Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

सर्वोत्तम वास्तुरचनेसाठी डी.वाय. पाटील स्टेडियम जगात सहाव्या स्थानावर
नवी मुंबई, ३० जुलै /प्रतिनिधी

ब्रिटिश वास्तुरचना आणि वास्तुकलेस जगभर मिळालेली मान्यता हे आता इतिहासाचे अंग बनले आहे. या वास्तुकलेचे उत्तमोत्तम असे नमुने आपणास आजही मुंबईत ब्रिटिशांनी बांधलेल्या अनेक इमारतींमधून नजरेस येतात. हा इतिहास अगदी ताजा असताना आता इंग्लडमधील वास्तुविशारदांना

 

भारतातील काही इंजिनीअरिंग स्ट्रक्चर्स भुरळ पाडू लागली आहेत.
‘दि होम ऑफ ब्रिटिश आर्किटेक्चर’ अशा विशेषणाने गौरविल्या गेलेल्या आर्किटेक्चर जर्नल या इंग्लंडमधील सर्वात मोठय़ा वास्तुविशारदांच्या संघटनेने जगातील उत्तम वास्तुरचनेचा नमुना ठरलेल्या क्रिकेट स्टेडियममध्ये नवी मुंबईतील डॉ. डी.वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमचा समावेश केला आहे. इंग्लडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या २०-२० वर्ल्डकपचे औचित्य साधून तेथील वास्तुविशारदांनी जगभरातील मोठय़ा क्रिकेट स्टेडियमचे एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानंतर जगातील उत्तम क्रिकेट स्टेडियममध्ये डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियमला सहावे स्थान देण्यात आले आहे.
क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडनमधील लॉर्डस् स्टेडियमला आर्किटेक्चर जर्नलने सर्वात वरचे स्थान दिले आहे.
विशेष म्हणजे, पाकिस्तानातील लाहोर येथील गडाफी स्टेडियम ब्रिटिश वास्तुविशारदांच्या विशेष पसंतीस उतरले असून, या यादीत त्याला दुसरे स्थान देण्यात आले आहे. हे सर्वेक्षण करताना या संस्थेने स्टेडियमचे डिझाईन, प्रेक्षकांना मिळणाऱ्या सुविधा, स्कोअर बोर्ड, पॅव्हिलियनची मांडणी यासारख्या काही गोष्टी विचारात घेतल्या आहेत. मैदानात सामने पाहण्यापेक्षा टीव्हीवर सामने बघताना अधिक सुस्पष्टता असते. या पाश्र्वभूमीवर क्रिकेटप्रेमासाठी मैदानात सामने पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना सामना अधिक सुस्पष्टपणे पाहायला मिळेल, अशी व्यवस्था करणे हे वास्तुरचनाकाराचे कसब असते.
जगातील क्रिकेट स्टेडियमचे सर्वेक्षण करताना या संस्थेने ही बाब मुख्यत्वे विचारात घेतली आहे, अशी माहिती डॉ. डी.वाय.पाटील अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. दि आर्किटेक्चर जर्नलने नुकत्याच जाहीर केलेल्या या यादीत जगातील सहा स्टेडियमचा समावेश केला आहे. यामध्ये साऊथ आफ्रिकेतील न्यू-लॅण्ड, वेस्ट इंडिजमधील किंगस्टन, तसेच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड यासारख्या जगप्रसिद्ध स्टेडियमचाही समावेश करण्यात आला आहे. या क्रिकेट मैदानांमध्ये भारतातील डी.वाय.पाटील या एकमेव स्टेडियमचा समावेश करण्यात आला आहे.
इग्लंडमध्ये २०-२० क्रिकेट स्पर्धा सुरू असताना या संस्थेने हे सर्वेक्षण केले. ही यादी प्रसिद्ध करताना या वास्तुविशारदांनी खेळाडू, समालोचक, टेलिव्हिजन युनिटचे सदस्य यांची मतेही विचारात घेतली आहेत. २००८ मध्ये भारतात आयोजित करण्यात आलेल्या आयपीएल स्पर्धेचे तब्बल सात सामने नेरुळ येथील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये खेळविण्यात आले होते. जागतिक स्टेडियममध्ये डी.वाय.पाटीलचा विचार करताना या सामन्यांचा निकष महत्त्वाचा मानला गेला आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.