेची खरेदी अशा सुमारे पाच कोटीच्या कामांना गुरुवारी महापालिका स्थायी समितीने अवघ्या पाच मिनिटात मंजुरी देत सभेचे कामकाज तहकूब केले. सभा आटोपती घेण्याबद्दल उशीरा आलेल्या सदस्यांनी आक्षेप घेतला असला तरी नंतर मात्र त्यांनीही इतरांबरोबर सहभागी होत बंद दाराआड चर्चा करण्यात धन्यता मानली, अशी चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू होती.

ध्वनी प्रदूषण कमी करण्यास साऊंड सिस्टिम संघटना राजी
प्रतिनिधी / नाशिक

पहिले ध्वनी प्रदूषणमुक्त शहर म्हणून नाशिक ओळखले जावे याकरिता काही सामाजिक संघटनांकडून प्रयत्न सुरू झाले असतानाच या विषयावर आयोजित बैठकीमध्ये उपस्थित झालेल्या काही मुद्यांकडे साउंड सिस्टीम असोसिएशनने लक्ष वेधले आहे. साउंड सिस्टीमशी संबंधित तांत्रिक बाबींमधून ध्वनी प्रदूषण कमी करण्याकरिता प्रयत्न करण्याची तयारी संघटनेने दर्शविली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या विषयावर अलिकडेच नाटय़गृहात बैठक पार पडली होती. ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

‘..तर लोकप्रतिनिधींना फंड कोण देणार?’
प्रतिनिधी / नाशिक

ज्यांनी कधी बॅटही हाती घेतली नाही, असे अनेक जण विरोधी पॅनलमध्ये असताना खेळाडू पॅनलमध्ये नावाप्रमाणेच क्रिकेटशी संबंधित मंडळींचा समावेश आहे, असा टोला नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष सुधाकर भालेकर यांनी एकता पॅनलला लगावला आहे. विद्यमान अध्यक्ष विनोद शहा यांनी सूत्रे हाती घेण्याआधीच्या व नंतरच्या स्थितीचा विरोधकांनी अभ्यास केला तरी त्यांना फरक कळून येईल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विरोधी गटातील राजकीय व्यक्तींच्या उमेदवारीच्या मुद्याला स्पर्श करताना त्यांनी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून फंड जमा करता येतो, असा दावा करण्यात येतो, परंतु क्रिकेटरच नसतील तर लोकप्रतिनिधींना फंड कोण देणार, असा सवालही त्यांनी केला.

‘यश तुमचेच’ पुस्तकाचे प्रकाशन
नाशिक / प्रतिनिधी
आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन, निश्चित ध्येय असणे, प्रेरणा, मनाची प्रसन्नता या गोष्टींची माणूस कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो. यशातच माणूस मोठा होतो, समाजात लोकप्रिय होतो, असे विचार राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी व्यक्त केले. राज्य परिवहन महामंडळाकडून प्रश्नदेशिक व्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले दा. ल. ठाकूर यांनी लिहिलेल्या ‘यश तुमचंच’ या व्यक्तिमत्व विकासावरील पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यश मिळविलेला माणूस स्वत: आनंदी, प्रसन्न असतो. त्या अनुषंगाने या पुस्तकात यशाबाबत अनेक विचार मांडलेले आहेत. पुस्तकात माणूस उत्तम नागरिक कसा घडतो, याचेही विवेचन असून या विषयाची आज समाजाला अत्यंत गरज आहे, असेही परिचारक यांनी सांगितले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओ. पी. गुप्ता उपस्थित होते.

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत नाशिकचे यश
प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथील जयेश येवले समन्वयक असलेल्या गंगापूर व उत्तमनगर शाखांनी आय. पी. ए. कंपनीतर्फे चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय अबॅकस आणि मेंटल अ‍ॅरिथमेटिक स्पर्धेत उत्कृष्ट यश मिळविले. स्पर्धेत २१ राज्यातील चार हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ६५ विद्यार्थ्यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पुरस्काराने गौरविण्यात आले. १४०० विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक मिळविले. शिक्षकांसाठी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही गंगापूर शाखेच्या पूनम पाटील यांनी व्दितीय क्रमांक मिळविला. त्यांना उत्कृष्ट शिक्षिका म्हणून तर जयेश येवले यांना उत्कृष्ट समन्वयक म्हणून गौरविण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पाटील यांच्यासह स्वप्नाली दुसे, वैशाली कोतकर, समीर शहा तसेच अभिनव बालविकास मंदिरच्या मुख्याध्यापिकांकडून मार्गदर्शन मिळाले.

नाशिकमध्ये आज शाहिरी जलसा
नाशिक / प्रतिनिधी

कष्टकरी समाज जीवनाचे प्रतिबिंब आपल्या साहित्यात रेखाटणारे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथे रिपब्लिकन पँथर्स-जातीअंताची चळवळतर्फे विद्रोही शाहिरी जलसा आणि गुणगौरव समारंभ शुक्रवारी रात्री १० वाजता जिल्हा परिषदेजवळील अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याजवळील प्रश्नंगणात आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे उत्तर महाराष्ट्र निमंत्रक विजय बागूल यांनी दिली. शुक्रवारी होणाऱ्या विद्रोही जलसामध्ये शाहीर अरूण निचळ, तारचंद मोतमल आणि सहकारी सहभाग घेणार आहेत. रविवारी दुपारी २ वाजता वडाळा गावातील डॉ. आंबेडकर सभागृहात कवी कैलास पगारे यांच्या उपस्थितीत दहावी व बारावीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत उत्कृष्ट यश मिळवलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी अतुल भोसेकर, समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अशोक पवार, प्रश्न. किशोर गोरखे, नंदकिशोर साळवे, प्रश्न. नागार्जुन, कॉ. अशोक बोराडे आदी उपस्थित राहणार आहेत. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमांना नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष विकास कांबळे, उपाध्यक्ष भारत दाभाडे यांनी केले आहे.

पतसंस्थांच्या अडचणींविषयी आज चर्चासत्र
नाशिक / प्रतिनिधी

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व नाशिकच्या समृद्धी मॅनेजमेंट अ‍ॅण्ड फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस यांच्या सहकार्याने पतसंस्थांच्या विविध अडचणींवर चर्चासत्र व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन शुक्रवारी सकाळी १० वाजता नासर्डी पुलाजवळील नाशिक्लबमध्ये आयोजित करण्यात आले आहे.विभागीय सहनिबंधक बी. एस. यमपल्ले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून काकासाहेब कोयटे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. शिबिरास सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक शरद जरे, नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशन (मर्यादित)चे अध्यक्ष उत्तम ढिकले, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे महासचिव गिरीश तुळपुळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिबिरात पतसंस्थांच्या अडचणी, सहकार कायदा व पतसंस्थांचे उपविधी, थकबाकी वसुलीसाठी सामुदायिक प्रयत्न आणि पतसंस्था उत्पन्न वाढीचे विविध मार्ग यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जास्तीजास्त नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिरीष कोतवाल, भास्कर कोठावदे यांनी केले आहे.