Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

भारतीय किसान सभेतर्फे धुळे येथे मोर्चा
वार्ताहर / धुळे

 

साठ वर्षावरील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर एक हजार रुपये निवृत्तीवेतन सुरू करावे यांसह इतर अनेक मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे मोर्चा काढण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले. शहरातील बारा पत्थर चौकापासून मोर्चाला सुरूवात झाली. मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. धुळे तालुक्यासह साक्री, शिरपूर, शिंदखेडा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोर्चात मोठय़ा संख्येने सहभाग घेतला.
केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ६० वर्षावरील शेतकऱ्यांना एक हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे या मागणीचे अर्ज यावेळी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
याशिवाय एका स्वतंत्र निवेदनातून करण्यात आलेल्या मागण्या अशा वीज बील माफ करावे, भारनियमन रद्द करावे, किसान कार्डावर चार टक्के व्याजाने पीक कर्ज मंजूर करावे, शासन निर्णयाप्रमाणे पीक विम्याचा हप्ता सरकारने भरावा, हवी त्याला वीज देताना त्यासाठीचे खांब शासनखर्चातून उभारावेत, पीक नुकसान भरपाई त्वरित द्यावी, आदिवासींच्या नावे वन हक्क कायद्यान्वये जमिनी करून सात बाराचे उतारे द्यावेत, स्वत: बियाणे, औषधांची वितरण व्यवस्था पारदर्शक करावी, शेतमालाला भाव बांधून द्यावा, रोजगार
हमीची त्वरित कामे सुरू करून किमान
वेतनाप्रमाणे रोजगार द्यावा किंवा बेकार भत्ता
द्यावा, कष्टकरी श्रमिकांना दारिद्रय़रेषेखालील कार्ड द्यावेत, असंघटित कामगारांना शहरी भागात रोजगार हमीची कामे उपलब्ध करून द्यावीत, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलती द्याव्यात, या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
शिष्टमंडळात श्रावण शिंदे यांच्यासह धुळे तालुका किसान सभेचे तालुका अध्यक्ष काशिराम पाटील व अन्य पदाधिकारी होते.