Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

क्रीडा
(सविस्तर वृत्त)

पाकिस्तानची पराभवाची मालिका सुरूच
एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना गमावला
दम्बुला, ३० जुलै / एएफपी

श्रीलंका दौऱ्यातील पाकिस्तानच्या खराब कामगिरीची मालिका अजूनही सुरूच असून एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्यांचा पराभवाने पिच्छा सोडलेला नाही. थिलन तुषारा व नुवान कुलसेकरा यांच्या गोलंदाजीपुढे पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि

 

श्रीलंकेने ही लढत ३६ धावांनी जिंकली.
डावखुरा वेगवान गोलंदाज तुषाराने २९ धावांत ३ बळी घेतले तर कुलसेकराने ३० धावांत २ बळी घेतले. त्यामुळे श्रीलंकेच्या ९ बाद २३२ धावांचा प्रतिकार करताना पाकिस्तानची अवस्था ४४.४ षटकांत सर्व बाद १९६ अशी झाली.
याआधी, झालेल्या कसोटी मालिकेत श्रीलंकेने पाकिस्तानवर २-० अशी मात केली होती. पराभवाची ही मालिका एकदिवसीय मालिकेतही कायम आहे. श्रीलंकेच्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानची स्थिती ८बाद १३४ अशी वाईट झाल्यानंतरही उमर गुल आणि मोहम्मद आमीर या तळाच्या फलंदाजांनी ६२ धावांची भागीदारी करून थोडी आशा दाखविली. गुलने २१ चेंडूंत ३३ धावा केल्या तर आमीरने २३ धावांची खेळी केली. या जोडीमुळे पाकिस्तानची धावसंख्या १९६च्या घरात गेली. पण दोन चेंडूंच्या अंतराने दोघेही बाद झाल्यामुळे पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले.
पाच सामन्यांच्या या मालिकेत श्रीलंकेने आता १-० अशी आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेलाही प्रथम फलंदाजी करताना अडचणींचा सामना करावा लागला. पाकिस्तानच्या अचूक गोलंदाजीपुढे त्यांना धावसंख्या वेगाने वाढविण्याची संधी मिळाली नाही. कर्णधार कुमार संगकारा (३६), ३००वा सामना खेळणारा महेला जयवर्धने (३३) यांच्यासह अँजेलो मॅथ्यूजने केलेल्या ४३ धावांमुळे श्रीलंकेने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. इतर फलंदाज मात्र छाप पाडू शकले नाहीत.
पाकिस्तानने सराव सामन्यात शतक ठोकणाऱ्या उमर अकमल याला या सामन्यात संधी न देऊन धक्का दिला.