Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

राज्य

नाशिक पालिकेच्या झाडांवर कुऱ्हाड
नाशिक, ३० जुलै / प्रतिनिधी

गंगापूर रस्त्यावरील महापालिकेच्या मालकीची काही झाडे बुधवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी तोडल्याचे उघड झाल्यानंतर पर्यावरण विषयावर काम करणाऱ्या संक्रमण संस्थेने स्थानिकांच्या मदतीने ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी शिवाय झाडे तोडण्याच्या या प्रकाराबद्दल नागरिक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याने महापालिकेने येथे पुन्हा चार झाडांची लागवड करण्याची तत्परता दाखविली.

नवीन सांस्कृतिक धोरणासाठी दोन वर्षांत १०० कोटी रुपये - हर्षवर्धन पाटील
रत्नागिरी, ३० जुलै/ खास प्रतिनिधी

मराठी कला, वाङ्मय आणि रंगभूमीचा सुवर्णकाळ पुन्हा निर्माण करण्यासाठी शासनाने नवीन सांस्कृतिक धोरण आखले आहे. येत्या दोन वर्षांंत सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून या धोरणाची अंमलबजावणी राज्यभर करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे केली.येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृह वातानुकूलित करण्याच्या कामाचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे आणि आमदार उदय सामंत यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले या कार्यक्रमाला उपस्थित होते.

साजगाव ते होनाड रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिक हैराण
खोपोली, ३० जुलै/ वार्ताहर

खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायत ते होनाड ग्रामपंचायतपर्यंतच्या सुमारे पाच किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. खोपोली नगरपालिकेची हद्द ताकई गावापाशी संपल्यावर साजगाव ग्रामपंचायतीची हद्द सुरू होते. ताकई रस्त्यावरील मोरीच्या पुलाचे काम तब्बल दोन महिने अर्धवट अवस्थेत पडून आहे.

उद्धव ठाकरे यांचा १० ऑगस्ट रोजी धुळे दौरा
धुळे, ३० जुलै / वार्ताहर

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे १० व ११ ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून धुळे जिल्ह्य़ात ११ ऑगस्ट रोजी रस्त्यावर उतरून जनतेशी संवाद साधण्यासह कुसूंबा येथे सायंकाळी जाहीर सभाही घेणार आहेत. समवेत उत्तर महाराष्ट्राचे नेते सुरेश जैन, शिवसेनेचे उपनेते गुलाब पाटील, विलास अवचट यांच्यासह अनेक आमदारांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांनी दिली.

सदोष वीजपुरवठय़ामुळे खोपोलीकर हैराण
खोपोली, ३० जुलै/ वार्ताहर

खोपोली नगरपालिका हद्दीत गेले चार दिवस वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत आहे. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी भर पावसात खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा शर्थीचे प्रयत्न करीत असतात. खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठय़ाला कारणीभूत ठरलेला काटरंग प्रभागातील ट्रॉन्सफॉर्मर (२८ जुलै) रोजी पहाटे तीन वाजता निकामी झाल्यामुळे काटरंग परिसर अंधारात बुडाला आहे.

टिळक पुण्यतिथीदिनी डॉ. करंदीकरांचे व्याख्यान
खोपोली, ३० जुलै/ वार्ताहर

ब्राह्मण सभा खोपोली पुरस्कृत अभिनव व्याख्यानमालेत शनिवार, १ ऑगस्ट रोजी लोहाणा समाज हॉलमध्ये सायंकाळी पावणेसहा वाजता लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून डॉ. ग.वा. करंदीकर यांचे ‘श्रीमद् भगवद्गीतेचे भाष्यकार- लोकमान्य टिळक’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

जळगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी जमिनीचे हस्तांतरण
जळगाव, ३० जुलै / वार्ताहर

तालुक्यातील नशिराबाद व कुसुंबेखुर्द येथे संपादित करण्यात आलेल्या जमिनीवर विमानतळ विस्तारीकरणाचे काम वेगात सुरू असून राज्य शासनाच्या वतीने विमानतळ विकास कंपनीकडे या जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. येथील विमानतळाचा प्रकल्प महाराष्ट्र शासनाकडून भारतीय विमान प्राधिकरणकडे हस्तांतरण करण्याबाबत मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार विकास सुरू असलेल्या या विमानतळाकडे यापूर्वी संपादित करण्यात आलेली ४१ हेक्टर व आता नव्याने संपादित करण्यात आलेली २१९.१२ हेक्टर जमीन ही प्राधिकरणाकडे देखभाल आणि विकासासाठी हस्तांतरीत करण्यात आली.