Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

भारतीय किसान सभेतर्फे धुळे येथे मोर्चा
वार्ताहर / धुळे

साठ वर्षावरील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर एक हजार रुपये निवृत्तीवेतन सुरू करावे यांसह इतर अनेक मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे मोर्चा काढण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले. शहरातील बारा पत्थर चौकापासून मोर्चाला सुरूवात झाली. मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. धुळे तालुक्यासह साक्री, शिरपूर, शिंदखेडा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोर्चात मोठय़ा संख्येने सहभाग घेतला.

सुनील कोल्हे यांच्या बदलीमागील कारणांविषयी तर्कवितर्क
वार्ताहर / धुळे

जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कोल्हे यांची नागपूर येथे तर बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक एच. व्ही. देशभ्रतार यांची धुळे येथे बदली झाली आहे. नागपूर महामार्ग विभागाच्या अधीक्षकपदी कोल्हे यांची नेमणूक करण्यात आली असून धुळ्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून देशभ्रतार हे लवकरच सूत्रे हाती घेणार आहेत. कोल्हे यांच्या बदलीमागील कारणांविषयी विविध तर्क वितर्क करण्यात येत असून शहर व जिल्ह्य़ातील वाढते अवैध धंदे हे त्यापैकी एक कारण असल्याचे मानले जात आहे.

बोगस रेशनकार्ड : चौकशी करण्याचे तहसीलदारांचे आदेश
मनमाड / वार्ताहर

शहरात दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना देण्यात येणारी बोगस रेशनकार्ड आढळत असल्याच्या तक्रारींची दखल घेत याबाबत तातडीने चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार सुनील गाढे यांनी दिले. बोगस रेशनकार्ड तसेच रेशनचा काळाबाजार या प्रश्नावर रिपाइंतर्फे येवला रस्ता सुमारे अर्धा तास अडविण्यात आल्यानंतर तहसीलदारांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

ज्ञानवंतांची दखल घेणारी दृष्टी महत्वाची - सदानंद मोरे
मालेगाव / वार्ताहर
१९१३ मध्ये इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी समाजातील कर्तबगारांची यादी तयार केली. त्या यादीत महात्मा फुले यांचा समावेश नव्हता, समाजाने कालांतराने त्याची दखल घेतल्याने गुणवंत, ज्ञानवंतांची दखल घेणारी दृष्टी फारच महत्वाची असते, असे विचार इतिहासाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी येथे मामको जनकल्याण ट्रस्टतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात मांडले. ट्रस्टतर्फे शहर व तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा कॅम्परोडवरील आय. एम. हॉलमध्ये सत्कार करण्यात आला.

येवला तहसील कार्यालयावर ‘बोंबाबोंब’ मोर्चा
येवला / वार्ताहर

शासनाच्या जाचक अटींमुळे भटक्या, आदिवासींची पिळवणूक सुरू असून भटक्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथे तहसील कार्यालयावर ‘बोंबाबोंब’ मोर्चा काढण्यात आला. जिल्हा बँकेचे संचालक नरेंद्र दराडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.तहसील कार्यालयापुढे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. आपण गेले दोन महिने तालुक्याचा दौरा केला. त्यावेळी भटके व आदिवासींचे प्रश्न गंभीर असल्याचे दिसल्यामुळेच शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची वेळ आली, असे दराडे यांनी सांगितले.

श्रीसंत मुक्ताबाई राम पालखीचे आज जळगावी आगमन
वार्ताहर / जळगाव

येथील ग्रामदैवत श्रीराम मंदीर संस्थानच्या श्रीसंत मुक्ताबाई राम पालखी पायी दिंडीचे सुमारे १,००० किलोमीटरचा पायी प्रवास करून ३१ जुलै रोजी शहरात आगमन होत आहे. श्रीराम मंदीर संस्थानच्या श्रीसंत मुक्ताबाई राम पालखीचे हे १३७ वे वर्ष आहे. पालखी जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर व परत जळगाव असा एक हजार किलोमीटरचा पायी प्रवास करून सुमारे दोन महिन्यांनी शहरात दाखल होत आहे. येथे आगमन झाल्यानंतर पालखीची शहरात मिरवणूक निघेल. श्रीराम मंदीराचे विश्वस्त व गादीपती हभप मंगेश महाराज अग्रभागी असतील. त्यांच्याच नेतृत्वात पालखी दरवर्षी पंढरपूरकडे जाते. शहरातील प्रमुख मार्गानी ही पालखी मिरवणूक श्रीराम मंदीरात रात्री ९.०० वाजता पोहोचेल. तेथे भजन व कीर्तनाने आषाढी वारीची सांगता होईल.श्रीसंत मुक्ताबा राम पालखी जळगाव येथून औरंगाबाद अहमदनगर व सोलापूर जिल्ह्य़ांचा पायी प्रवास करून पंढरपुरात पोहोचते. पायी पालखी सोबत ५०० हून अधिक वारकरी असतात. दरवर्षी ही संख्या वाढतच असल्याचे मंगेश महाराज यांनी सांगितले. पालखीचे जळगाव येथून प्रस्थान व आगमन असा सर्व कार्यक्रम ठरल्या प्रमाणेच होतो. प्रत्येक मुक्कामाच्या गावी पालखीचे जोरदार स्वागत होते, सन्मान होतो. या प्रत्येक ठिकाणी भजन, कीर्तन, भारूडे, आरत्या व विविध धार्मिक कार्यक्रम होतात, अशी माहितीही त्यांनी दिली.

पीपल्स बँक विलिनीकरणास मुदतवाढ
चाळीसगांव / वार्ताहर

येथील अवसायनात गेलेल्या पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द होण्यास वर्ष होऊनही बँकेच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अर्थ विभागाकडे बँकेच्या अवसायकांनी मागितलेली मुदतवाढ मान्य करण्यात आली असून २५ नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.पीपल्स बँकेचा परवाना २५ नोव्हेंबर ०८ रोजी रद्द करण्यात आला होता. विलिनीकरणासंबधी नगर अर्बन बँकेशी बोलणी सुरू असून नगर अर्बन बँक लवकरच या संदर्भात निर्णय घेईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र निकम व अवसायक आर. आर. पाटील यांनी व्यक्त केला आहे. पीपल्स बँकेतील अपहारानंतर ठेवीदारांना वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे चित्र दिसून आले. आजी-माजी संचालक मंडळावर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्यानंतरही त्यांनी बँकेच्या हिताच्या दृष्टीने फारसे काही केल्याचे दिसत नाही. याउलट पोलीस यंत्रणेकडून अप्रत्यक्षरित्या अभय मिळाल्याने संचालक, कर्जदार निर्धास्तपणे वावरतांना दिसत आहेत. २२ हजार ५१ ठेवीदारांचे ३० कोटी ३४ लाख रूपये बँकेत मुदत ठेवीच्या रूपात अडकडले आहेत. त्यांची कोणी दाद घेण्यास तयार नाही. बँक अवसायनात गेल्यामुळे एक लाख रूपयांपर्यत ठेवी असणाऱ्यांना विमा संरक्षण असल्यामुळे किमान तीन ते चार महिन्यात एवढी रक्कम तरी ठेवीदारांना मिळू शकेल असे बँकेचे अवसायक पाटील व निकम यांनी कळविले आहे. त्यांनी ठेवीदारांकडून अर्ज भरून घेण्यापेक्षा बँकेच्या दस्ताऐवजाप्रमाणे प्रत्यक्ष ठेवीदारांना अथवा ते मयत असल्यास त्यांच्या वारसदारांना तसे लेखी पत्राने कळवावे, अशी मागणी होत आहे.

दगडफेकीनंतर शिंदखेडय़ात शांतता समितीची बैठक
शिंदखेडा / वार्ताहर

येथे नुकत्याच उद्भवलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कानुबाई उत्सवातील दगडफेक प्रकरणाचा उल्लेख करून तहसीलदार एच. पी. बलसाणे यांनी समाजाचे स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना कडक शासन केले जाईल, अशी ग्वाही दिली. खान्देशातील कानुबाई उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. रात्रभर जागरण करून, कानुबाईची गाणी म्हटली जातात. २७ जुलै रोजी कानुबाई विसर्जनाची शोभायात्रा गावातून निघाली. मिरवणूक गावातील हैदरअली चौकात आल्यानंतर वाजंत्री वाजवू नका, असे एका समाजाकडून सांगण्यात आले. त्यामुळे वाद होऊन वातावरण चिघळले व दगडफेकही झाली.त्या पाश्र्वभूमीवर, ही बैठक आयोजित करण्यात आली होती. गेल्या सहा-सात महिन्यापासून शांतता समितीची सभा झाली नाही, याचीही खंत सदस्यांनी व्यक्त केली. दगडफेक प्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वसीम शेख गफूर यास ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून गांधीचौक आणि हैदरअली चौकात जादा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, तीन वर्षापूर्वीही असाच प्रकार घडला होता. त्याची आठवण यानिमित्ताने करून दिली जात आहे.

धुळे जिल्ह्य़ात होमगार्ड भरती
धुळे / वार्ताहर

जिल्ह्य़ातील होमगार्डच्या रिक्त जागांचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी येत्या ६ ते ९ ऑगस्ट या कालावधीत भरती होणार असल्याची माहिती जिल्हा समादेशक राजेंद्र जिरेकर यांनी दिली. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार किमान इयत्ता आठवी पास असावा. तसेच शारीरिक दृष्टय़ा सक्षम पुरूषांसाठी किमान उंची पाच फूट पाच इंट, वजन किमान ५० किलोग्रॅम, छाती न फुगविता ३२ इंच व फुगवून ३४ इंच तसेच महिलांसाठी उंची चार फूट ११ इंच, वजन ४० किलोग्रॅम अशा अटी आहेत. वाहन चालक, तांत्रिक, इलेक्ट्रीशियन इत्यादी प्रशिक्षित उमेदवारांना तसेच उच्च विद्याविभूषित उमेदवारांना विशेष प्रश्नधान्य देण्यात येईल. होमगार्डच्या भरतीस इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या तालुक्यातील नमूद ठिकाणी भरतीकरिता शाळा सोडल्याचा दाखला, निवासाच्या प्रमाणाकरिता शिधापत्रिका व शिक्षणाचे प्रमाणकरिता गुणपत्रक इत्यादी मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित सत्यप्रतीसह शारीरिक चाचणी व मुलाखतीस हजर रहावे. भरतीचा कार्यक्रम असा : शिरपूर ६ ऑगस्ट सकाळी नऊ वाजता, आय. टी. आय. सुभाष कॉलनी, साक्री ७ ऑगस्ट २००९ सकाळी नऊ वाजता आदर्श हायस्कूल मैदान, साक्री, पिंपळनेर ७ ऑगस्ट २००९ दुपारी तीन वाजता शासकीय विश्रामगृह, पिंपळनेर, दोंडाईचा ८ ऑगस्ट २००९ सकाळी नऊ वाजता नतून माध्यमिक हायस्कूल, डायव्हर्शन रोड, दोंडाईचा, शिंदखेडा ८ ऑगस्ट २००९ दुपारी तीन वाजता किसान विद्यालय, धुळे ९ ऑगस्ट सकाळी नऊ वाजता पोलीस कवायत मैदान.