Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

क्रीडा

स्टीव्ह वॉला ताटकळत ठेवण्यामागे ब्लेझर कारणीभूत - गांगुली
कोलकाता, ३० जुलै /वृत्तसंस्था

२००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या कसोटीत सौरव गांगुली याने नाणेफेकीसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉ याला ताटकळत ठेवल्याची घटना चांगलीच गाजली होती. त्याबद्दल गांगुली याला मोठय़ा टीकेला सामोरे जावे लागले होते. या घटनेला आठ वर्षे उलटून गेल्यानंतर गांगुली याने नाणेफेकीसाठी झालेल्या विलंबाचे कारण दिले आहे. नाणेफेकीसाठी ब्लेझर घालून जायचे असते. मात्र त्या दिवशी ब्लेझर सापडतच नव्हता.

हरमीत सिंग-आकाश लुथ्राला रमेश राजदे शिष्यवृत्ती प्रदान
मुंबई, ३० जुलै/क्री.प्र.

रमेश राजदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यावर्षी डावखुरा फिरकी गोलंदाज हरमीत सिंग, (१६ वर्षांखालील) अष्टपैलू खळाडू आकाश लुथ्रा (१४ वर्षांखालील) आणि सौरव नेत्रावळकर (१९ वर्षांखालील) यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. चौगुले ग्रुपचे अशोक चौगुले यांच्या हस्ते हरमीत आणि लुथ्रा यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली; पण नेत्रावळकर भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंच्या संघातून परदेशात खेळत असल्याने या कार्यक्रमास उपस्थित राहू शकला नाही. यावेळी चौगुले पोर्टस् अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक मनोहर पटवर्धन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सर्वोत्तम वास्तुरचनेसाठी डी.वाय. पाटील स्टेडियम जगात सहाव्या स्थानावर
नवी मुंबई, ३० जुलै /प्रतिनिधी

ब्रिटिश वास्तुरचना आणि वास्तुकलेस जगभर मिळालेली मान्यता हे आता इतिहासाचे अंग बनले आहे. या वास्तुकलेचे उत्तमोत्तम असे नमुने आपणास आजही मुंबईत ब्रिटिशांनी बांधलेल्या अनेक इमारतींमधून नजरेस येतात. हा इतिहास अगदी ताजा असताना आता इंग्लडमधील वास्तुविशारदांना भारतातील काही इंजिनीअरिंग स्ट्रक्चर्स भुरळ पाडू लागली आहेत. ‘दि होम ऑफ ब्रिटिश आर्किटेक्चर’ अशा विशेषणाने गौरविल्या गेलेल्या आर्किटेक्चर जर्नल या इंग्लंडमधील सर्वात मोठय़ा वास्तुविशारदांच्या संघटनेने जगातील उत्तम वास्तुरचनेचा नमुना ठरलेल्या क्रिकेट स्टेडियममध्ये नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमचा समावेश केला आहे.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघात बॉण्ड, टफी
ख्राइस्टचर्च, ३० जुलै / पीटीआय

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा ३० खेळाडूंचा संभाव्य संघ जाहीर झाला असून या संघात आयसीएलमधून पुन्हा एकदा न्यूझीलंड क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात सामील झालेले शेन बॉण्ड व डॅरिल टफी यांना स्थान देण्यात आले आहे.
आयसीएलशी काडीमोड घेतल्यानंतर बॉण्ड आणि टफी यांना पुन्हा एकदा न्यूझीलंड क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली. श्रीलंकेविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट व ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या न्यूझीलंड संघात त्यांना स्थान देण्यात आले.

घाटे, गुजर, वसावे महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघाचे कर्णधार
पुणे, ३० जुलै/प्रतिनिधी

जबलपूर येथे ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय कुमार मैदानी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १८ वर्षांखालील मुलांच्या संघाचे नेतृत्व पुण्याचा गुलाबसिंग वसावे तर मुलींच्या गटात पुण्याचीच प्रणिता घाटे, तसेच २० वर्षांखालील मुलांच्या संघाचे नेतृत्व साताऱ्याचा अनिरुद्ध गुजर तर मुलींच्या गटात कोल्हापूरची अमृता व्हटकर करणार आहे. संघ - १८ वर्षांखालील मुले- राहुल मुळे, गुलाबसिंग वसावे, अजिंक्य पवार, चंद्रकांत मानवदकर, परमजित सिंग, राजकुमार कश्यप, अनिष जोशी, श्रीकांत कालुंगे, यादव, देवेंदर शर्मा, दुर्गेश गुडेलू, सुनील हराळे (पुणे), सुस्मित सिन्हा (मुंबई शहर), श्रावण भोईटे, कृष्णा लहानगे,

इंग्लंडविरुद्ध हॉकी कसोटीत भारताची हार
बर्मिगहॅम, ३० जुलै/पी.टी.आय.

भारतीय हॉकी संघाच्या युरोप दौऱ्याची सुरुवात अपयशी झाली. इंग्लंडविरुद्धच्या तीन हॉकी कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला आज १-३ असा पराभव स्वीकारावा लागला. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला बेन हॉसने इंग्लंड संघाचे खाते उघडले. त्यानंतर दोनच मिनिटांत इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला; पण विक्रम पिल्लेने त्यांचे प्रयत्न फोल ठरविले. आठव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर धनंजय महाडिकने केलेल्या गोलमुळे भारताने १-१ अशी बरोबरी साधली.

चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२०ची सलामी बंगलोरमध्ये तर अंतिम फेरी हैदराबादमध्ये
मुंबई, ३० जुलै / क्री. प्र.

इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ आणि दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन कोब्राज यांच्यात चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सलामीचा सामना रंगणार आहे. बंगलोर येथे ८ ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. हैदराबाद येथे या स्पर्धेची अंतिम लढत होणार असून ही लढत २३ ऑक्टोबरला होईल. उपान्त्य फेरीची दुसरी लढतही हैदराबादमध्येच होईल. ही लढत २२ ऑक्टोबरला होणार असून पहिली उपान्त्य लढत २१ ऑक्टोबरला दिल्लीत होईल.

पाकिस्तानची पराभवाची मालिका सुरूच
एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना गमावला
दम्बुला, ३० जुलै / एएफपी

श्रीलंका दौऱ्यातील पाकिस्तानच्या खराब कामगिरीची मालिका अजूनही सुरूच असून एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्यांचा पराभवाने पिच्छा सोडलेला नाही. थिलन तुषारा व नुवान कुलसेकरा यांच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि श्रीलंकेने ही लढत ३६ धावांनी जिंकली.

मुरलीधरनचा पुढील वर्षी कसोटी क्रिकेटला अलविदा
दम्बुला, ३० जुलै / पीटीआय

श्रीलंकेचा विश्वविक्रमवीर ऑफ स्पिनर गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याने वेस्ट इंडिजविरुद्ध पुढील वर्षी होणाऱ्या मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार असल्याचे सुतोवाच केले आहे. पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका रंगत असून ती अखेरची मालिका असेल, असे ३७ वर्षीय मुरलीधरनने म्हटले आहे. कसोटी खेळण्यासाठी आपले शरीर साथ देत नाही, असे कारणही त्याने दिले आहे. सध्या पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेदरम्यान तो गुडघेदुखीमुळे बेजार झालेला आहे. पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेतही तो त्यामुळेच खेळू शकला नव्हता.

ऑस्ट्रेलिया १ बाद १२६
बर्मिगहॅम, ३० जुलै/क्री.प्र.

अ‍ॅशेस मालिकेतील एजबॅस्टन येथील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला पावसाच्या व्यत्ययानंतर अखेरच्या सत्रात सुरुवात झाली. ३० षटकांच्या त्या सत्रात नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने १ बाद १२६ अशी दमदार सुरुवात केली होती. कॅटिचचा (४६) बळी गमावून ऑस्ट्रेलियाने वेगवान सुरुवात केली. कामचलाऊ सलामीचा फलंदाज शेन व्ॉटसन दिवसअखेर ६२ धावांवर खेळत होता. २० हजार प्रथम दर्जाच्या वैयक्तिक धावसंख्येची वेस ओलांडणारा पॉन्टिंग त्याच्या साथीने खेळत होता. त्याआधी ऑस्टेलियाने आपल्या संघात दोन बदल केले होते. व्ॉटसनला ह्युजेसच्या जागी तर यष्टीरक्षक हॅडिनच्या जागी मनौची निवड केली.इंग्लंडने जायबंदी पीटरसनच्या जागी इअन बेल याला ११ जणांत घेतले.

दीपिका कुमारीला तिरंदाजीत सुवर्ण
रांची , ३० जुलै / पीटीय

भारताच्या दीपिकाकुमारी हिने जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत आज सुवर्णपदकाचा वेध घेतला. ही स्पर्धा ऑग्डेन (अमेरिका) येथे सुरू आहे. रिक्षाचालकाच्या या १५ वर्षीय कन्येने अप्रतिम कौशल्य दाखवित सर्वोत्तम कामगिरी केली. तिने आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेतही नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

सायनाला कांजण्या; विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा सराव अडचणीत
चेन्नई, ३० जुलै / वृत्तसंस्था

भारताचा आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालला कांजण्या झाल्याचे निदान झाल्यामुळे १० ते १६ ऑगस्ट या कालावधीत हैदराबाद येथे होणाऱ्या विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेसाठीच्या तिच्या सरावावर बंधने येणार आहेत. तिला किती सराव करता येईल, हे स्पष्ट होत नसल्यामुळे या स्पर्धेतील तिच्या सहभागाविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिचे प्रशिक्षक आणि भारताचे माजी बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांनी यासंदर्भात सांगितले की, ती विश्व अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी पूर्णपणे बरी होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र अजूनही आम्ही तिच्या फिटनेसविषयी खात्रीलायक असे काही सांगू शकत नाही. सायना नेहवालने इंडोनेशियन ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर तिच्याकडून विश्व अजिंक्यपद स्पर्धेत साऱ्यांच्या अपेक्षा बऱ्याच उंचावल्या आहेत.

पीटरसनच्या दुखापतीला ‘आयपीएल’ जबाबदार नाही - हेडन
लंडन, ३० जुलै / वृत्तसंस्था

इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन याला झालेल्या दुखापतीचे खापर इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेवर फोडणे चुकीचे आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी आघाडीवीर मॅथ्यू हेडन याने व्यक्त केले आहे. केव्हिन पीटरसन याला दुखापतीमुळे अ‍ॅशेस मालिकेत फक्त एकच कसोटी खेळता आली. उर्वरित सामन्यांना तो मुकला आहे. इंग्लंडमधील वृत्तपत्रांत पीटरसन याला इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत खेळतानाच दुखापत झाली होती, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. पीटरसन हा बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाकडून आयपीएल स्पर्धेत खेळला होता. बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाच्या फिजिओनीही आयपीएल स्पर्धेदरम्यानच पीटरसनचे दुखणे बळावले होते, असे अलीकडेच सांगितले होते.

चॅलेंज टेनिस स्पर्धेतील दुहेरीत मंकड पराभूत
नवी दिल्ली ३० जुलै/पीटीआय

भारताच्या हर्ष मंकड याला एटीपी चॅलेंज टेनिस स्पर्धेतील दुहेरीत फिलिपाईन्सच्या ट्रेट कॉनराड ह्य़ुई याच्या साथीत पराभव स्वीकारावा लागला. इस्रायलच्या हॅरेल लेव्ही व आमीर हदाद यांनी चुरशीच्या लढतीनंतर मंकड व ह्य़ुई यांच्यावर ७-५, २-६, १०-७ अशी मात केली. मंकड व ह्य़ुई यांना एकही मानांकन गुण मिळाला नाही मात्र त्यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांची कमाई केली.

शिवछत्रपती पुरस्कारांचे वितरण दोन ऑगस्टला
मुंबई, ३० जुलै / क्री. प्र.

महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेळाडूंना देण्यात येणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, उत्कृष्ट मार्गदर्शक, उत्कृष्ट संघटकासाठी शिवछत्रपती राज्य पुरस्कार, एकलव्य राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. २००६-०७ व २००७-०८ या वर्षी पुरस्कार मिळालेल्या खेळाडू, कार्यकर्त्यांना या पुरस्काराचे वितरण २ ऑगस्टला दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदिंच्या प्रमुख उपस्थितीत हे वितरण केले जाणार आहे.