Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ३१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

सुनील कोल्हे यांच्या बदलीमागील कारणांविषयी तर्कवितर्क
वार्ताहर / धुळे

 

जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कोल्हे यांची नागपूर येथे तर बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक एच. व्ही. देशभ्रतार यांची धुळे येथे बदली झाली आहे. नागपूर महामार्ग विभागाच्या अधीक्षकपदी कोल्हे यांची नेमणूक करण्यात आली असून धुळ्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून देशभ्रतार हे लवकरच सूत्रे हाती घेणार आहेत. कोल्हे यांच्या बदलीमागील कारणांविषयी विविध तर्क वितर्क करण्यात येत असून शहर व जिल्ह्य़ातील वाढते अवैध धंदे हे त्यापैकी एक कारण असल्याचे मानले जात आहे.
शहर व जिल्ह्य़ात अवैध धंद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. यापूर्वीही अवैध धंदे सुरू होते, परंतु अलीकडील काळात अशा अनधिकृत धंद्यांवर पोलिसांचा जणू वचकच नाही असे चित्र निर्माण झाले होते. यामुळे लोकसंग्राम, लोकसेना आणि नंतर आ. राजवर्धन कदमबांडे यांनीही या अवैध धंद्यांविरुद्ध आवाज उठविला. केवळ तात्पुरते सोपस्कार करणाऱ्या पोलिसांच्याच मदतीने नंतर त्याच ठिकाणी तेच अवैध धंदे सुरूही होतात हे शहर व जिल्हावासियांच्या निदर्शनास आल्याने मग धुळे जिल्ह्य़ासाठी आयपीएस केडरचाच पोलीस अधीक्षक असावा, अशी मागणी सुरू झाली. आ. कदमबांडे यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती. या पाश्र्वभूमीवरच कोल्हे यांची उचलबांगडी झाल्याचे मानले जात आहे.
कोल्हे यांनी धुळ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथम अवैध सीडी, व्हीसीडी, एमपीथ्रीच्या अनधिकृत कारखान्यावर छापे टाकत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यामुळे ते कर्तव्यदक्ष, कठोर आणि कोणाचाही हस्तक्षेप खपवून न घेणारे, अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. परंतु नंतरच्या काळात मात्र शहर व जिल्ह्य़ात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पुन्हा पूर्ववत झाली. हाणामाऱ्या, चोऱ्या, घरफोडय़ा, दरोडे यांसह रॉकेल, गॅस, धान्य आणि डांबराचाही काळाबाजार वाढला. हे सर्व प्रकार नागरिकांनी पुराव्यासह कोल्हे यांच्याकडे सादर करण्याचे प्रयत्न केले आणि तेथून त्यांची प्रतिमा खालावण्यास सुरूवात झाली. कोल्हेंकडे पाहण्याचा सर्वाचा दृष्टीकोन बदलत गेला. दोन समूहातील दंगल कोल्हे यांच्या कारकिर्दीतला इतिहास झाला. या पाश्र्वभूमीवर देशभ्रतार यांच्यावरील जबाबदारीची कल्पना येईल.