Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२०ची सलामी बंगलोरमध्ये तर अंतिम फेरी हैदराबादमध्ये
मुंबई, ३० जुलै / क्री. प्र.

इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ आणि दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन कोब्राज यांच्यात चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या सलामीचा सामना रंगणार आहे. बंगलोर येथे ८ ऑक्टोबरपासून ही

 

स्पर्धा सुरू होत आहे.
हैदराबाद येथे या स्पर्धेची अंतिम लढत होणार असून ही लढत २३ ऑक्टोबरला होईल. उपान्त्य फेरीची दुसरी लढतही हैदराबादमध्येच होईल. ही लढत २२ ऑक्टोबरला होणार असून पहिली उपान्त्य लढत २१ ऑक्टोबरला दिल्लीत होईल.
या स्पर्धेत भारतातील तीन संघ सहभागी होत आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात अजिंक्य ठरलेला हैदराबादचा डेक्कन चार्जर्स, उपविजेता बंगलोरचा रॉयल चॅलेंजर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स असे संघ या स्पर्धेत खेळणार आहेत.
या स्पर्धेचे सहसंस्थापक असलेल्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या देशांतील प्रत्येकी दोन संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. तर इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाचेही दोन संघ सहभागी होत आहेत. इतर तीन संघ श्रीलंका, न्यूझीलंड व वेस्ट इंडिजमधील असतील.
सहभागी झालेल्या संघाची चार गटात प्रत्येकी तीन अशी विभागणी करण्यात येईल. त्यातून दुसऱ्या टप्प्यासाठी आठ संघ पात्र होतील. प्राथमिक फेरीत भारतातील तीन संघ वेगवेगळ्या गटात आहेत.
डेक्कन चार्जर्स हा संघ ‘अ’ गटात असून रॉयल चॅलेंजर्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स हे संघ अनुक्रमे ‘क’ आणि ‘ड’ गटात आहेत. प्राथमिक फेरीच्या लढती ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. यातील प्रत्येक गटात दोन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. ही दुसरी फेरी १५ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. दुसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून त्यातील चार संघ उपान्त्य फेरीत प्रवेश करतील. एकूण २३ सामने या स्पर्धेत खेळविण्यात येणार असून १६ दिवस ही स्पर्धा चालेल. सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४ ते ८ या वेळेत होतील. चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी प्रमुख प्रायोजक म्हणून एअरटेलने इएसपीएन स्टार स्पोर्ट्सशी पाच वर्षांचा करार केला आहे. हा करार १७० कोटींचा असल्याची चर्चा असली तरी नेमका आकडा स्पष्ट करण्यात एअरटेल व ईएसपीएनने नकार दिला आहे.