Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

‘पवना नदीपात्रातील बांधकामे बेकायदाच’
पिंपरी पालिका आयुक्तांचा निर्वाळा; बांधकामे स्थलांतरित करणार
लोकसत्ता इफेक्ट

पिंपरी ३० जुलै / प्रतिनिधी

पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांच्या पूरनियंत्रण रेषेच्या (निळी रेषा) आतील झोपडय़ांसह सर्व बांधकामांचे ‘शिफ्टिंग’ करणार असल्याचे पिंपरी - चिंचवड महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांनी आज ‘लोकसत्ता’ ला सांगितले. अशा सर्व बांधकामांचे महिनाभरात सर्वेक्षण करणार असे सांगतानाच, या रेषेच्या आत बांधकाम परवाने दिलेलेच नाहीत, असा ठोस दावा त्यांनी केल्याने आता अस्तित्वात असलेली हजारावर बांधकामे विनापरवाना ठरली आहेत. पाटबंधारे विभागाने पूर नियंत्रण रेषेचे नकाशे पालिकेला सुपूर्द केले आहेत, त्यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता, दोन तीन महिन्यांपूर्वी आम्हाला हे नकाशे मिळाले आहेत.

औध रुग्णालयात ‘स्वाईन फ्लू’ रुग्णांचे हाल
पिंपरी ३० जुलै / प्रतिनिधी

औंध रुग्णालयालयात ‘स्वाइन फ्लू’ च्या रुग्णांचे सध्या अतोनात हाल सुरु आहेत . गेले तीन दिवस इथे पाणी नसल्याने रुग्णांना अंघोळ नाही , शौचालय व स्वच्छतागृहाची साफसफाई नसल्याने दरुगधी पसरली आहे.आज सकाळी रुग्णांच्या पालकांनी मिळून निवासी डॉक्टरांकडे गाऱ्हाणे केले तर फक्त ‘बघतो’असे उत्तर मिळल्याने लोक हैराण झाले आहेत. या रुग्णालयात ‘स्वाइन फ्लू’साठी स्वतंत्र कक्ष गेल्या आठवडय़ात सुरु करण्यात आला.त्यानंतर संसर्गजन्य आजार म्हणून तिथे जी दक्षता घेणे अपेक्षित आहे त्याचा अभाव आहे.एका मुलाच्या नातेवाईकाने सांगितलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. इथे पाण्याअभावी अस्वच्छतेचे साम्राज्य तर आहेच, परंतु त्याहीपेक्षा या रुग्णांसाठी सर्व परिसर र्निजतुकीकरण करणे गरजेचे आहे. त्याकडे ना डॉक्टरांचे लक्ष आहे ना परिचारिकांचे.

‘सिम्बायोसिस’ आता घडविणार ‘एन्टरटेनमेंट’ तंत्रज्ञ!
पंचाहत्तरीनिमित्त डॉ. मुजुमदार यांचा संकल्प
पुणे, ३० जुलै/खास प्रतिनिधी

कालानुरूप व्यवसाय शिक्षण देण्याची परंपरा कायम राखताना ‘सिम्बायोसिस’ आता स्वतंत्र संस्थेद्वारे ‘एन्टरटेनमेंट’ तंत्रज्ञ घडविणार आहे, अशी माहिती ‘सिम्बायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी दिली. डॉ. मुजूमदार उद्या पंच्याहत्तरीत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त ‘लोकसत्ता’च्या शुभेच्छांचा स्वीकार केल्यानंतर ते बोलत होते. ‘गुणवत्ताधारित शिक्षण देणाऱ्या खासगी शिक्षण संस्था व गुणवान विद्यार्थ्यांमध्ये दरी निर्माण झाली असून, ती दूर करीत विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे आव्हान संस्थांपुढे आहे,’ असेही डॉ. मुजूमदार यांनी मान्य केले.

समित्यांवर ‘घुसायला’ दीडशे राजकीय कार्यकर्ते सज्ज!
नियुक्त्या चार महिने पुढे ढकलल्या
पुणे, ३० जुलै/प्रतिनिधी

प्रभाग समित्यांवरील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी नियुक्तीला पूर्णत: राजकीय स्वरुप प्राप्त झाले असून विधानसभेपूर्वी कोणी नाराज व्हायला नको म्हणून नियुक्तीची संपूर्ण प्रक्रियाच ५ नोव्हेंबपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व राजकीय पक्षांनी मिळून आज घेतला. स्वयंसेवी संस्थांच्या बहाण्याखाली या ४२ जागांवर ‘घुसायला’ सज्ज झालेल्या दीडशे राजकीय कार्यकर्त्यांची मात्र या निर्णयामुळे घोर निराशा झाली आहे.

न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांना ‘स्वाइन फ्लू’
पुणे, ३० जुलै/प्रतिनिधी

टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश शाळेसह कोथरूडमधील एमआयटी संस्थेच्या स्वामी विवेकानंद शाळेतील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांसह शहरातील नऊ विद्यार्थ्यांना ‘स्वाइन फ्लू’ची लागण झाली, तसेच आणखी एका परदेशी नागरिकासही लागण झाल्याने शहरात दहा जणांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या ही ८६ पर्यंत येऊन पोहोचली असून, विद्यार्थ्यांची संख्या ६६ झाली आहे.

--------------------------------------------------------------------------

वादंगावर केली मात
औ रंगाबादमध्ये गेल्या अनेक वर्षांच्या कालखंडानंतर एखाद्या खेळाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली ती शरीरसौष्ठवाची. ४३व्या आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा याच आठवडय़ात (२७ जुलै) औरंगाबाद शहरात मोठय़ा उत्साहात झाली. भारतीय शरीरसौष्ठव संघटना आणि आशियाई शरीरसौष्ठव संघटना या दोन संघटनांच्या वादामध्ये ही स्पर्धा अडकली होती. भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे माजी सरचिटणीस जी. एस. नायक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद औरंगाबादच्या संजय मोरे यांच्याकडे आले. ते भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे कार्यकारी उपाध्यक्ष होते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, संजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शरीरसौष्ठव संघटनेला मान्यता दिली आणि वाद पुन्हा उफाळून आला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव संघटनेने पॉल चुआ हे सरचिटणीस असलेल्या आशियाई शरीरसौष्ठव संघटनेची मान्यता काढून घेतली. गेल्या तीन ते साडेतीन दशकांपासून आशियाई शरीरसौष्ठव संघटनेवर पॉल चुआ यांचीच मक्तेदारी होती. एकाधिकारशाही होती. आशियाईमधील अनेक देश पॉल चुआच्या कारभाराला कंटाळलेले होते. संघटनेमध्ये पारदर्शकता असावी आणि एकाधिकारशाही संपुष्टात यावी म्हणून आशियाई खंडातील अनेक देश औरंगाबादमध्ये दाखल झाले होते. दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हाँगकाँगच्या तीन शरीरसौष्ठवपटूंनी उत्तेजक द्रव्य सेवन केल्याचा अहवाल पॉल चुआ यांनी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव संघटनेपासून लपवून ठेवला आणि त्यामुळेच पॉल चुआ यांना त्यांच्या पदावरून दूर व्हायला लागले, असे आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष डॉ. रॉफेल सॅन्टोजा यांनी सांगितले. आशियाई शरीरसौष्ठव संघटनेचे कामकाज पुन्हा एकदा सुरळीत व्हावे आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा शरीरसौष्ठवचा प्रचार-प्रसार व्हावा या हेतूनेच आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष प्रथमच भारतात आले. भारतामधील संयोजकांना त्यांच्या येण्याने ताकद मिळाली.

व्हॉलिबॉलसाठी सुवर्णसंधी!
जा गतिक व्हॉलीबॉल क्षेत्रातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंचे कौशल्य बघण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. त्याचबरोबर, पुण्यातील व्हॉलीबॉल खेळासही त्याचा फायदा होत नवचैतन्य निर्माण करण्याची संधी या संघटकांना मिळणार आहे. निमित्त आहे ते ३१ जुलैपासून शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरु होणाऱ्या कनिष्ठ गटाच्या जागतिक स्पर्धेचे! पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर आहेच, पण त्याचबरोबर गेल्या सात-आठ वर्षांंमध्ये हे शहर आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धाच्या यशस्वी संयोजनामुळे जागतिक नकाशावरील क्रीडा शहर म्हणूनही त्याची ख्याती झाली आहे. पुण्यातील उत्कृष्ट क्रीडा संघटक व त्यांना मिळणारे आर्थिक पाठबळ यामुळेच हे शक्य झाले आहे. व्हॉलीबॉलच्या आजपर्यंत अखिल भारतीय स्तरावर अनेक स्पर्धा येथे झाल्या आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्याचे पुणेकरांचे स्वप्न आजपर्यंत साकार झाले नव्हते. कनिष्ठ गटाच्या स्पर्धेमुळे हे स्वप्न आता साकार होणार आहे.

-------------------------------------------------------------------------

साखर साठाप्रकरणी कोका कोला कंपनीकडून कागदपत्रे सादर
चाकण, ३० जुलै/वार्ताहर

चाकणजवळ कुरुळी (ता. खेड) येथे कोका कोला कंपनीच्या ७० हजार पोत्यांच्या प्रचंड साखरेच्या साठय़ावरील धाडप्रकरणी कोका कोला कंपनीने अखेर याबाबतची कागदपत्रे सादर केली असून, या साखरेचा प्रत्यक्ष ग्राहक कोका कोला समूहच असल्याने परवान्याची गरज नसल्याचे त्यांनी आपल्या स्पष्टीकरणामध्ये म्हटले असून, एखाद्या ग्राहकाला एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर साठा करता येतो का, याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदार सुभाष भागडे यांनी येथे सांगितले. चाकणजवळ कुरुळी येथील बालाजी गोदामातील कोका कोला कंपनीच्या आठ कोटी रुपयांच्या सुमारे ७० हजार साखरेच्या पोत्यांवर तहसीलदार सुभाष भागडे यांच्या नेतृत्वाखालील पुरवठा व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी, दि. २० जुलै ०९ रोजी धाड टाकली होती. त्यानंतर कंपनीने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली होती. त्यानुसार कोका कोला कंपनीने ज्या साखर कारखान्यांकडून साखर खरेदी केली, त्या खरेदीच्या पावत्या व स्पष्टीकरण सादर केले असून, शीतपेयांच्या उत्पादनात ही साखर वापरात येते व कोका कोला कंपनी हीच या साखरेची ग्राहक आहे, त्यामुळे कंपनीने खरेदी केलेली साखर ही पुन्हा विकली जाणार नसल्याने हा प्रकार साठेबाजीतील नाही. साठेबाजीबाबतचा नियम हा ट्रेडर्स व व्यापाऱ्यांसाठीच लागू होऊ शकतो, त्यामुळे हा प्रकार साठेबाजीच्या उद्देशाने झालेला नसावा, असे तहसीलदार सुभाष भागडे यांनी सांगितले. एखाद्या ग्राहकाला एवढय़ा मोठय़ा प्रमाणात साखरेचा साठा करता येतो काय, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर अहवाल पाठविणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.