Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

स्टीव्ह वॉला ताटकळत ठेवण्यामागे ब्लेझर कारणीभूत - गांगुली
कोलकाता, ३० जुलै /वृत्तसंस्था

२००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या कसोटीत सौरव गांगुली याने नाणेफेकीसाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉ याला ताटकळत ठेवल्याची घटना चांगलीच गाजली होती. त्याबद्दल गांगुली याला मोठय़ा टीकेला सामोरे जावे लागले होते. या घटनेला आठ

 

वर्षे उलटून गेल्यानंतर गांगुली याने नाणेफेकीसाठी झालेल्या विलंबाचे कारण दिले आहे. नाणेफेकीसाठी ब्लेझर घालून जायचे असते. मात्र त्या दिवशी ब्लेझर सापडतच नव्हता. तो शोधत बसल्यामुळे मला नाणेफेकीसाठी जाण्यास उशीर झाला, असे सौरवने दादागिरी अन्लिमिटेड या दूरचित्रवाणी वाहिनीवरील रिअ‍ॅलिटी शो दरम्यान बोलताना सांगितले.
मुळात त्या मालिकेत वेगवेगळ्या कारणांमुळे ऑस्ट्रेलिया आणि भारतीय खेळाडूंतील संबंध ताणले गेले होते. त्यात सौरवने स्टीव्ह वॉ याला ताटकळत ठेवण्याच्या घटनेची भर पडली. गांगुलीने नाणेफेकीसाठी मुद्दाम उशीर लावला, असा जाहीर आरोप स्टीव्ह वॉ याने केला होता.
आऊट ऑफ माय कम्फर्ट झोन या आपल्या आत्मचरित्रातही स्टीव्ह वॉ याने सदर घटनेचा उल्लेख केला आहे. नाणेफेकीला मला ताटकळत ठेवून गांगुलीने उद्दामपणा दाखविला, असे वॉ याने आत्मचरित्रात नमूद केले आहे.