Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

इंग्लंडविरुद्ध हॉकी कसोटीत भारताची हार
बर्मिगहॅम, ३० जुलै/पी.टी.आय.

भारतीय हॉकी संघाच्या युरोप दौऱ्याची सुरुवात अपयशी झाली. इंग्लंडविरुद्धच्या तीन हॉकी कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला आज १-३ असा पराभव स्वीकारावा लागला.
सामना सुरू झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला बेन हॉसने इंग्लंड संघाचे खाते उघडले. त्यानंतर

 

दोनच मिनिटांत इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला; पण विक्रम पिल्लेने त्यांचे प्रयत्न फोल ठरविले. आठव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर धनंजय महाडिकने केलेल्या गोलमुळे भारताने १-१ अशी बरोबरी साधली.
१८ व्या मिनिटाला मिळालेल्या चौथ्या पेनल्टी कॉर्नरवर इंग्लंडने २-१ अशी आघाडी मिळवली. बॅरी मिडलटनने हा गोल केला. सर्कलच्या मध्यावरून जेम्स टिन्डलने मारलेला जोरदार फटका फर्स्ट रनर विक्रम पिल्लेने तटवण्याचा प्रयत्न केला व त्या प्रयत्नात चेंडू भारतीय गोलक्षेत्रात गेला व ती संधी साधत बॅरी मिडलटनने जोरदार फटका मारला आणि भारतीय गोलक्षेत्रक आद्रियन डिसूझाला सावरण्याची संधी न देता चेंडू गोलजाळ्यात धडकला.
पावसाने निसरडय़ा झालेल्या मैदानामुळे भारतीयांसमोरील आव्हान अधिकच कठीण बनवले. दुसऱ्या सत्रातील खेळात सहाव्या मिनिटाला भारताला बरोबरीची चांगली संधी होती. उजव्या बगलेवरून चंडीने प्रबोध तिर्कीला चांगला पास दिला होता; पण तिर्कीने मारलेला फटका गोलजाळ्याच्यावरून बाहेर गेला. नंतर संदीप सिंगच्या ड्रॅग फ्लिकवर भारतासाठी पुन्हा संधी मिळाली होती; पण इंग्लंडचा गोलरक्षक फेअर याने अप्रतिम बचाव करत हा प्रयत्नही फोल ठरविला. त्यानंतर मात्र इंग्लंडने लढतीवर पूर्ण वर्चस्व राखले आणि सामना संपण्यापूर्वी (६८ व्या मिनिटाला) रिचर्ड स्मिथने केलेल्या गोलने त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.