Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

हरमीत सिंग-आकाश लुथ्राला रमेश राजदे शिष्यवृत्ती प्रदान
मुंबई, ३० जुलै/क्री.प्र.

रमेश राजदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यावर्षी डावखुरा फिरकी गोलंदाज हरमीत सिंग, (१६ वर्षांखालील) अष्टपैलू खळाडू आकाश लुथ्रा (१४ वर्षांखालील) आणि सौरव नेत्रावळकर (१९

 

वर्षांखालील) यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. चौगुले ग्रुपचे अशोक चौगुले यांच्या हस्ते हरमीत आणि लुथ्रा यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली; पण नेत्रावळकर भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंच्या संघातून परदेशात खेळत असल्याने या कार्यक्रमास उपस्थित राहू शकला नाही. यावेळी चौगुले पोर्टस् अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक मनोहर पटवर्धन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अशोक चौगुले यांनी या गुणवान युवकांना भावी क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षणावरही लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. डावखुरा वेगवान गोलंदाज सौरव नेत्रावळकर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज हरमीत सिंग यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या दमदार कामगिरीने मुंबईच्या क्रिकेटवर आपली छाप पाडली आहे तर आकाश लुथ्राने डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीसह आपल्या अष्टपैलू खेळाने गेल्या मोसमात सर्वानाच प्रभावीत केले होते. त्याच्या या कामगिरीनेच त्याची राष्ट्रीय क्रिकेट अ‍ॅकॅडमीसाठी निवड झाली आहे. रमेश राजदे या मुंबईच्या उमद्या क्रिकेटपटूस आदरांजली म्हणून चौगुले ग्रुप्सचे चेअरमन विजय चौगुले व भारताचे माजी कसोटीवीर अंशुमन गायकवाड यांनी गुणवान युवा क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी या ट्रस्टची स्थापना केली असून गेली तीन वर्ष मुंबईतील गुणवान क्रिकेटपटूंना अशी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.