Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या रेल्वे अर्थसंकल्पीय भाषणात पश्चिम बंगाल मधील एक प्रकाशन व्यवसायातील कंपनी ताब्यात घेण्याचा मनोदय जाहीर केला होता. आता रेल्वे अर्थसंकल्प मंजूर झाल्यावर पश्चिम बंगालमधील बासुमती कॉर्पोरेशन लि. ही कंपनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु होईल, असे दिसते. हे प्रत्यक्षात उतरल्यास रेल्वेच्या ताब्यात या आजारी असलेल्या व कर्जाचा बोजा असलेल्या कंपनीचा प्रिंटिंग प्रेस येईल. सध्या राज्य सरकारच्या मालकीची असलेली ही कंपनी १२८ वर्षांची जुनी आहे. या कंपनीच्या वतीने पश्चिम बंगालमधील सर्वात जुने दैनिक ‘बासुमती’ प्रकाशित होत असे. परंतु हे दैनिक आता इतिहासाचा भाग झाला आहे. १८८१ साली बासुमती ही प्रकाशन कंपनी सुरु झाली. १९१४ मध्ये या कंपनीच्या वतीने ‘बासुमती’ हे दैनिक सुरु करण्यात आले. हे दैनिक सुरु करण्यामागे प्रेरणा महात्मा गांधी, चित्तरंजन दास, अरविंद घोष यांची होती. त्यांच्या नावाने या दैनिकात लेखही प्रकाशित होत असत. आता या प्रिंटिंग प्रेसमध्ये सिनेमाच्या तिकिटापासून राज्य सरकारची विविध छपाईची कामे केली जातात.

काल आणि आज
लोकमान्य टिळकांची जयंती गेल्या आठवडय़ात झाली तेव्हा संसद भवनातील त्यांना आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातले फक्त पाच-सहा खासदार उपस्थित होते. त्याच्या बातम्या आल्याने उद्याच्या त्यांच्या पुण्यतिथीस चित्र थोडे वेगळे असेल! अर्थात संसदेतल्या तसबिरीपुढे जमलेले सगळे टिळकांचे तत्त्वज्ञान आचरणात आणणारे आहेत आणि जे जमले नाहीत ते वेगळ्या वाटेचे आहेत, असे नाही, हे खरे पण महाराष्ट्रीय संस्कृती, महाराष्ट्रीय नेत्यांची बूज आपणच ठेवत नाही, हेदेखील तेवढेच खरे. या पाश्र्वभूमीवर नेता म्हणून टिळकांचं मोठेपण जाणून घेण्यासारखं आहे. मंडालेच्या तुरुंगात असताना ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. सुटकेनंतर सरकार हस्तलिखित वह्या देण्यास विलंब करू लागले. टिळकांचे सहकारी त्यामुळे चिंतेत पडले.

नाशिक महसूल विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्य़ांसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत तब्बल साडे सहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर झाले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता नजीकच्या काळात केव्हाही लागू होण्याची चिन्हे असल्याच्या पाश्र्वभूमीवर या सर्व घडामोडी झाल्या. त्यामुळे कोणी विधानसभा निवडणूक पॅकेज तर कोणी निवडणुकीच्या तोंडावर जनतेला दाखविलेले गाजर म्हणूनही त्याची संभावना केली. विरोधकांनी त्या विरोधात जोरदार ओरड सुरु केली असली तरी राज्याचे उपमुख्यमंत्री, नाशिकचे पालकमंत्री आणि याच जिल्ह्य़ातील येवल्याचे आमदार म्हणून छगन भुजबळांना जे काही साध्य करायचे होते ते पॅकेजमधून त्यांनी साधले.

अंबांनी बंधूमधील भांडणे कोणते टोक गाठणार यासंबंधी कॉर्पोरेट क्षेत्रात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अनिल अंबांनी हे मुकेश यांचे धाकटे बंधू अतिशय आक्रमक म्हणून सर्वाना परिचित आहेत. आपला आक्रमक स्वभाव जपताना ते कुणालाही सोडत नाहीत. गेल्याच आठवडय़ात अनिलभाई पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांच्यांवर बसरले त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु एकाद्या उद्योगपतींने मंत्र्यावर टीका करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. अनिल यांचे पिताश्री धीरुभाईंनीच व्ही.पी.सिंग अर्थमंत्री असताना त्यांच्यावर टीका केली होती. आता अनिल अंबांनी यांची वेळ आहे. मात्र अनिल अंबांनी यांनी केलेल्या टीकेमुळे त्यांनी कॉँग्रेस पक्षामध्ये नव्याने शत्रू निर्माण केले आहेत. त्यांचे समाजवादी पक्षातील मित्रही आता त्यांच्यासाठी दिल्लीत काही विशेष करु शकत नाहीत. त्याचबरोबर दुसरीकडे मुकेश अंबांनींनी त्यांच्या विरोधात दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे आता अनिल यांची सारी भिस्त न्यायालयाच्या निकालावर आहे. सध्याच्या या वादात कुणाचे बरोबर तर कुणाचे चुकले या पेक्षा दोघा भावांच्या ‘इगो’मुळेच वारंवार असे प्रश्न निर्माण होतात याबाबत कॉर्पोरेट क्षेत्रात अनेकांचे मत आहे.